मुंबई (India-Bangladesh Border Clash) : पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशातील वाळू तस्करांच्या एका गटाने भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाळू तस्कर आणि बीएसएफच्या जवानांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. मेखलीगंज विभागातील भोटबारी गावाजवळील सानियाजन नदी परिसरात ही घटना घडली. या संघर्षाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील सुमारे ३० ते ५० वाळू तस्करांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यांनी नदीतून वाळू खोदण्यास आणि दगड गोळा करण्यास सुरुवात केली, तेव्हा बीएसएफच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, या गटातील लोकांनी बांबूच्या काठ्या, लोखंडी सळ्या आणि अन्य शस्त्रांसह जवानांच्या दिशेने धाव घेतली. त्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी स्मोक ग्रेनेडचा वापर करून त्यांना मागे हटण्यास भाग पाडले. अखेर बांगलादेशातील या उपद्रवी व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये संघर्षादरम्यान लोक आरडाओरडा करताना दिसत आहेत. या घटनेमुळे भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (India-Bangladesh Border Clash)
सानियाजन नदीतून दीर्घकाळापासून वाळू आणि दगड काढले जात असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. बीएसएफकडून अधूनमधून कारवाई होत असली, तरी बांगलादेशातील लोक या साहित्याच्या उपशासाठी वारंवार नदीत प्रवेश करतात, असा स्थानिकांचा दावा आहे. मेखलीगंज परिसरातून सीमाभिंत जात असली, तरी सानियाजन नदी भारतीय हद्दीतून वाहते. नदीपात्रातून सातत्याने वाळू उपसल्यामुळे नदीचा प्रवाह बदलू शकतो आणि नदीचे पात्र जवळच्या किनाऱ्यांकडे सरकू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बेकायदा वाळू उत्खनन रोखण्यासाठी तसेच भविष्यात अशा संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. (India-Bangladesh Border Clash)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक