मोदी कहीं नहीं जाएगा!

    27-Oct-2026
 
Modi Kahin Nahin Jayega
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पाटण्यातील कार्यक्रमात त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने ‘मोदी कहीं नहीं जाएगा!’ म्हणत काँग्रेसला परवा आरसा दाखवला. पण, त्यावर खर्गे संतापून म्हणाले, "मोदी क्या, मोदी का बाप भी जाएगा!” यावरून केवळ काँग्रेसचा मोदीद्वेषच नव्हे, तर २०२९ मध्ये सत्ताप्राप्तीसाठीची अखेरची तडफडही समोर आली.
 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आता वयवर्षे ८४. म्हणजे, ‘जेन-झीं’साठी लढण्याचा आव आणणार्‍या पक्षाचा अध्यक्षच ८४ वर्षांचा! पण, शेवटी खर्गे हे नामधारी अध्यक्षच म्हणा. काँग्रेसची सगळी सूत्रे ही राहुल गांधींच्याच हाती. म्हणजे, राहुलच्या मातोश्रींनी जसे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ‘रिमोट कंट्रोल’वर नाचवले, अगदी तसेच आज राहुलही खर्गेंना ‘ऑपरेट’ करीत आहेत. थोडक्यात, काँग्रेसमध्ये उलटी गंगा वाहते. इथे ‘राहुल बोले, खर्गे चाले,’ अशी स्थिती. त्यामुळे खर्गेंच्या तोंडून जरी ‘मोदी का बाप भी जाएगा’ हे अवमानकारक उद्गार निघाले असले, तरी ही असंस्कृत भाषा, अपमानाची संस्कृती ही खर्गेंना मिळालेली गांधी घराण्याचीच देण! त्यामुळे वयोमानापरत्वे खर्गे असे काही नेहमीप्रमाणे बरळले असतील, एवढ्यापुरतेच याकडे न बघता, काँग्रेसचा सत्तेविना वर्षागणिक वाढता मोदीद्वेषच यातून स्पष्टपणे झळकतो. तसेच कितीही जोर लावला, तरी २०२९ साली आपण मोदींना निवडणुकीत पराभूत करू शकत नाही आणि राहुलला पंतप्रधानपदीही बसवू शकत नाही, याची पुरती जाणीव झाल्यानेच खर्गेंचा हा सगळा उथळ खळखळाट!
 
मोदींना आजवर कोणी, किती, कशा शिव्या घातल्या, याची खरेतर गणतीच नाही. कारण, दर तीन-चार महिन्यांनी विरोधकांची विफलता मोदींवरील अशा शाब्दिक हल्ल्यांतून उफाळून येते. मोदींवर इतके तोंडसुख घेऊनही, खोटेनाटे आरोप करून आणि आता तर अगदी आंदोलनांची लडी पेटवूनही मोदी सरकार अस्थिर होत नाही, हेच विरोधकांचे खरे दुखणे! त्यामुळे मोदींचे आणि या सरकारचे करायचे तरी काय, या एका प्रश्नामुळे विरोधकांना आताच नव्हे; तर अगदी २०१४ पासून पुरते पछाडलेले दिसते. मग काहींनी तर यंदा थेट ‘रिजीम चेंज’ वगैरेचे जाहीर समर्थन करीत मोदींविरोधात दंडही थोपटून बघितले. राहुल गांधींनी तर सर्वोच्च न्यायालयावरही मोर्चा नेला. पण, नेहमीप्रमाणे सगळाच फुसका बार. इतका फुसका की, राहुल गांधींना या आंदोलनाचा शीण घालवण्यासाठी म्हणे व्हिएतनामची वारीही करावी लागली. आता ही टूर झाल्यावर पुन्हा १ तारखेपासून आंदोलनाचा नूर त्यांच्यावर चढेल. मग आंदोलनाची पुन्हा उठाठेव. तोच तो थकवा आणि जगाच्या पाठीवर कुठे तरी विदेशवारी आणि जणू हेच त्यांचे जीवनचक्र. त्यामुळे राहुल गांधींपासून ते खर्गेंपर्यंत सगळ्या विरोधकांना येन केन-प्रकारेण सत्ता हस्तगत करण्याची सध्या एकच राजकीय घाई झालेली दिसते. त्यात खर्गेंकडे आता गमावण्यासारखे काही नाही, तर राहुल गांधींना २०२९ ही स्वत:ला सिद्ध करण्याची खरेतर शेवटची संधी ठरावी. कारण, २०१४ साली जेव्हा मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा राहुल गांधी होते ४३ वर्षांचे. म्हणजेच, २०२९ साली राहुल गांधी होतील ५९ वर्षांचे. पण, सलमान खानप्रमाणेच ‘बॅचलर लाईफ’ जगणार्‍या राहुल गांधींनाही वाटते, ‘अभी तो मैं जवान हूं!’ म्हणूनच, तर आपली ‘तरुण नेता’ ही प्रतिमा जपण्यासाठी ‘टी-शर्ट’वर दंड थोपटत आणि आंदोलनात कोपराने स्वपक्षीयांनाही बाजूला ढकलत ते शक्तिप्रदर्शन करताना दिसतात.
 
सांगण्याचा मुद्दा एवढाच की, २०२९ ही राहुल गांधींसाठी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची शेवटची संधी ठरण्याचीच शक्यता अधिक. कोणी म्हणेल, मोदीही २०२९ साली ७८ वर्षांचे होतीलच की! मग राहुल गांधी २०२९ साली ५९ वर्षांचे झाले, तर अडचण ती काय? पुढेही त्यांनाच संधी मिळूच शकते! पण, मोदी आणि राहुल गांधींच्या राजकीय प्रतिमेत जमीन-आसमानाचा फरकही लक्षात घ्यायला हवा. मोदींनी अथवा भाजपने कधीही स्वत:ला ‘तरुण नेता’ म्हणून वयाच्या तराजूत तोलून ‘प्रोजेक्ट’ केले नाही, तर कायमच ‘अनुभवी आणि विकासाची कास धरणारा नेता’ हीच त्यांची प्रतिमा राहिली. त्यामुळे मोदी वयाने तरुण नसले, तरी त्यांची ऊर्जा, त्यांची तरुणांशी संवाद साधण्याची हातोटी ही राहुल गांधींपेक्षा कैकपटीने उजवीच! याउलट, काँग्रेसकडे तर राहुल गांधींना प्रारंभीपासून ‘तरुण नेता’ यापलीकडे लावण्यासारखी दुसरी बिरुदावलीच नाही. त्यामुळे जेव्हा राहुल गांधी २०२९ साली ५९ वर्षांचे होतील, तेव्हा आजच्या तरुणाईने तरीही त्यांना ‘तरुण नेता’ म्हणून स्वीकारावे, ही अपेक्षाच मुळी फोल ठरते. पण, ‘राजकारणात ६० वर्षे म्हणजे तरुणच की!’ या मानसिकतेतून राहुल गांधी ७०, ८० अगदी ९० वर्षांचे झाले, तरी काँग्रेससाठी आजन्म ‘तरुण नेता’च म्हणून देशावर लादले जातील, हे वेगळे सांगायला नको. तसेच मग ‘राहुल गांधी नहीं तो प्रियांका सही’ असाही मानणारा काँग्रेसमध्ये मोठा वर्ग आहेच. अधूनमधून दबक्या आवाजातले हे सूर २०२९ मध्ये राहुल गांधींचे नेतृत्व अपयशी ठरल्यास अधिक बुलंद होऊ शकतात. केवळ काँग्रेसअंतर्गतच नाही, तर ‘इंडी’ आघाडीतील अन्य ज्येष्ठ नेत्यांकडूनही राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच. आताच काही ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी अननुभवी वाटतात. त्यातच चौथ्यांदा २०२९ साली राहुल गांधींच्या नेतृत्वात ‘इंडी’ आघाडी तोंडावर आपटली आणि त्यांना पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर केलेले नसले तरी त्याचीही नैतिक जबाबदारी ही राहुल गांधींच्याच माथी मारली जाईल. शिवाय, सध्या राजकीय पक्षाचे स्वरूप धारण न केलेल्या ‘सीजेपी’ने २०२९ मध्ये राजकीय पक्ष म्हणून मैदानात उतरण्याचे ठरविलेच, तर ‘तिसर्‍या आघाडी’च्या राजकीय चर्चांनाही तोंड फुटेल.
 
एकूणच काय, तर २०२९ हे राहुल गांधींसाठी ‘करो या मरो’चे वर्ष आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील चौथी आणि शेवटची संधी ठरण्याचीच दाट शक्यता. म्हणूनच, राहुल गांधींपासून ते खर्गेंपर्यंत विरोधकांचे एकच लक्ष्य ‘मोदी हटाव!’ मग त्यासाठी देशांतर्गत वातावरण पेटवायचे असेल अथवा परकीय अराजकवादी शक्तींशी हातमिळवणी करायची असेल, काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. कारण, त्यांच्यासाठी सत्ता ही केवळ गांधी घराण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची; पण भाजपसाठी सत्ता हे समाजपरिवर्तनाचे, विकासाचे साधन आहे. हाच मूलभूत फरक!
 
म्हणूनच देशवासीय हे नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने, मजबूत समर्थक म्हणून उभे आहेत. मोदींना मिळणार्‍या या विशाल जनसमर्थनामुळेच काँग्रेसला २०२९ची चिंता आतापासूनच सतावू लागली आहे. त्यातच भारताचा ना बांगलादेश झाला, ना नेपाळ आणि ना फ्रान्स! हे यश गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचे आणि मोदी सरकारवरील विश्वासाचेच! हाच प्रचंड जनविश्वास २०१४, २०१९, २०२४ आणि आगामी २०२९ मध्येही भक्कमपणे पाठीशी असल्यानेच ‘मोदी कहीं नहीं जाएगा!’ हेच चार शब्द भाजपने २०२९च्या निवडणुकीचे घोषवाक्य म्हणून वापरले, तर आश्चर्य वाटायला नको!
 
 -विजय कुलकर्णी
 




संबंधित मजकूर