मुंबई, : (Chandrashekhar Bawankule on Mallikarjun Kharge)एका परिवाराच्या मेहरबानीवर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिरवणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी १४० कोटी भारतीयांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत खालच्या स्तराची टिप्पणी करून असुसंस्कृततेचा कळस गाठला आहे, अशा शब्दात महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निषेध व्यक्त केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यभरात वातावरण तापले आहे. दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.(Chandrashekhar Bawankule on Mallikarjun Kharge)
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व कधी मोदीजींच्या मातोश्रींवर तर कधी पिताश्रींवर तर कधी स्वतः मोदीजींवर खालच्या स्तराची भाषा वापरतात. काँग्रेसचा जनाधार नष्ट होत आहेच परंतू, आता यांच्या नेतृत्वाच्या अश्या वक्तव्य व कृत्यांमुळे कार्यकर्तादेखील पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतो आहे."
नैतिक अधःपतन
"कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षाचा व चळवळीचा प्राण असतो. जेव्हा तुमच्या भूमिकेपेक्षा त्याने वेगळी भूमिका मांडल्यावर तुम्ही त्याचा अपमान करता आणि वैफल्यग्रस्त होऊन थेट देशाच्या पंतप्रधानांच्या वडिलांबाबत असभ्य टिप्पणी करता तेव्हा तुमचे नैतिक अधःपतन झालेले असते; बाकी औपचारिकता बाकी असते," असेही ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule on Mallikarjun Kharge)
प्रत्येक भारतवासी मोदी यांच्या पाठीशी उभा
"या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात कधीही पराभव दाखवला नाही. प्रत्येक भारतवासी मोदीजींच्या पाठीशी कालही उभा होता आजही उभा आहे आणि कायम उभा असेल. काँग्रेस मात्र आपल्या विनाशाच्या दिशेने वेगाने पाऊले टाकत जाईल," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.(Chandrashekhar Bawankule on Mallikarjun Kharge)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....