मुंबई (GPM College Student Protest) : जीपीएम महाविद्यालयातील गैरव्यवस्थापन, अपुऱ्या पायाभूत सुविधा, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि शैक्षणिक अनियमिततांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई महानगर आणि जीपीएम विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महाविद्यालयाच्या संचालकांना सादर करण्यात आले. संचालकांनी हे निवेदन स्वीकारून विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच, विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (GPM College Student Protest)
महाविद्यालयातील मूलभूत सुविधांची दुरावस्था, व्यवस्थापनातील त्रुटी आणि शैक्षणिक अनियमिततांमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करून त्यांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आंदोलनानंतर प्रशासनाने निवेदन स्वीकारून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्ष कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे.
अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले
“मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, महाविद्यालयातील गैरव्यवस्थेला पूर्णविराम मिळावा आणि विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी विद्यार्थी परिषद सातत्याने संघर्ष करत राहील. प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.” (GPM College Student Protest)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक