संक्रामक अर्थात संसर्गजन्य रोगांबद्दलच्या आजच्या लेखात आपण त्या रोगांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा संसर्ग हवा/वायू मार्फत प्रसारित होतो, पसरतो. सर्व संक्रामक रोगांचे मूळ हे एखाद्या संसर्गाची लागण झाली/होणे, हे आहे. हा संसर्ग विषाणूजन्य, जीवाणूजन्य, बुरशीजन्य इ. कारणांनी होतो. ज्या विषाणूमुळे किंवा जीवाणूमुळे तो रोग उत्पन्न होतो, त्यानुसार त्या लक्षणांमध्ये थोडा बदल होतो.
हवेतून प्रसरण होण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे- हवेतील जंतुसंसर्गाचे प्रमाण इतके असणे गरजेचे आहे की, जेणेकरून ते मनुष्य शरीरात शिरले की, त्याने व्याधी निर्माण होऊ शकते. व्याधी/रोगनिर्मिती सहसा लगेच होत नाही. काही दिवसांचा ‘इन्क्युबेशन पीरियड’ (म्हणजे शरीरात तो जंतुसंसर्ग शिरून, वाढून रोगनिर्मितीसाठी सक्षम होण्याइतपत निर्माण होणे) याला जेवढा कालावधी लागतो, तो.
काही वेळेस ‘अक्यूट इन्फेक्शन’ होते. म्हणजे तो जंतुसंसर्ग पटकन संपर्कामध्ये येतो, वाढतो आणि व्याधी निर्माण करतो. काही वेळेस तो जंतुसंसर्ग सुप्तावस्थेमध्ये शरीरात घर करून राहतो आणि त्याच्या वाढीसाठी पूरक अवस्था निर्माण झाली की, चटकन वाढून रोग उत्पन्न करतो.
हवेत सतत थोड्याफार प्रमाणात जंतुसंसर्ग असतोच. पण, दरवेळेस त्याने रोग निर्माण होईलच, असे नाही. विशिष्ट हवामानाच्या स्थितीमध्येच जंतुसंसर्गाची लागण आणि वाढ होते. म्हणूनच, विशिष्ट ऋतूमध्ये काही व्याधींची उत्पत्ती आपल्याला बघायला मिळते.
हवेतील जंतुसंसर्ग तसा लवकर पसरू शकतो आणि बर्याच लोकांना एकाच वेळेस बाधित करण्याची क्षमता त्यात असते. जंतुसंसर्गाने ग्रस्त व्यक्तीमध्येदेखील व्याधीची लक्षणे, स्वरूप लगेच उत्पन्न होत नाही. पण, त्यादरम्यान ती जंतुसंसर्गाने ग्रस्त व्यक्ती तो रोग पसरविण्याचे काम (कॅरिअर) ‘वाहक’ म्हणून करत असते. जंतुसंसर्गाचे (विषाणूजन्य, जीवाणूजन्य, बुरशीजन्य इ.) प्रसरण हवेतून होताना बर्याचदा प्रत्यक्ष संपर्क येणे, असणे महत्त्वाचे असते. औपसर्गिक रोग (कम्युनिकेबल डिसीज) याच पद्धतीने पसरतात. बाधित व्यक्ती ही ते जंतूवाहकाचे काम करते. त्या व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकेतून, श्वासातून ते पसरतात. बोलताना तोंडातून लाळेचे तुषार जर बाहेर पडले आणि समोरच्या व्यक्तीचा त्याच्याशी संपर्क आला, तर ते RESPIRATORY DROPLETS/ AEROSOL PARTICLES हवेतूनच इतर व्यक्तींच्या शरीरात प्रवेशित होतात. हे तुषार काहीकाळ बाह्य वातावरणात सक्रिय राहतात. काही कालांतराने त्यांची व्याधी निर्माण क्षमता संपते. सक्रिय असते वेळी इतर व्यक्तींच्या शरीरात जर ते प्रवेशले, तर मात्र ‘इन्क्युबेशन पीरियड’ संपल्यानंतर त्या व्यक्तीमध्येदेखील तो रोग उत्पन्न होऊ शकतो. म्हणूनच, औपसर्गिक रोगामध्ये इतरांशी कमीत कमी संपर्क ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
तोंडातील लाळ, शिंकातून, खोकल्यातून किंवा श्वासातून जर जंतुसंसर्ग पसरत असेल; तर आपली मुख विवरे (FACIAL ORIFICES जसे नाक-तोंड, कान-डोळे इ.)- ज्यामार्गे शरीरात शिरू शकतात, तो मार्ग झाकावा, संरक्षित करावा. म्हणूनच, शिंकताना-खोकताना तोंडावर-नाकावर हात ठेवावा, रुमाल धरावा किंवा टिश्यू/मास्क वापरावा. याने प्रसार थांबविण्याचे महत्त्वाचे काम उत्तमरीत्या घडते, घडू शकते.
रोगप्रतिकारशक्ती जर चांगली असली, तर औपसर्गिक रोगदेखील चटकन होत नाहीत. जंतुसंसर्गाशी संपर्क आला, तरी त्याचे व्याधीमध्ये रूपांतर होत नाही आणि जरी झालेच, तरी त्याची प्रखरता (इंटेन्सिटी) सौम्य असू शकते आणि आटोयात येणेही लवकर जमते. दूषित वायू, वातावरण, हवेत जंतुसंसर्ग, रोगसंसर्ग झालेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीबरोबर इतरांचा, विशेषतः कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांच्या संपर्क येणे, असणे हे चार महत्त्वाचे टप्पे आहेत. तेव्हाच संसर्गजन्य रोगांचा पटकन प्रसार होतो. दूषित वायू-हवेतून पसरणार्या विषाणूजन्य आजारांमध्ये गोवर, फ्लू, कांजिण्या, सर्दी-पडसे इ. रोगांचा समावेश होतो. ‘कोविड-१९’ हा साथरोगदेखील दूषित वायूमुळे (AIR BORNE DISEASE) आहे.
AIR BORNE BACTERIAL INFECTIOUS DISEASES मध्ये क्षय (टीबी), डांग्या खोकला (WHOOPING COUGH) आणि DIPHTHERIA चा समावेश होतो. फुलांच्या रजकणाने VALLEY इ. व्याधीदेखील उत्पन्न होतात. विषाणूजन्य संसर्गामध्ये हवेतील तापमानाचा खूप मोठा प्रभाव आहे.
थंड वातावरणामध्ये विषाणू चटकन वाढत नाहीत. त्यामुळे त्याने होणारा जंतुसंसर्ग तेव्हा झटकन पसरत नाही; पण दमट, उबदार वातावरणात विषाणू पटापट वाढू लागतात आणि उन्हामधून या व्याधींचे प्रमाण चटकन वाढते. म्हणून ‘ऑक्टोबर हिट’मध्ये किंवा एप्रिल-मेच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विषाणूंचे प्रमाण खूप असते, चटकन वाढते आणि व्याधी निर्माण करते. प्रथम लागण लागण्यासाठी बाह्य/इतर ग्रस्त रुग्ण संपर्क गरजेचा असतो. पण, त्यानंतर काही व्याधी या वरचे वर होत राहतात. अशा वेळेस दोन गोष्टी समजून घ्याव्यात :
१) संपूर्णतः जंतुसंसर्ग शरीरातून गेलेला नाही. त्याला वाढीसाठी पूरक कारणे उपलब्ध झाली की, ती व्याधी पुन्हा उत्पन्न होऊ शकते.
२) व्याधी क्षमता जेव्हा-जेव्हा कमी होईल/होते, तेव्हा-तेव्हा परिसरातील जंतुसंसर्गाला शरीर चंबुकासारखे आकर्षित करून घेते आणि व्याधी उत्पन्न होते (कधीकधी वारंवार). व्याधी क्षमता विशिष्ट अवयवाची किंवा ‘सिस्टम’ची (जशी श्वसनसंस्था, पचनसंस्था इ.) देखील कमकुवत असू शकते. तो अवयव नाजूक झालाय, असेच त्याला म्हणता येईल.
विविध संसर्गजन्य व्याधींची (AIR-BORNE DISEASES) लक्षणे थोडी-थोडी भिन्न असतात. बाकी जंतुसंसर्गानुसार त्याची चिकित्सादेखील वेगवेगळी असते. तसेच दूषित वायूमुळे केवळ संसर्गजन्य रोगच नव्हे; तर इतर व्याधीदेखील उत्पन्न होऊ शकतात. या सगळ्याबद्दल पुढील लेखात वाचूया. (क्रमशः)
-वैद्य कीर्ती देव
९८२०२८६४२९
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)