भारताच्या मोबाईलनिर्मितीचे भविष्य

    27-Oct-2026
 
 
India Mobile Manufacturing
 
मोबाईल हे आज निव्वळ संवादाचे साधन राहिलेले नसून; तो अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञानावरील सार्वभौमत्वाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. भारतात लाखो फोन तयार होत असले, तरी स्वदेशी तंत्रज्ञान, घटक आणि ‘ब्रॅण्ड’ यांची कसोटी येत्या काळात पणाला लागणार आहे.
 
दि. २३ ऑक्टोबर २०२८ पर्यंत भारतात भारतीयांनी डिझाईन केलेले, भारतातच उत्पादित झालेले आणि भारतीय ‘ब्रॅण्ड’चे मोबाईल उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट केंद्रीय इलेक्ट्रॉनिस आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच जाहीर केले. या घोषणेचे स्वागत करताना, त्यामागील आव्हानही समजून घेतले पाहिजे. कारण, भारतात मोबाईल तयार होणे आणि मोबाईलनिर्मितीचे तंत्रज्ञान भारताच्या मालकीचे असणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी. पहिल्या आघाडीवर भारताने मोठी मजल मारली असली; तरी दुसर्‍या आघाडीवर मात्र मोठा पल्ला भारताला गाठायचा आहे.
 
२०१४-१५ मध्ये भारतात १८ हजार कोटी रुपयांचे मोबाईल फोन तयार होत होते. २०२४-२५ मध्ये हेच उत्पादन ५.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजे, दशकभरात भारतातील फोनचे उत्पादन जवळपास २८ पट इतके वाढले. मोबाईल फोनची निर्यातही याच काळात १ हजार ५०० कोटी रुपयांवरून दोन लाख कोटी रुपयांपर्यंत गेली. अधिकृत आकडेवारीनुसार, २०१४-१५ मध्ये देशातील एकूण मोबाईल मागणीपैकी ७५ टक्के फोन आयात केले जात होते; तर २०२४-२५ मध्ये आयातीचे प्रमाण हे अवघे ०.०२ टक्के इतकेच राहिले. देशात मोबाईलनिर्मितीची ३००हून अधिक उत्पादन केंद्रे कार्यरत आहेत. २०२५ या कॅलेंडर वर्षात ‘स्मार्टफोन’ ही भारताची सर्वाधिक मूल्याची निर्यात वस्तू ठरली; त्यांची निर्यात २.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. मात्र, या यशाचा अर्थ, भारत मोबाईलनिर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, असा होत नाही. भारतात तयार होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमधील देशांतर्गत मूल्यवर्धनाचा हिस्सा सध्या अंदाजे १८ ते २० टक्के असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. म्हणजे, मोबाईलची अंतिम जुळणी भारतात होत असली; तरी त्यातील अनेक महत्त्वाचे घटक, तंत्रज्ञान आणि उत्पादनासाठी लागणारे साहित्य हे विदेशातून येते. चीनने मोबाईलनिर्मितीत मिळवलेले वर्चस्व स्वस्त मजूर किंवा मोठ्या कारखान्यांच्या बळावर उभे राहिलेले नाही. चिप्स, डिस्प्ले, कॅमेरे, बॅटरी, सर्किट बोर्ड, कनेटर, सेन्सर आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक घटक यांचे उत्पादक अशी एकमेकांच्या जवळ असलेली संपूर्ण पुरवठा साखळी चीनने विकसित केली. एखाद्या मोबाईलची रचना बदलायची असेल किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवायचे असेल, तर आवश्यक ते सर्व घटक आणि पुरवठादार तिथे उपलब्ध असतात. परिणामी, उत्पादन खर्च कमी होतो, वेग वाढतो आणि नव्या तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादन लवकर सुरू करता येते. म्हणूनच, भारताला घटकनिर्मिती, संशोधन, उत्पादन, अभियांत्रिकी आणि पुरवठा साखळी यांचा एकत्रित विकास करावा लागेल.
 
अमेरिकेचे उदाहरण वेगळे आहे. अमेरिकेने डिझाईन, चिप आर्किटेचर, सॉफ्टवेअर, बौद्धिकसंपदा आणि ‘ब्रॅण्ड’च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला. ‘आयफोन’चे उदाहरण यासाठी महत्त्वाचे ठरते. ‘अ‍ॅपल’ची उत्पादने अनेक देशांतील पुरवठादारांच्या साहाय्याने तयार होतात; त्यांची अंतिम जुळणीही विविध देशांत होते. तरी उत्पादनाच्या डिझाईनपासून सॉफ्टवेअर आणि ‘ब्रॅण्ड’पर्यंतच्या महत्त्वाच्या बाबींवर ‘अ‍ॅपल’चे नियंत्रण कायम राहते. दक्षिण कोरियाने ‘सॅमसंग’च्या माध्यमातून मोबाईल ‘ब्रॅण्ड’बरोबरच मेमरी चिप्स, डिस्प्ले आणि अन्य इलेट्रॉनिक घटकांच्या उत्पादनातही स्थान निर्माण केले. या देशांकडून भारताने शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, उत्पादनाचे प्रमाण जसे महत्त्वाचे आहे; तसेच तंत्रज्ञान, बौद्धिकसंपदा आणि घटकनिर्मितीवरील नियंत्रणही महत्त्वाचे आहे.
 
आज भारतात ‘आयफोन’चे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे, ही या बदलाची सुरुवात आहे, असे म्हणता येईल. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतातील ‘अ‍ॅपल’च्या पुरवठा साखळीने सुमारे १.८९ लाख कोटी रुपयांच्या ‘आयफोन’चे उत्पादन केले आणि त्यापैकी अंदाजे १.५ लाख कोटी रुपयांचे ‘आयफोन’ निर्यात केले. ‘फॉसकॉन’, ‘टाटा इलेक्ट्रॉनिस’ आणि इतर उत्पादकांच्या कारखान्यांमुळे भारताची जागतिक मोबाईल उत्पादन साखळीतील भूमिका वाढली आहे. यावरून भारतात मोठ्या प्रमाणावर आणि जागतिक दर्जाचे उत्पादन करणे शक्य आहे, हे सिद्ध होते. मात्र, ‘आयफोन’ भारतात तयार होतो, म्हणून त्याचे डिझाईन, ‘ऑपरेटिंग सिस्टम’, प्रमुख बौद्धिकसंपदा आणि ‘ब्रॅण्ड’चे आर्थिक मूल्य भारताकडे आले, असे म्हणता येत नाही.
 
मग भारतीय कंपनी स्वतःचा मोबाईल का तयार करू शकत नाही? असे आहे का? तांत्रिकदृष्ट्या हे अशक्य नाही. भारतीय कंपन्यांनी यापूर्वीही मोबाईल बाजारपेठेत काम केले आहे. ‘लावा’ आणि ‘मायक्रोमॅस’सारखे भारतीय ब्रॅण्ड्स बाजारात आहेत. मात्र, जागतिक दर्जाचा मोबाईल तयार करणे आणि जागतिक बाजारपेठेत टिकणारा ‘मोबाईल ब्रॅण्ड’ उभा करणे यात फरक आहे. ग्राहकाला चांगला कॅमेरा, वेगवान प्रोसेसर, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, नियमित सॉफ्टवेअर अपडेट सुविधा, विश्वासार्ह सेवा आणि स्पर्धात्मक किंमत हवी असते. त्यासाठी उत्पादनावर एकदाच गुंतवणूक करून भागत नाही; संशोधन, चाचण्या, सॉफ्टवेअर, सुरक्षा, सेवा-जाळे आणि सातत्यपूर्ण उत्पादन विकासावर खर्च करावा लागतो. भारतीय ‘ब्रॅण्ड’ला फक्त तो स्वदेशी आहे म्हणून ग्राहक निवडतील, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे ठरेल. कारण, शेवटी हे उत्पादन गुणवत्तेत आणि किमतीतही स्पर्धात्मक असले पाहिजे.
 
‘सॅमसंग’सारख्या दक्षिण कोरियाच्या कंपनीने भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रकल्प उभे केले आहेत. ‘ओप्पो’, ‘विवो’ आणि ‘शाओमी’सारख्या चिनी ‘ब्रॅण्ड’चे फोनही भारतात तयार होतात; काही कंपन्या भारतीय करार-उत्पादकांच्या माध्यमातून उत्पादन वाढवत आहेत. मात्र, भारतात उत्पादन करणे म्हणजे, त्या कंपनीची मालकी, तंत्रज्ञान आणि नफा भारताच्या मालकीचा होणे नव्हे.
 
मोबाईल उद्योगात दूरसंचार, डिजिटल व्यवहार, वैयक्तिक माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न एकत्र आले आहेत. त्यामुळे भारतात तयार होणार्‍या मोबाईलच्या हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपर्यंतच्या सुरक्षाव्यवस्थेचे महत्त्व वाढत जाणार आहे. विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणे, यात काहीही चुकीचे नाही. जागतिक उत्पादन साखळीत सहभागी होणेही आवश्यक आहे. मात्र, तंत्रज्ञानासाठी एका देशावर किंवा मोजक्या पुरवठादारांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरू शकते. दि. २३ ऑटोबर २०२८ हे उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. भारताने ‘मोबाईलची जुळणी करणारा देश’ अशी आपली ओळख पुसत, ‘स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणारा आणि जागतिक दर्जाचे ‘ब्रॅण्ड’ उभारणारा देश’ होण्याकडे वाटचाल केली; तरच ‘मेक इन इंडिया’चे रूपांतर ‘डिझाईन इन इंडिया’ आणि ‘ओन इन इंडिया’त होणार आहे.
 
-संजीव ओक




संबंधित मजकूर