मतांतरणसोबतच राष्ट्रांतरण देखील मोठी समस्या : दत्तात्रेय होसबळे

    26-Oct-2026   
 
Dattatreya Hosabale Goa Book Launch
 
मुंबई (Dattatreya Hosabale Goa Book Launch) : भारतात मतांतरण करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा देवीदेवतांची पूजा न करण्याबाबत दबाव टाकला गेला. भारतात ३३ कोटी देवता आहेत, त्यात अन्य कुठल्या देवता वाढल्या तर त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. मात्र शास्त्र, संगीत, नृत्य हे धर्माशी जोडलेल्या ज्या गोष्टी आहेत ते तोडण्याच्या दृष्टीने जे राष्ट्रांतरण होत आहे, ही मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले.
 
मुंबई तरुण भारत आयोजित गोमांतक शुद्धीचो इतिहास पुस्तकाच्या कोकणी अनुवादाचे प्रकाशन दत्तात्रय होसबळे आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. (Dattatreya Hosabale Goa Book Launch)
 
याप्रसंगी व्यासपीठावर गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर, लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. मधु घोडकीरेकर, सामाजिक कार्यकर्ते देवराज गावडे, भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, एसएफसी इन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
उपस्थितांना संबोधित करताना सरकार्यवाह पुढे म्हणाले, धर्मभास्कर विनायक महाराज मसुरकर गोव्यातील परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी एक ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी केलेले कार्य सामान्य नव्हते. त्यामुळे मसुरकर महाराज गोव्यासाठी आणि तितकेच भारतासाठी प्रातः स्मरणीय आहेत. त्यांच्या कार्याची गंभीरता, त्याचे महत्व आजच्या पिढीच्या ध्यानात येणे कठीण आहे. गुरू तेगबहादुर यांच्या बलिदानाचे स्मरण सुद्धा दत्तात्रेय होसबळे यांनी यावेळी केले. (Dattatreya Hosabale Goa Book Launch)
 
पुढे ते म्हणाले, जो समूह आपल्या मूळ धर्मात येण्यासाठी तयार आहेत, त्यांच्यातील हिम्मत, आत्मविश्वास जागृत केला पाहिजे. घरवपासी होणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली पाहिजे. ते कुठे राहतील, त्यांच्या रोजगाराची व्यवस्था काय असेल यासाठी प्रयत्न झाले आहेत आणि पुढेही झाले पाहिजेत.
हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत. जातिभेद न होता हिंदू समाजाची निर्मिती व्हावी यासाठी शतकांपासून प्रयत्न सुरू आहेत. हिंदू समाजच असा आहे ज्यामध्ये गोत्र आहे. त्यामुळे घरवापसी झालेल्यांना आपले गोत्र, आपली जात कोणती असा प्रश्न पडणं स्वाभाविक असल्याचे दत्तात्रय होसबळे म्हणाले. (Dattatreya Hosabale Goa Book Launch)
 
गोमांतक शुद्धीचो इतिहास या पुस्तकाद्वारे गोव्यातील आजच्या पिढीसमोर कोंकणी भाषेत आणतोय हे मोठे कार्य आहे. या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी भाषांतर होणे देखील तितकेच गरजेचे आहे. आपल्या देशातील शुद्धीकरणाचा जो इतिहास आहे तो समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे दत्तात्रय होसबळे यांनी नमूद केले.
 
घरवापासी हा संघाचा अजेंडा नाही असे म्हणत सरकार्यवाह यांनी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधीजींच्या भूमिकेचा उल्लेख केला. ते म्हणाले, हिंदू कमी होत नाहीत तर शत्रूंची संख्या वाढते आहे, असे स्वामी विवेकानंद यांचे म्हणायचे. महात्मा गांधीजींनी सुद्धा रिलिजियस कन्व्हर्जनचा कधी स्वीकार केला नाही. आजच्या समाजाला हे पटवून देणे गरजेचे आहे. घरवापासी हा संघाचा अजेंडा आहे असा फेक narrative जे पसरवत आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचणे आवश्यक आहे. (Dattatreya Hosabale Goa Book Launch)
 
यहुदींच्या होलोकॉस्ट म्युझियमचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, यहुदीनी युरोप, अमेरिका यांसह जगभरात अनेक ठिकाणी होलोकॉस्ट म्युझियम तयार केले. होलोकॉस्ट म्युझियममध्ये नाझी लोकांनी यहुदींसोबत केलेल्या अत्याचारांचे प्रकटीकरण करण्यात आले आहे. यहूदीच्या पुढच्या पिढ्यांनी ते पहिले पाहिजे. कशाप्रकारे आपल्या पूर्वजांचे अतोनात छळ झाले, आणि त्यातही ते खंबीर उभे राहिले. या इतिहासातून शिकले पाहिजे.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दै. मुंबई तरुण भारतचे हिंदुत्व विभाग प्रमुख ओंकार मुळ्ये यांनी केले. पुस्तकाचा परिचय सामाजिक कार्यकर्ते देवराज गावडे यांनी करून दिला. पुस्तकाच्या अनुवादिका साहित्य अकादमी पुरस्कार (२०२३) प्राप्त सुनैत्रा जोग यांच्यावतीने अक्षता पुराणिक भट यांनी त्यांच्या मनोगताचे वाचन केले. कार्यक्रमादरम्यान सुनैत्रा जोग यांची कन्या स्निग्धा व नात किआरा यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाला स्थानिक गावडा समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन सहकार भारती गोवा अध्यक्ष अशोक गावडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने झाली. (Dattatreya Hosabale Goa Book Launch)
 
हिंदू ऐक्य ही काळाची गरज
 
गोव्याचा इतिहास वाचताना कदंब, आदिलशाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडासह अनेक राजवटींचा उल्लेख आढळतो. कदंबांचा काळ हा गोव्याचा सुवर्णकाळ होता. पोर्तुगीज राजवटीत इन्क्विझिशन झाले आणि गोमंतकीयांना भयंकर अत्याचार सहन करावे लागले. नवहिंदूंच्या इतिहासाविषयी पुस्तकाच्या लेखकाने सविस्तर वृत्तान्त लिहिला आहे. गोव्यात भाजप सरकार आल्यानंतर धर्मासाठी शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी पुराव्यांसह जनतेसमोर मांडल्या. या पुस्तकाने गोव्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. या कामगिरीबद्दल मी ‘ मुंबई तरुण भारत’चे अभिनंदन करतो. गोव्याचा इतिहास आपण सातत्याने लोकांसमोर आणला पाहिजे. पोर्तुगीज राजवट सुरू असतानाच मसूरकर महाराजांनी हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. गोव्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण हिंदू ऐक्य ही काळाची गरज आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी चिंबल येथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याच्या मागणीचा विचार करण्याबाबत आश्वासन देखील दिले. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा राज्य (Dattatreya Hosabale Goa Book Launch)
 
पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील लोकांना प्रचंड अत्याचार सहन करावे लागले. त्या काळातही गावडा, कुणबी आदी समाजांनी आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न केले. धर्मरक्षणासाठी गोव्यातून स्थलांतर करून केरळपर्यंत गेलेल्या हिंदूंनी आजही गोव्याशी आपले नाते टिकवून ठेवले आहे. मसूरकर महाराज आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या प्रयत्नांतून शुद्धीकरणाची चळवळ घडली. या शुद्धीकार्याचे स्मरण आपल्याला गावडा, वेळीप आणि कुणबी समाजांना बळकट करण्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे ठरले पाहिजे. - रमेश तवडकर, कॅबिनेट मंत्री, गोवा राज्य
 
‘गावडा’ हा शब्द कधीही न सुधारणारा किंवा ‘गुडघ्यात मेंदू असलेला’ अशा अवमानकारक अर्थाने विशेषण म्हणून वापरला गेला आहे. शणै गोंयबाब यांनी ‘सर्व गावड्यांना शिक्षण देऊन पंडित बनवूया,’ असे म्हटले होते. हे विधान जातीयवादी असल्याची टीका झाली. मी त्याला प्रत्युत्तर दिले तेव्हा गोयबाब यांचा मी बचाव करतो आहे अशी टीका झाली. रामाला केवळ चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला; माझ्या समाजाने मात्र दीडशे वर्षांचा वनवास भोगला आहे. अनेकदा एखाद्या हिंदू व्यक्तीच्या नातेवाइकांनी धर्मांतर केले असल्यास त्या व्यक्तीबद्दलही संशय घेतला जाई आणि तिला गावाबाहेर काढले जाई. अशा बहिष्कृत लोकांना सतत भटकावे आणि स्थलांतर करावे लागले. यांपैकी अनेकांचा बाप्तिस्माही झाला नव्हता. त्यांना हिंदू आणि कॅथलिक अशी दोन्ही नावे होती. पूल ओलांडून कॅथलिक भागात गेल्यावर ते कॅथलिक नाव वापरत; हिंदू भागात असताना हिंदू नाव वापरत. मसूरकर महाराजांनी आपल्या शिष्यांना चर्च दाखवले. तेथे धर्मगुरू लोकांवर पाणी शिंपडून त्यांचे धर्मांतर करत असल्याचे त्यांनी पाहिले. ‘आपणही लोकांवर पाणी शिंपडून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात का आणू नये?’ असा विचार पुढे आला आणि त्यातूनच शुद्धीकार्य पार पडले. - डॉ. मधु घोडकीरेकर, लेखक व सामाजिक कार्यकर्ते (Dattatreya Hosabale Goa Book Launch)ट
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर