मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला नवी मुंबईशी जोडणाऱ्या हवाई सेवेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चिपी-नवी मुंबई-चिपी या दोन्ही मार्गांवरील विमानसेवेसाठी १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. (Chipi-Navi Mumbai Flight Service)
केंद्र सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क योजनेअंतर्गत (आरसीएस) सामान्य नागरिकांना विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विमानतळांचा या करारात समावेश आहे. (Chipi-Navi Mumbai Flight Service)
या योजनेंतर्गत निश्चित केलेल्या हवाई मार्गांसाठी केंद्र सरकारकडून ८० टक्के, तर राज्य सरकारकडून २० टक्के व्यवहार्यता तफावत निधी दिला जातो. चिपी विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची जबाबदारी ‘फ्लाय ९१’ या कंपनीला देण्यात आली होती. मात्र, मुंबई विमानतळावर आवश्यक त्या वेळेचा विमान उड्डाण स्लॉट उपलब्ध न झाल्याने नियोजित सेवेत अडथळा निर्माण झाला. (Chipi-Navi Mumbai Flight Service)
या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाऐवजी नवी मुंबई विमानतळाचा पर्याय निवडण्यात आला आहे. चिपी-नवी मुंबई आणि नवी मुंबई-चिपी या दोन्ही मार्गांवरील विमानसेवेसाठी प्रत्येक आसनामागे सहा हजार २०० रुपये इतका व्यवहार्यता तफावत निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Chipi-Navi Mumbai Flight Service)
या अनुदानासाठी एका वर्षात १६ कोटी ७४ लाख ६२ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, या खर्चालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना नवी मुंबईशी हवाई संपर्क साधण्याचा पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पर्यटन, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला या हवाई सेवेचा लाभ होणार आहे. (Chipi-Navi Mumbai Flight Service)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.