मुंबई (ULLAS Portal Issues): उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, ही परिस्थिती तातडीने सुधारण्याची मागणी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. विशाल कडणे यांनी केली आहे.
रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी निरक्षर नागरिकांनी उल्लास अभियानाची परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी करून गुण नोंदविण्यासाठी शिक्षकांनी पोर्टलवर प्रयत्न सुरू केले. मात्र, पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी वेळेत प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. ओटीपीची वैधता केवळ दोन मिनिटांची असताना, काही शिक्षकांना तो बराच उशिरा मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. (ULLAS Portal Issues)
शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, रविवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरू झालेले प्रयत्न रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशी सोमवारपर्यंत सुरू राहिले, तरीही अनेकांना अपेक्षित काम पूर्ण करता आले नाही. तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचा वेळ खर्च होत असून, त्यांच्यावर अनावश्यक मानसिक ताण निर्माण होत आहे. (ULLAS Portal Issues)
दरम्यान, शिक्षकांनी परीक्षा घेण्याची आणि उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी पूर्ण केली आहे. आता पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे गुण नोंदविता येत नसतील, तर त्यासाठी शिक्षकांना जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. तांत्रिक यंत्रणेतील त्रुटींची शिक्षा शिक्षकांना मिळता कामा नये, असे डॉ. विशाल कडणे यांनी स्पष्ट केले. (ULLAS Portal Issues)
प्रमुख मागण्या कोणत्या?
उल्लास पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून ते सुरळीत सुरू करावे. पोर्टलमधील अडचणींमुळे गुण नोंदणी पूर्ण न करू शकलेल्या शिक्षकांना पुरेसा अतिरिक्त कालावधी द्यावा. तांत्रिक अडचणींमुळे झालेल्या विलंबासाठी कोणत्याही शिक्षकावर प्रतिकूल कारवाई करू नये. पोर्टलमधील अडचणींबाबत संबंधित विभागाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे. शिक्षकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रभावी हेल्पलाइन व तक्रार निवारण व्यवस्था सुरू करावी. भविष्यात अशा प्रकारच्या ऑनलाइन उपक्रमांची अंमलबजावणी करण्यापूर्वी पोर्टलची क्षमता, सर्व्हरची कार्यक्षमता आणि तांत्रिक तयारी यांची योग्य चाचणी घ्यावी. शिक्षक हे शिक्षणव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेताना आवश्यक तांत्रिक सुविधा, स्पष्ट सूचना आणि वेळेवर सहकार्य उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. पोर्टलमधील त्रुटींमुळे शिक्षकांना रात्रभर जागून काम करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे केवळ तांत्रिक समस्या म्हणून न पाहता शिक्षकांच्या वेळेचा, श्रमांचा आणि सन्मानाचा प्रश्न म्हणून पाहावे, अशा मागण्या मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने केल्या आहेत. (ULLAS Portal Issues)
तसेच उल्लास अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी शिक्षक सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींचे निराकरण न करता शिक्षकांवर कामाचा दबाव टाकणे योग्य नाही. संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून पोर्टल सुरळीत करावे, गुण नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी आणि शिक्षकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. (ULLAS Portal Issues)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....