पर्यायी मार्गाशिवाय शहाड पूल पाडू नका; आमदार कुमार आयलानी आक्रमक!

विद्यार्थी, व्यापारी, रुग्णवाहिका आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एमएमआरडीएसमोर ठाम भूमिका

    25-Oct-2026
 
Shahad Flyover Demolition
 
ठाणे : दिवाळीनंतर शहाड रेल्वे उड्डाणपूल पाडण्याच्या प्रस्तावित कारवाईला पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत स्थगिती द्यावी, अशी ठाम मागणी उल्हासनगर चे भाजप आमदार कुमार आयलानी यांनी एमएमआरडीए आणि संबंधित विभागांच्या संयुक्त बैठकीत केली. भवानी चौक (प्रेम ऑटो) ते शांतिनगर दरम्यान सुरू असलेला उड्डाणपूल युद्धपातळीवर पूर्ण झाल्यानंतरच शहाड पुलाच्या पाडकामाला सुरुवात करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.  (Shahad Flyover Demolition)
 
शुक्रवारी जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीला एमएमआरडीए, वाहतूक पोलीस, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहाड पूल महिनाभर दुरुस्तीसाठी बंद असताना नागरिकांना चार-पाच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याची आठवण करून देत, यापेक्षा मोठी समस्या निर्माण होऊ नये, असे आयलानी यांनी सांगितले.  (Shahad Flyover Demolition)
 
एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता भूषण म्हस्के यांनी बुद्धभूमी आणि पाम रिसॉर्ट परिसरातील जमिनीच्या प्रश्नामुळे कामाला विलंब होत असल्याचे सांगितले. मात्र, नवीन पूल उभारणीमुळे कोणाच्याही मालमत्तेला धक्का लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर आयलानी यांनी संबंधित वाद तातडीने सोडवून कामाला गती देण्याची सूचना केली.  (Shahad Flyover Demolition)
 
बैठकीत वाहतूक कोंडीच्या संभाव्य परिणामांबाबत वरिष्ठ स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले. नागरिकांची गैरसोय टाळल्याशिवाय पूल पाडण्याचे काम सुरू होणार नाही, असे आयलानी यांनी स्पष्ट केले. (Shahad Flyover Demolition)
 
शहाड येथे सुमारे एक किलोमीटर लांबीचा आणि १७ मीटर रुंदीचा चार पदरी नवीन पूल उभारण्याची योजना आहे. बैठकीला वाहतूक विभागाचे एसीपी सिद्धार्थ गाडे, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पीडब्ल्यूडीचे प्रशांत मानकर, उल्हासनगर महापालिकेचे संदीप जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Shahad Flyover Demolition)
 
 
 




संबंधित मजकूर