आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा

कांजूरमार्गमधील सिग्नल यंत्रणेत बिघाड, मुलुंड-ठाणेदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकल्याने लोकल विस्कळीत; नोकरदारांचे हाल


Central Railway Local Train Disruption 
 
मुंबई, : (Central Railway Local Train Disruption)आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याने नोकरदारांसह हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मुलुंड-ठाणे दरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये दुसरी तार अडकल्याने, तर कांजूरमार्ग येथील सिग्नलिंग यंत्रणेच्या कक्षात आग लागल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी, अनेक लोकल गाड्या २० ते ५२ मिनिटे विलंबाने धावल्या. काही गाड्या रद्द अथवा अंशतः रद्द करण्यात आल्याने गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कार्यालय गाठण्यासाठी अनेकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला.
 
सोमवार, दि.२६ रोजी सकाळी ९.२३ वाजता मुलुंड ते ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) वायरमध्ये बाहेरून आलेली दुसरी तार अडकल्याचे निदर्शनास आले. यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला. अडकलेली तार काढून दुरुस्ती करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून ब्लॉक घेण्यात आला. हे काम सकाळी १०.४८ वाजता पूर्ण झाले. मात्र, या घटनेमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले.(Central Railway Local Train Disruption)
 
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड-ठाणेदरम्यान ओव्हरहेड वायरवर बाहेरून आलेली तार पडल्याने लोकल सेवा प्रभावित झाली. ही तार हटविण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ब्लॉक घेतला.
 
दरम्यान, विक्रोळी-कांजूरमार्गदरम्यान कांजूरमार्ग येथील सिग्नलिंग मेंटेनन्स कक्षात आग लागल्याने सिग्नल यंत्रणाही प्रभावित झाली. त्यामुळे कांजूरमार्ग स्थानकातील तसेच विक्रोळी ते भांडुपदरम्यानचे स्वयंचलित सिग्नल बंद पडले. परिणामी, या मार्गावरील गाड्या नियंत्रित पद्धतीने चालवाव्या लागल्या. कांजूरमार्ग स्थानकावर आणि विक्रोळी-भांडुपदरम्यान गाड्या ‘ए-बोर्ड ऑथॉरिटी’च्या आधारे चालविण्यात आल्या. तसेच विक्रोळी ते भांडुपदरम्यान अ‍ॅब्सोल्यूट ब्लॉक पद्धत लागू करून गाड्यांना टीडी ९१२ प्राधिकरणानुसार पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.(Central Railway Local Train Disruption)
 
या सिग्नल बिघाडामुळे संबंधित मार्गावरील लोकल ३० ते ३५ मिनिटे किंवा त्याहून अधिक विलंबाने धावत होत्या. सिग्नलिंग कक्षातील आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. दोन्ही घटनांमुळे सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-कसारा आणि सीएसएमटी-कर्जत-खोपोली मार्गांवरील लोकल सेवांवर परिणाम झाला. तांत्रिक पथकांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले; मात्र, विस्कळीत वेळापत्रकामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
 
रुळांवरून चालत काढला मार्ग
 
सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल गाड्या बराच वेळ रखडल्याने प्रवाशांचा संयम सुटला. काही प्रवाशांनी गाड्यांमधून उतरून रेल्वे रुळांवरून चालत पुढील स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. काहींनी रेल्वे मार्ग ओलांडण्याचा धोकादायक पर्यायही निवडला. मुख्य मार्गावरील बिघाडाबाबत वेळेवर आणि पुरेशी उद्घोषणा होत नसल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली.(Central Railway Local Train Disruption)
 
हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरही गर्दी
 
मुख्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने ठाण्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा आधार घेतला. अनेक प्रवाशांनी ठाणे ते वाशी असा ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करून पुढे हार्बर मार्गावरून सीएसएमटी गाठण्याचा प्रयत्न केला. या पर्यायी प्रवासामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवरील गर्दीतही वाढ झाली.
 
कार्यालय गाठण्यासाठी प्रवाशांना तीन ते चार तासांपेक्षाही अधिक वेळ लागल्याचे चित्र होते. विशेषतः महिला प्रवाशांना गर्दी आणि वारंवार बदलावे लागणारे प्रवासमार्ग यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन तांत्रिक बिघाडांचा फटका बसल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा सोमवारचा प्रवास अक्षरशः त्रासदायक ठरला.(Central Railway Local Train Disruption)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर