समरसतेच्या वाटेवर...

    27-Oct-2026
 

Anand Salve 
 
नाशिक येथे स्थायिक असलेले आर्थिक क्षेत्राचे अभ्यासक, सामाजिक क्षेत्रातले व्यासंगी लेखक, उच्चपदस्थ अधिकारी असलेले आनंद साळवे यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला जागतिक बौद्ध धम्म परिषदेला जाण्यासाठी विमानतळावर आले. माधव साळवे हे त्या दिवशी विमानतळावर पोलीस म्हणून हजर होते. ते बाबासाहेबांना भेटले. त्यांना म्हणाले, "मीसुद्धा मागासवर्गीय समाजाचा आहे.” तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "पुढच्या पिढीला उच्चशिक्षण घेणे गरजेचे आहे. चतुर्थ श्रेणीच्या पदावर काम करण्याऐवजी मुले अधिकारी होतील, इतके शिकवा.” बाबासाहेबांचा विचार माधव यांच्या मनात रुजला. तसेच माधव हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनाही मुंबईत भेटले होते. त्यांच्या साहित्यातील नायकांचे गुण आापल्या मुलांमध्ये यायलाच हवे, या इच्छेने माधव यांनी मुलांवर संस्कार केले. या संस्कारांनी अभिभूत झालेले आनंद साळवे. ते आज भारतीय लेखा तथा लेखापरीक्षा विभागामध्ये (भारताचे महानियंत्रक) वरिष्ठ लेखापरीक्षा अधिकारी आहेत.
 
उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या आनंद यांनी स्वकर्तृत्वाने वैचारिक आणि साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. ‘ऑडिट’ क्षेत्रात भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख स्थापित आहेच. ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स इन इंडिया’, ‘फायनान्शिअल फ्रॅड अ‍ॅण्ड फेल्युअर ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स’, ‘एलओडीआर अंडर सेबी’, ‘बिझनेस अपॉर्च्युनिटी इन इंडिया’ अशी त्यांची पुस्तकेही प्रकाशित आहेत. ‘एमकॉम’, ‘एमएमएस’, ‘एलएलबी’पर्यंत शिक्षण घेतलेल्या आनंद यांचे ‘डिपे्रस अ‍ॅण्ड डायरेक्शन ऑफ शेड्युल कास्ट इन महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह इतर अनेक मान्यवरांनी, संघटनांनी, अगदी रा. स्व. संघानेही समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचा इतिहास मांडला आहे. आनंद यांच्या भूतकाळातील जीवनाचा मागोवा घ्यावाच लागेल.
 
मातंग समाजाचे माधव साळवे हे मूळचे चकलांबा गाव, गेवराई, बीडचे. कामानिमित्त ते अहिल्यानगरला आले. त्यांना विमलबाई आणि ताराबाई अशा दोन भार्या. दोघींना नऊ अपत्ये. पोलीस असलेले माधव हे नाथपंथी. सगळे कुटुंबच धार्मिक. समाजात कायदेशीर सलोखा राहावा, यासाठी माधव प्रयत्नशील होते. त्यामुळे परिसरात आणि समाजात माधव यांना मान होता. माधव हे आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांच्यासोबतही काम करायचे आणि रा. स्व. संघाच्या शाखेतही त्यांचे येणे-जाणे असे. मोठे अधिकारी किंवा राज्यपाल यांच्याकडे कामानिमित्त जायचे असेल, तेव्हा माधव हे आनंद यांना सोबत घेऊन जायचे. ‘तुलाही मोठेपणी असेच अधिकारी व्हायचे आहे. देशाचे मीठ खातो, तर त्या मिठाला जागायचे आहे,’ हे सांगायचे. याच संस्कारात आनंद संस्कारित होत होते.
 
पुढे आनंद हे मित्रामुळे रा. स्व. संघाच्या शाखेत जायला लागले. तिथे जयंत कुलकर्णी यांच्याशी मैत्री झाली. त्यावेळी प्रमोद कुलकर्णी हे संघाचे विभाग प्रचारक होते. संघाच्या शाखेत आनंद जायला लागल्याबरोबर काही लोकांनी त्यांना रा. स्व. संघाबद्दल काहीबाही आरोप केलेले पत्रक दिले. आनंद यांनी याबाबत जयंत यांच्याशी चर्चा केली. तेव्हा जयंत आणि समवयस्क स्वयंसेवक म्हणाले, "तुला काय अनुभव आला?” आनंद यांनी विचार केला की, संघात मला कधीच जातिभेद जाणवला नाही. देश आणि समाजाच्या समरसतेसाठी, कल्याणासाठी इथे विचार केला जातो. याचकाळात त्यांनी श्रीगुरुजींचे समग्र साहित्य वाचले. त्यांना वाटले की, काही लोक संघाबद्दल आणि त्यातही गुरुजींच्या विचारांबद्दल मुद्दाम गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळेच की काय, ‘अ‍ॅनालिसिस ऑफ गुरुजीस राईटिंग अ‍ॅण्ड स्पिचेस आणि सेंच्युरी ऑफ सर्व्हिस’ (‘आरएसएस वर्क अमंग एएसी, एसटी’) ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली आणि ही दोन्ही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
 
असो. शिक्षणासाठी आनंद बारावी इयत्तेत असल्यापासून सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या मुकुंद घैसास यांच्याकडे काम करू लागले. दरम्यान, त्यांनी ‘एमएमएस’चे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा जयंत कुलकर्णी आणि संतोष कुलकर्णी यांनी ‘अभाविप’च्या कोषातून पैसे द्यायचे, अशी भूमिका घेतली. आनंद यांनी शिक्षण पूर्ण केले. ‘अभाविप’च्या माध्यमातून त्यांनी स्कॉलरशिपसाठीही आंदोलन केले. पुढे घैसास यांच्या प्रयत्नातून ते ‘सीए’ उत्तम कदम यांच्याकडे कामाला लागले. दरम्यान, त्यांना याच क्षेत्राची सरकारी नोकरी लागली. त्यांचा विवाह रेजा यांच्याशी झाला. आनंद म्हणतात, "या देशात सर्व समाजाला आणि त्यातही वंचित समाजाला प्रगतीच्या मोठ्या संधी आहेत. या संधी मला वैचारिक आणि साहित्यिक माध्यमातून समाजासमोर मांडायच्या आहेत. द्वेष आणि निराशेने नव्हे, तर समरसतेच्या वाटेवर चालून सर्व प्रकारची समता स्थापित होऊन समाजाची प्रगती होईल, याची मला खात्री आहे.” द्वेष आणि विद्रोहापेक्षा संधीची समानता मिळवत समाजासाठी वैचारिक कार्य करणारे आनंद माधव साळवे यांच्यासारखे विचारवंत अभ्यासक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत.
 
-योगिता साळवी
९५९४९६९६३८




संबंधित मजकूर