ठाणे (Tata Power Badlapur Project) : शहरातील वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर उपाय म्हणून टाटा पॉवरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बदलापूरमध्ये साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले असून, रमेशवाडी ते जोवेली गाव परिसरातील कोंडेश्वर रोड येथे उपकेंद्र उभारण्यासह २२० केव्ही क्षमतेची भूमिगत केबल टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वीज परिवर्तन क्षमतेत १८० MVA ने वाढ होणार असून, बदलापूरकरांना अधिक सक्षम आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
बदलापूर शहरात निवासी आणि व्यावसायिक बांधकामांचा वेग वाढत असून, मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांमुळे भविष्यात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या वाढत्या मागणीमुळे वीजपुरवठा यंत्रणेवर ताण येत असून, भार व्यवस्थापनामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरचा हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. (Tata Power Badlapur Project)
प्रकल्पामुळे महावितरणच्या जुन्या उपकेंद्रांवरील भार कमी होण्यास मदत होईल. तसेच वाढत्या वीजमागणीच्या तुलनेत आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन शहराच्या भविष्यातील विकासाला चालना मिळेल. मुंबईनंतर बदलापूरमध्ये साकारण्यात येणारा हा प्रकल्प वीजपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (Tata Power Badlapur Project)
शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वाढत्या वीजमागणीच्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ज्युवेली येथे या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे आणि राज्य सरकारची मंजुरी मिळवण्यासाठी कथोरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. (Tata Power Badlapur Project)
“बदलापूरकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि स्वप्नपूर्तीचा आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, निवासी व व्यावसायिक विकास आणि भविष्यातील मेट्रो व महामार्ग प्रकल्पांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही गरज लक्षात घेऊन टाटा पॉवरच्या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रकल्पामुळे विद्युत परिवर्तन क्षमतेत १८० MVA ने वाढ होणार असून, महावितरणच्या जुन्या उपकेंद्रांवरील भार कमी होण्यास मदत होईल. परिणामी, बदलापूर आणि परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम व विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बदलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.” (Tata Power Badlapur Project)