तेलंगणाला सहकार्य मात्र महाराष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

थुमिडीहेट्टी प्रकल्पाच्या उंचीवाढीचा संयुक्त समितीमार्फत अभ्यास; बुडीत क्षेत्रासह तांत्रिक बाबींची तपासणी होणार

    27-Oct-2026
Thumdibhetti Project
 
मुंबई (Thumdibhetti Project): तेलंगणातील थुमिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाच्या उंचीवाढीला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताचे संरक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. प्रकल्पाची उंची १४८ मीटरवरून १५२ मीटरपर्यंत वाढविण्याच्या तेलंगणा सरकारच्या प्रस्तावाचा महाराष्ट्र स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहे. यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांसह जलसंपदा विभागाच्या सचिवांची संयुक्त समिती स्थापन करून तांत्रिक बाबी आणि महाराष्ट्रातील संभाव्य बुडीत क्षेत्राचा आढावा घेतला जाणार आहे.
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवार, दि.२६ ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री उत्तमकुमार रेड्डी यांनी थुमिडीहेट्टी प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी महाराष्ट्राने मान्यता द्यावी, अशी विनंती केली. (Thumdibhetti Project)
 
यावेळी फडणवीस म्हणाले की, शेजारील राज्यांचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडविण्याची महाराष्ट्राची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे नुकसान होत नसेल आणि दुसऱ्या राज्याला त्याचा लाभ होत असेल, तर सकारात्मक निर्णय घेण्यास राज्याची हरकत नाही. मात्र, यापूर्वी दिलेल्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र अपेक्षेपेक्षा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रस्तावित उंचीवाढीचे परिणाम तपासूनच पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे. (Thumdibhetti Project)
 
प्रकल्पस्थळातील बदल, त्यामुळे बुडीत क्षेत्रावर होणारा परिणाम, संबंधित अभयारण्याचा समावेश आणि नदीपात्राबाहेरील आवश्यक जमिनीचे क्षेत्र या मुद्द्यांचा संयुक्त समिती अभ्यास करणार आहे. महाराष्ट्राच्या अभ्यासातील निष्कर्षांबाबत तेलंगणाला काही आक्षेप किंवा त्रुटी आढळल्यास दोन्ही राज्यांचे अधिकारी त्यावर चर्चा करतील. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचे मतही घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Thumdibhetti Project)
 
पाणीवाटप आणि वैधानिक मंजुरीशी संबंधित बाबी केंद्रीय जल आयोगाच्या कार्यक्षेत्रात येतात. आयोगाने महाराष्ट्राचा अभिप्राय मागितल्यानंतर राज्याकडून वस्तुस्थिती आणि तांत्रिक निष्कर्षांच्या आधारे भूमिका मांडली जाईल. संयुक्त समितीचा अभ्यास आणि दोन्ही राज्यांतील तांत्रिक चर्चा पूर्ण झाल्यानंतरच प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. (Thumdibhetti Project)
 
या बैठकीला महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तेलंगणाचे जलसंपदामंत्री उत्तमकुमार रेड्डी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, तेलंगणाचे मुख्य सचिव संजय जाजू, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव जयंत बोरकर, सचिव प्रकाश मिसाळ आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Thumdibhetti Project)
 
 




संबंधित मजकूर