मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील काही व्यक्तींचे साटेलोटे आणि भ्रष्टाचार मोडून काढत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना नामांकित जागतिक कंपन्यांचे दर्जेदार टॅबलेट पीसी आणि डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी केली आहे. त्यांनी महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत पत्र लिहिले. (Amit Satam BMC School Tablets)
आ. अमीत साटम यांनी या पत्रात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅबलेट पीसी देण्याच्या उपक्रमाचे स्वागत केले. मात्र, विद्यार्थ्यांना दिले जाणारे टॅब हे प्रमाणित दर्जाचे नसून नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचेही नाहीत, असे नमूद केले. महापालिका शाळांमध्ये बसवण्यात आलेले डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल्सही नामांकित कंपन्यांचे नसून कमी दर्जाच्या कंपन्यांकडून पुरविले जात आहेत. त्यामुळे अनेक तक्रारी येत आहेत. काही कंपन्या महापालिकेला कमी दर्जाची उपकरणे चढ्या दराने पुरविणाऱ्या साटेलोट्याचा भाग असल्याचे दिसते, असा दावा त्यांनी केला. (Amit Satam BMC School Tablets)
शिक्षण विभागात काही व्यक्तींची मक्तेदारी
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम दर्जाची डिजिटल शिक्षण साधने मिळणे आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावरील दरतुलनेनुसार नामांकित कंपन्यांचे टॅब बाजारात जवळपास त्याच किमतीत उपलब्ध आहेत, जितका खर्च महापालिका गेल्या काही वर्षांपासून अनोळखी कंपन्यांच्या टॅबवर करीत आहे. महापालिकेला टॅब पुरविणाऱ्या सध्याच्या कंपन्या फारशा परिचित नाहीत. त्यांची उत्पादने केवळ महापालिकेला चढ्या दराने विकण्यासाठी तयार करण्यात आल्याचे दिसते. महापालिकेच्या शिक्षण विभागात काही व्यक्तींची मक्तेदारी असून, त्या अप्रत्यक्षपणे विभागाचा कारभार चालवित असल्याचेही माझ्या निदर्शनास आले आहे. शाळांच्या भूखंडांसाठीचे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण तयार करण्यातही या व्यक्तींची भूमिका होती. हे धोरण आता रद्द करण्यात आले आहे, असेही अमित साटम म्हणाले. (Amit Satam BMC School Tablets)
‘मेक इन इंडिया’ उपकरणे वापरावीत
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने जागतिक स्तरावर प्रतिष्ठा असलेल्या आणि भारतात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचीच डिजिटल शिक्षण उपकरणे महापालिका शाळांमध्ये वापरावीत. अनोळखी आणि संशयास्पद कंपन्यांऐवजी जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या, तसेच भारतात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे टॅब आणि डिजिटल शिक्षण साधने विद्यार्थ्यांना द्यावीत. त्यामुळे विक्रीनंतरची सेवा अधिक चांगली मिळेल आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेता येईल, असेही अमीत साटम आपल्या पत्रात म्हणाले. (Amit Satam BMC School Tablets)