आजच्या तरुणांच्या हातातील मोबाईल हे केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही. तो त्यांचा वर्ग आहे, ग्रंथालय आहे, मनोरंजनाचे माध्यम आहे, मित्रांशी जोडणारा दुवा आहे आणि अनेकदा स्वतःला समजून घेण्याचा मार्गही आहे. हाताच्या बोटावर काही सेकंदांत माहिती मिळवणे, जगाच्या दुसर्या टोकावरील व्यक्तीशी जुळले जाणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एखादी गुंतागुंतीची संकल्पना समजून घेणे, हे आजच्या तरुणांसाठी असामान्य राहिलेले नाही.
‘जेन-झी’ही डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने विस्तारलेल्या वातावरणात फोफावलेली पिढी. तिच्यासाठी तंत्रज्ञान हे बाहेरून आलेले नवे कौशल्य नसून शिक्षण, मैत्री, मनोरंजन आणि कामाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या पिढीच्या डिजिटल तंत्रज्ञानवापराकडे केवळ व्यसन, आभासी जगाचे आकर्षण किंवा मोबाईलवरील अवलंबित्व या दृष्टिकोनातून पाहणे अपुरे ठरेल.
पण, इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तंत्रज्ञान वापरण्यात प्रावीण्य आणि सहजता असणे म्हणजे, त्याचा सुज्ञ वापर करता येतो का? माहिती सहज मिळणे म्हणजे, ती समजणे होय का? आणि कृत्रिम बुद्धिमत्तेकडून उत्तर मिळवणे म्हणजे, आपण ती गोष्ट शिकलेलो असतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना ‘जेन-झी’ आणि तंत्रज्ञान यांच्यातील नाते अधिक खोलवर समजून घेण्याची गरज आहे.
तंत्रज्ञान ही निवड नव्हे, तर जीवनाची पार्श्वभूमी
पूर्वीच्या पिढ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार टप्प्याटप्प्याने केला. रेडिओ, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोन यांचा वापर त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या काळांत वाढत गेला. ‘जेन-झी’च्या बाबतीत मात्र या बदलांचा मोठा भाग बालपणापासून किशोरावस्थेपर्यंतच्या महत्त्वाच्या विकासकाळात घडला.
आज अभ्यासाचे साहित्य ऑनलाईन मिळते, गृहपाठ डिजिटल माध्यमांतून दिला जातो, मित्रांशी संपर्क ‘व्हॉट्सअॅप’ गटांमधून टिकतो आणि मनोरंजनासाठी काही सेकंदांत असंख्य पर्याय उपलब्ध होतात. शिक्षण, संवाद आणि विरंगुळा यांच्यातील सीमारेषा त्यामुळे अधिक धूसर झाली आहे. उचित वापर केला, तर तंत्रज्ञान शिकण्याच्या संधी अधिक व्यापक आणि वैयक्तिक गरजांनुसार उपलब्ध करून देऊ शकते.
अशा परिस्थितीत मोबाईलपासून दूर राहणे, हा केवळ वैयक्तिक निर्णय उरत नाही. सामाजिक संपर्क, शैक्षणिक माहिती, बातम्या आणि दैनंदिन व्यवहार यांमध्ये सहभागी राहण्यासाठीही डिजिटल माध्यमांची गरज भासते. त्यामुळे तरुणांचा तंत्रज्ञानवापर समजून घेताना त्यांच्या वैयक्तिक सवयींबरोबरच ते ज्या वातावरणात जगतात, त्याचाही विचार करावा लागतो.
मेंदूला माहिती मिळते; पण विचार करण्याचा सराव होतो का?
एखादा विद्यार्थी अवघड प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो प्रश्नांची तर्कशुद्धता तपासतो, तो विश्लेषण करतो, तेव्हा त्याच्याकडून चुका होतात; तो पर्याय तपासतो, आधीचे ज्ञान आठवतो आणि नव्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. या प्रक्रियेत केवळ उत्तर सापडत नाही, तर समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होण्याची संधीही मिळते.
याउलट, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्वरित मिळत असेल, तर स्वतः प्रयत्न करण्याची गरज कमी भासू शकते. अडचण आली की, विचार करण्याऐवजी शोध घेणे; संभ्रम निर्माण झाला की, स्वतःचे आकलन तपासण्याऐवजी तयार स्पष्टीकरण स्वीकारणे किंवा दीर्घ मजकूर वाचून समजून घेण्याऐवजी त्याचा सारांश वाचून पुढे जाणे, या सवयी शिकण्याच्या प्रक्रियेला उथळ स्वरूप देऊ शकतात. तावूनसुलाखून ज्ञान न मिळवता, ते केवळ हाताच्या बोटांवर मिळवण्यात काहीतरी उत्कट हातून निसटून जाते.
याचा अर्थ, डिजिटल साधने वापरणार्या प्रत्येक तरुणाची वैचारिक गुंतवणूक आणि एकाग्रता कमी झाली आहे, असा नाही. तंत्रज्ञानाचा परिणाम त्याचा वापर कसा केला जातो, यात आहे. मुख्य प्रश्न, स्क्रीनसमोर तुम्ही वेळ किती घालवला, याचे महत्त्व नाही. त्या वेळेत मन नक्की काय करत आहे, हा अधिक निर्णायक प्रश्न आहे. विद्यार्थी माहिती समजून घेत आहे का? विचारांच्या लाटेत त्याला पोहता आले आहे का? विश्लेषण केले आहे का? स्मृतीच्या खजिन्यातून ढवळून काढले आहे का? त्याची बुद्धीची गुंतवणूक खरेच प्रामाणिक आहे का? स्वतःचे निष्कर्ष काढत आहे का? ज्ञान वर्धित झाले आहे का?
यावर अवलंबून असतो. तंत्रज्ञान या प्रक्रियेला मदत नक्की करू शकते; परंतु त्याची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही.
कृत्रिम बुद्धिमत्ता : शिक्षक, साहाय्यक की विचारांचा पर्याय?
पूर्वी एखादी माहिती शोधण्यासाठी अनेक संकेतस्थळे तपासावी लागत; आता ‘एआय’ साधनांना प्रश्न विचारून स्पष्टीकरण, उदाहरणे, सारांश आणि सरावासाठी प्रश्न मिळवता येतात. एखाद्या विद्यार्थ्याला गणितातील संकल्पना समजत नसेल, तर ती वेगळ्या उदाहरणांतून समजावून घेता येते. इंग्रजी लिहिण्याचा सराव करता येतो. मुलाखतीची तयारी करता येते. एखाद्या विषयावर विविध दृष्टिकोन जाणून घेता येतात. अशा वापरामुळे शिकण्यातील अडथळे कमी होऊ शकतात आणि विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी मिळू शकते. मात्र, ‘एआय’च्या मदतीने काम पूर्ण करणे आणि त्या कामातून कौशल्य आत्मसात करणे, यात फरक आहे.
समजा, एखाद्या विद्यार्थ्याने ‘एआय’च्या मदतीने सुंदर निबंध तयार केला. निबंध चांगला असू शकतो; पण त्यातील विचार स्वतःच्या शब्दांत मांडता येतात का? त्यातील माहितीची सत्यता तपासता येते का? त्यावर प्रश्न विचारले गेले, तर उत्तरे देता येतात का? पुढच्या वेळी मदतीशिवाय लिहिण्याची क्षमता वाढली आहे का? हे प्रश्न केवळ विद्यार्थ्यांसाठी नाहीत. व्यावसायिक जीवनातही ‘एआय’च्या मदतीने तयार केलेला अहवाल, सादरीकरण किंवा विश्लेषण प्रभावी दिसू शकते. पण, त्यामागील तर्क समजत नसेल, तर परिस्थिती बदलल्यावर त्याचा योग्य उपयोग करणे कठीण होऊ शकते.
ऑटोबर २०२६ मध्ये "Fortune'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात सर्वेक्षणानुसार, करिअरसंबंधी कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न केलेल्या ‘जेन-झी’ प्रतिसादकांपैकी ९२ टक्के जणांनी शिकण्यासाठी ‘एआय’ वापरल्याचे सांगितले; त्यातील ५७ टक्के जणांनी शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात लागू करण्यात अडचण येत असल्याचे नोंदवले. शिकण्याची साधने उपलब्ध असणे आणि शिकलेले प्रत्यक्ष व्यवहारात आणता येणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
‘शिकणे’ ही माहिती मिळवण्यापासून सुरू होणारी, नवे दृष्टिकोन आणि कल्पना विकसित करणारी, सरावातून पुढे जाणारी आणि अनुभवातून आत्मविश्वास मिळवणारी प्रक्रिया आहे. चिकित्सक विचार म्हणजे, केवळ मनात अधिक माहिती साठवणे नव्हे; तर आपले मन नव्या विचारांसाठी खुले करणे होय. ‘एआय’ पहिल्या टप्प्यात मोठी मदत करू शकते; पण प्रत्यक्ष कृती, चुका करून त्या सुधारणे, अभिप्राय आणि अनुभव यांची जागा घेणे तिला शक्य नाही.
-डॉ. शुभांगी पारकर