सत्यस्थापनेसाठी पदयात्रा!

    28-Oct-2026
BJP SIR Awareness Campaign
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’संदर्भात एकमताने निर्णय घेतला होता, असे नमूद करणारे प्रतिज्ञापत्र काल आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर करून, या मोहिमेतील विरोधकांच्या अपप्रचाराची हवाच काढून टाकली. शिवाय, ‘एसआयआर’ मोहिमेचे सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांनी आता देशभरात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
 
सत्य आपोआप सिद्ध होत नसते, तर त्याला प्रस्थापित करण्यासाठीही मेहनत घ्यावी लागते. देशात काँग्रेसचा, विशेषत: राहुल गांधी यांचा असत्याचा कारखाना २४ तास सुरू असल्यामुळे भाजपनेही आता या अपप्रचाराला आक्रमक विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आता तेलंगणमधून ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ नावाची पदयात्रा काढणार आहेत. तसेच अनेक राज्यांतील भाजपचे प्रमुख नेतेही अशा पदयात्रा काढून ‘एसआयआर’विषयीचे सत्य जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत. भारतीय मतदार परिपक्व आणि सजग आहे, हे खरे असले; तरी असत्याचा सतत मारा झाल्यास क्वचित तोही अपप्रचाराला बळी पडू शकतो, हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. ‘एआय’च्या मदतीने प्रसारित केलेल्या ‘फेक नॅरेटिव्ह’मुळे ‘भाजप राज्यघटना बदलणार आणि राखीव जागा रद्द करणार,’ या अपप्रचाराला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार काही प्रमाणात बळी पडले. परिणामी, केंद्रात ‘एनडीए’चेच सरकार स्थापन झाले, तरी भाजपला स्वबळावर बहुमत मिळू शकले नाही. मतदारांनाही निवडणुकीनंतर आपली चूक कळून आली आणि त्यांनी नंतर झालेल्या बहुतांशी सर्व राज्य विधानसभांच्या निवडणुकीत भाजपला बहुमत देऊन त्यांनी या चुकीची अंशत: दुरुस्ती केली होती. मात्र, आता उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड यांसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशसारखे राज्य गमावणे, भाजपला परवडणार नसून पंजाबमधील अनिश्चित राजकीय परिस्थिती भाजपसाठी अनुकूल आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सध्या निवडणूक आयोग, तसेच ‘एसआयआर’ मोहिमेविरोधात अपप्रचाराची राळ उडविली आहे. या अपप्रचाराला मतदार बळी पडू नयेत, यासाठी भाजपने त्यासंदर्भातील सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध राज्यांमध्ये पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला मुळातूनच खोडून टाकण्यासाठी भाजपने आता फ्रंटफूटवर येऊन विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे, ही स्वागतार्ह बाब.
 
सध्याचा जमाना ऑनलाईनचा असला, तरी काही गोष्टी या प्रत्यक्ष जमिनीवर केल्या, तर त्यांचा प्रभाव अधिक टिकतो. म्हणूनच, समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांमधून काँग्रेसकडून अपप्रचार आणि असत्याची चिपाडे निघत असल्यामुळे भाजपने त्याविरोधात जमिनीवर आंदोलन करण्याचा रास्त निर्णय घेतला. या पदयात्रा आणि मोर्चांमुळे ‘एसआयआर’ आणि पक्षपाती निवडणूक आयोगाचा मुद्दा मुळातच खुडून टाकता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या पदयात्रेचा प्रारंभ मुद्दाम तेलंगणमधून करणार आहेत. कारण, त्या राज्यात काँग्रेसचे रेड्डी सरकार आहे. तेही ‘ईव्हीएम’द्वारे निवडून आले. मग तेथे ‘व्होटचोरी’ का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाईल. मतचोरीचा मुद्दा असा मुळातूनच खोडला गेला, तर काँग्रेसचा मतलबी, लबाड आणि असत्यावर आधारित अपप्रचार उघड होईल, यात शंका नाही. शिवाय, प. बंगाल, ओडिशा ही राज्ये जिंकल्यावर आता तेलंगणमध्येही सत्ता मिळविण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असून, त्यासाठीही ही यात्रा उपयुक्त ठरेल.
 
त्यातच निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, ‘एसआयआर’चा निर्णय हा सर्व निवडणूक आयुक्तांनी एकमतानेच घेतला होता, असे नमूद केले. इतकेच नव्हे, तर हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचा निर्णयही एकमतानेच घेण्यात आला आहे, हेही त्यात नमूद करून विरोधकांच्या अपप्रचाराला मोठा दणका दिला. यामुळे निवडणूक आयोगातील कथित मतभेद आणि एकाधिकारशाहीचे आरोप पूर्णपणे भुईसपाट झाले आहेत. शिवाय, एका पूर्वग्रहदूषित वृत्तपत्राची निवडणूक आयोगाविरोधातील खोट्यावर आधारित मोहीमही खोटी पडली.
 
या घटनांनी निवडणूक आयोग आणि ‘एसआयआर’बद्दलचा अपप्रचार उघडा पडला असला, तरी राहुल गांधी यांनी येत्या रविवारी, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर या मुद्द्यांच्या विरोधात भव्य सभा आयोजित करण्याचा घाट घातला आहे. दिवाळीपूर्वीचा हा अखेरचा रविवार असल्याने बाजारपेठेत ग्राहकांच्या खरेदीची झुंबड उडते. दिल्लीत अशाप्रकारे दिवाळीच्या इतक्या जवळ राजकीय मेळावा झाल्यास शहरातील वातावरण गढूळ तर होतेच; पण काहीसे तणावपूर्णही बनते. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होतो. दिल्लीतील सर्व व्यापारी संघटनांनी राहुल गांधी यांना हा मेळावा दिवाळीनंतर घेण्याचे आवाहन केले आहे. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांचेही असेच मत आहे. दिवाळीच्या तोंडावर अशा मेळाव्यामुळे व्यापार्‍यांचे सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, राहुल गांधी यांना स्वत:चा अहंकार जपणे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ते या मेळाव्यावर ठाम आहेत. राहुल गांधी यांना लोकांच्या आणि व्यापार्‍यांच्या हिताशी काही देणे-घेणे नाही.
 
विरोधक, त्यातही काँग्रेसचे नेते, आता वैफल्यग्रस्ततेच्या चढत्या पातळीवर जात असल्यानेच त्यांच्याकडून मोदीविरोधी टीकेच्या भाषेचा धरबंद सुटला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि वयस्कर नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर एका सभागृहात ‘मोदीही नहीं, उसका बाप भी जाएगा’ असे उद्गार काढले. ते त्यांच्या मनाची अत्यंत निराश अवस्था दाखवून देते. ज्या सभागृहात खर्गे यांच्या कार्यकर्त्यांची सभा होती, त्यात जेमतेम १०० लोक उपस्थित होते (आणि रामलीला मैदानावर राहुल गांधी पाच लाख लोक जमविणार आहेत!). काँग्रेसचाच एक कार्यकर्ता, "मोदी असे (निवडणुकीद्वारे) जाणार नाहीत, त्यासाठी विद्रोह करावा लागेल,” असे सांगत होता. पण, ‘मोदी जाणार नाहीत,’ इतके ऐकताच खर्गे यांचा संयम संपला. त्यांनी पुढचे वाय ऐकून न घेताच, ‘मोदी का बाप भी जाएगा’ असे दोन-तीनदा म्हटले. खर्गे यांनी मोदी यांच्यावर अनेकदा वैयक्तिक आणि असभ्य टीका केलेली आहे. मात्र, मोदींचा बाप काढून त्यांनी आपली कमालीची उद्विग्न मानसिकता उघड केली.
 
सहसा विरोधी पक्ष हे आंदोलन करतात आणि सत्ताधारी मजेत असतात. पण, आता सत्याच्या स्थापनेसाठी सत्ताधार्‍यांनाही जमिनीवर आंदोलन करावे लागत आहे, यावरून या अपप्रचाराचा प्रभाव किती असू शकतो, ते कळते. विरोधक जर असत्यासाठी आंदोलन करीत असतील, तर सत्ताधार्‍यांनी सत्याच्या स्थापनेसाठी आंदोलन केल्यास ते नक्कीच प्रभावी ठरेल.




संबंधित मजकूर