मुंबई (Madras High Court Temple Entry Ruling) : तमिळनाडूतील आगमिक मंदिरांत गैर-हिंदू व्यक्तींना मुख्य देवतेबद्दल श्रद्धा व्यक्त केल्याशिवाय आणि मंदिराच्या रूढी व परंपरांचे पालन करण्यास सहमती दिल्याशिवाय प्रवेश करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयानुसार, हे हमीपत्र संबंधित मंदिराने ठरवलेल्या नमुन्यातच भरले पाहिजे. जे गैर-हिंदू या हमीपत्रावर स्वाक्षरी करणार नाहीत, त्यांना आगमिक मंदिराच्या ध्वजस्तंभाच्या पुढे जाता येणार नाही. ही व्यवस्था फक्त आगमिक मंदिरांपुरतीच मर्यादित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मदुराई येथील के. थंगम वेंकटेश यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती पी. मुरुगन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते हिंदू असल्याचे नमूद केले.
तामिळनाडूमधील अनेक आगमिक मंदिरांच्या विश्वस्तांनी आगमिक नियमांचे पालन करावे आणि संबंधित प्रतिज्ञापत्र न देणाऱ्या बिगरहिंदूंना ध्वजस्तंभाच्या पुढे जाण्यापासून रोखावे, अशी मागणी करण्याचा अधिकार याचिकाकर्त्याला असल्याचे न्यायालयाने म्हटले. अशा व्यक्तींना प्रवेश दिल्यास मंदिराची पवित्रता भंग होऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले. त्याचबरोबर धार्मिक प्रतीके धारण करणाऱ्या आणि संबंधित देवतेवर श्रद्धा नसलेल्या गैरहिंदूंना मंदिराच्या परिसरातही प्रवेश देऊ नये, असे देखील न्यायालयाने म्हटले. (Madras High Court Temple Entry Ruling)
न्यायमूर्तींनी सांगितले की, अलीकडच्या काळात नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. मदुराई मध्य मतदारसंघाचे आमदार बदरुद्दीन मुस्तफा निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच मीनाक्षी मंदिराच्या परिसरात गेले होते. तेथे योग्य सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याची तपासणी करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला होता. कुंभाभिषेकाच्या वेळी ते मंदिराच्या गोपुरमवरही चढले होते. त्याच आमदारांनी सनातन धर्म संपवून टाकला पाहिजे, असे विधान केले होते, ही बाब विडंबनात्मक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
समाजमाध्यमांवरील व्हिडीओची दखल
समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओचीही न्यायालयाने दखल घेतली. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती डोक्यावर टोपी घालून तिरुवन्नामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मंदिरातील भाविकांनी या प्रयत्नाला तीव्र विरोध केला. या वेळी हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाचे कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे एक मंत्री गैरहिंदूंसाठी आवश्यक असलेले प्रतिज्ञापत्र न देता तिरुचेंदूर मंदिरात प्रवेश करून गेल्याची बाबही न्यायालयाने निदर्शनास आणून दिली. (Madras High Court Temple Entry Ruling)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक