रा. स्व. संघ - मोदी विरोधाची ‘ओन्ली वन आयडिया; रेहान व्हाया राहुल’!

    25-Oct-2026   
 

Rehan Vadra Photo Controversy 
 
दिल्लीमध्ये ‘नो आयडिया इज फायनल’ हे प्रदर्शन, बिकानेर हाऊस येथील ‘सेंटर फॉर कंटेम्पररी आर्ट’मध्ये सध्या सुरू आहे. प्रदर्शनाच्या आयोजकांनी ठरवलेल्या नियमावलीनुसार, केवळ कला आणि संस्कृतीवर आधारित छायाचित्रांचाच यामध्ये समावेश असणार होता. या प्रदर्शनामधून आयोजकांनी प्रियांका वाड्रांचे सुपुत्र रेहान यांची काही छायाचित्रे वगळली. कारण, छायाचित्रे कला-संस्कृतीवर आधारित नसून राजकीय होती. आयोजकांनी नियमानुसारच रेहानची छायाचित्रे वगळली. मात्र, प्रियांका, राहुल आणि रेहान राग आलापत आहेत की, ‘नरेंद्र मोदी घाबरले म्हणून त्यांनीच प्रदर्शनामधून रेहानची छायाचित्रे वगळली.’ प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोदी आणि रा. स्व. संघाची निंदा करणे, हाच खेळ अनेक वर्षे काँग्रेस-विरोधी पक्ष करत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशाच अन्य काही घटनांचा आढावा घेणारा हा लेख...
 
प्रियांका वाड्रा आणि रेहान वाड्रा यांचे म्हणणे आहे की, रेहानच्या १०५ छायाचित्रांमधून, ७० छायाचित्रे प्रदर्शनातून काढून टाकण्यात आली. कारण, ती छायाचित्रे दिल्लीच्या जंतरमंतर आंदोलनावर होती. तर आयोजकांचे म्हणणे आहे की, "आम्ही आधीच सूचना दिल्या होत्या की, प्रदर्शन हे कला आणि संस्कृतीवर आधारित असेल, राजकीय अभिनिवेश असलेले काहीही यात ठेवले जाणार नाही. त्यामुळे दिल्ली जंतरमंतर आंदोलनावर आधारित छायाचित्रे वगळली गेली.” आता हे सगळे झाले. मात्र, वाड्रा आणि गांधी परिवाराला यातही संधी दिसली. त्यांनी याचे खापर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर फोडले. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कला आणि संस्कृतीवर आधारित छायाचित्रे हवी होती, रेहानला जंतरमंतरच्या आंदोलनामध्ये कोणती संस्कृती दिसली? कोणती कला दिसली? बीभत्सता, अश्लीलता आणि समाजद्वेष यापलीकडे त्या आंदोलनात काय होते? रेहानकडे छायाचित्रे काढण्याची कला असेलही. मात्र, कलेचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी करायचा की, समाजाला जखमा करण्यासाठी करायचा? याचे उत्तर रेहान देणारच नाही. कारण, ‘व्होटचोरी’ झाली असे बडबडत केंद्र सरकारवर बेछूट आरोप करणार्‍या राहुल गांधींकडे जेव्हा याबाबत पुरावा मागितला, तेव्हा ते म्हणाले की "मग व्होटचोरी झाली नाही, हे केंद्र सरकारने सिद्ध करावे.” तर, अशा मामाचा भाचा रेहान!
 
त्यामुळे आंदोलनावर काढलेली छायाचित्रे समाजासमोर काय आदर्श ठेवणार किंवा समाजाला त्यातून काय आनंद मिळणार, याचे उत्तर रेहान देणार नाहीच. मात्र, कांगावा जरूर करणार की, प्रदर्शनातील छायाचित्रे वगळून, त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली गेली, त्याचा आवाज दडपला गेला, हुकूमशाही आहे वगैरेवगैरे.
 
खरेतर दिल्लीच्या झुरळ आणि तत्सम आंदोलनाची छायाचित्रे काढणार्‍या रेहानची सर्जनशीलता आणि बौद्धिकता याबाबतच शंका येते. त्यातच रेहान वाड्रालाही आता रेहान गांधी म्हणूनही काँग्रेसींच्या डोक्यावर बसवण्याचा उपद्व्याप सुरू आहे. त्यामुळे रेहान हा त्याच्या मामासारखा म्हणजे राहुलसारख्याच बुद्धीचा (म्हणजे ‘मंद’ दाखवून ‘लबाड’ असलेली बुद्धी का, असा प्रश्न विचारू नका) असेल, तरीही काँग्रेसींना त्याचे समर्थन करावेच लागेल. हीच ती घराणेशाहीची मजबुरी! या मजबुरीच्या नादात हाताच्या बोटावर उरलेले काँग्रेसी, हे गांधी घराण्याची अगदी मनापासून मजदुरी करताना दिसतात. अर्थात, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न. पण, मुद्दा आहे तो रेहानच्या छायाचित्रांचा!
 
या छायाचित्रांवरून हेलिकॉप्टरमध्ये बसून, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची छायाचित्रे काढणार्‍या उद्धव ठाकरेंची आठवण झाली. शिवसेनेचे गटप्रमुख, शाखाप्रमुख गल्लीबोळांत-रस्त्यात संघर्ष करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे असेच छायाचित्रे काढून स्वत:चे नेतृत्व सिद्ध करत होते. सच्चा कलाकार नेहमीच स्वच्छंदी असतो, त्यांच्या कल्पनाशक्तीपुढे आकाश ठेंगणे असते, हे मान्यच. मात्र, देशात अराजकता माजवण्यार्‍यांची छायाचित्रे काढून त्यांचे प्रदर्शन करणे, यामागचा रेहानचा उद्देश काय? विकृतीचा आणि अश्लीलतेचा कळस गाठलेले झुरळ आंदोलन असू दे की, त्याच्या मामाने आणि आईने ‘एसआरए’ विरोधात आंदोलन करून, उगीचच रस्त्यावर पडणे असू दे, हे विषय रसिक कलाप्रेमींना काय आनंद देणार आहेत? यातूनच रेहान समाजासमोर काय मांडू पाहात आहे? हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात या सगळ्या प्रश्नांमागचे सत्य एकच आहे की, रेहानला युवानेता म्हणून ‘लॉन्च’ करण्यासाठीच हा सगळा उद्योग आहे.
 
रेहान भाजपविरोधी आंदोलकांवर प्रेम करतो, असेच या सगळ्यातून दाखवण्याचा उद्देश आहे. कारण, अभिजीत दीपकेसारख्या सुमार व्यक्तीच्या विकृततेसोबत जर त्याच्यासारख्याच मानसिकतेचे लोक जोडले गेले, तर गांधी घराण्याचे ‘ट्रम्पकार्ड’ हाताशी असलेल्या रेहानने का मागे राहावे? जंतरमंतरवर जमलेले कसे का असेनात; पण त्या लोकांची तरी साथ रेहानला मिळावी. तसेच मोदीविरोधात नेतृत्व म्हणून केवळ गांधी घराण्याकडे राहुल गांधी हेच पर्याय नाहीत; तर ‘जेन-झी’ रेहान वाड्रा-गांधीही नेतृत्वासाठी तयार आहे, असे भाजप-मोदी विरोधकांना माहिती पडावे यासाठीच हा रेहानच्या छायाचित्रांचा अट्टहास!
 
या सगळ्या घटनेवरून रेहानच्या आईबाबतचाही ‘पेंटिंग’ विवाद आठवला. हिंदू देव-देवतांचे नग्न चित्र काढणार्‍या एम. एफ. हुसेन याने, राजीव गांधींचेही चित्र काढले होते. हे पेंटिंग एम. एफ. हुसेनने १९८५ मध्ये, काँग्रेस पक्षाच्या शताब्दी सोहळ्यादरम्यान राजीव गांधी यांना भेट दिले. पुढे २०१० साली ’येस बँके’चे सहसंस्थापक राणा कपूर यांनी ते पेंटिंग दोन कोटी रुपयाला, प्रियांका गांधी यांच्याकडून विकत घेतले. पेंटिंग खरेदी-विक्री झाली, असे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, पुढे राणा कपूर यांनी आरोप केले की, ते पेंटिंग विकत घेण्यासाठी काँग्रेसी नेत्यांकडून दबाव आणला गेला होता. जर मी ते पेंटिंग विकत घेतले नाही, तर मला त्रास होईल आणि जर मी ते विकत घेतले; तर मला ‘पद्मश्री’ देण्यात येईल, असेही त्या नेत्यांनी सांगितल्याचे कपूर म्हणाले. तसेच, या पैशाचा वापर सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी न्यूयॉर्क येथे करण्यात आल्याचेही काँग्रेसी नेत्यांनी सांगितले. थोडक्यात, पेंटिंग काय, छायाचित्र काय? या माध्यमातून राजकारण आणि स्वार्थ साधणे काँगे्रसी नेत्यांना नवे नाही. या सगळ्यात कमाल वाटते, ती काँग्रेसच्या उरलेल्या जुन्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचीही. रेहानची छायाचित्रे हटवली म्हणजे, अभिव्यक्तिस्वांतत्र्यावर गदा आली, हुकूमशाही आहे, सरकार आम्हाला घाबरले आहे; असे म्हणणार्‍या या लोकांनी आणीबाणी पाहिली होती? राजकीय नेते, कार्यकर्ते, कलाकार, विचारवंत आणि साध्या नागरिकांनाही, काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीमुळे काय सहन करावे लागले, हे त्यांनी पाहिलेले आहे. त्यांना आणीबाणी, हुकूमशाही नवीन नाहीच मात्र, ते आता रेहानच्या छायाचित्रणाचा आधार घेऊन, केंद्र सरकारला हुकूमशाह ठरवत आहेत. बरे रेहानची छायाचित्रे स्थानिक आयोजकांनी नियमानुसार हटवली, यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय देणेघेणे? तरीही, ते या प्रकरणात मोदींवर आगपाखड करत आहेतच.
 
हे सगळे पाहून काही वर्षांपूर्वीची घटना आठवली. गोवंडीच्या डम्पिंग ग्राऊंडवर काही लोक अनधिकृतपणे राहात होते. प्यायला पाणी नाही, वीज नाही, शौचालय तर दूरची गोष्ट. मात्र, सपाचा अबू आझमी त्यांचा लोकप्रिय नेता होता. कारण, तो त्यांच्या कौमचा होता. मी या लोकांना विचारले, "तुम्हारे साहब (अबू आझमी), तुमच्यासाठी साधी पाण्याची व्यवस्था करत नाहीत?” यावर त्या लोकांचे म्हणणे होते, "साहेब पाण्याची लाईन आणण्यासाठी प्रयत्न करतात. पाण्याची लाईन जशी आमच्या घरापर्यंत यायला लागली की, तसा तो वर बसलेला आहे ना, तो ती कापून टाकतो.” मी विचारले, ‘तो म्हणजे कोण?’ ते म्हणाले, "तो म्हणजे मोदी. मोदी रात्रंदिवस बघत असतो. आमच्यापर्यंत पाण्याची लाईन आली की, लगेच तो लाईन कापून टाकतो. हिंदू सियासत हैं ना!” (हसावे, रडावे की, आणखी काही करावे हे मला त्यावेळीही कळले नव्हते आणि आताही नाही.) पण, ही घटना सांगण्याचे कारण की, या लोकांसारखीच काँग्रेसच्या नेत्यांची आणि त्यांच्या समविचारी राजकीय पक्षांची मानसिकता आहे. कुणीही काहीही केले आणि कुठेही काहीही झाले की, ते सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने शंख करतात. (त्यात विनाकारण रा. स्व. संघालाही ओढण्याचा प्रयत्न केला जातो.) असो! रेहानची छायाचित्रे ‘नो आयडिया इज फायनल’ या प्रदर्शनामध्ये आहेत. यावर वाटते की, रेहान आणि त्याच्या आजी, आई, मामासकट काँग्रेसी आणि समविचारी नेत्यांसाठी, ‘नो आयडिया इज फायनल’ हा संकल्प असूच शकत नाही. कारण, त्यांच्यासाठी ‘ओन्ली वन आयडिया इज फायनल’ आहे, ती म्हणजे रा. स्व. संघ, भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करत, केवळ सत्तेत यायचे खोटे स्वप्न पाहाणे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधीच्या भाच्याचा रेहानचा ‘लॉन्चिंग’ सोहळा पार पडत आहे. हे म्हणजे रा. स्व. संघ - मोदी विरोधाची ‘ओन्ली वन आयडिया; रेहान व्हाया राहुल’ असेच म्हणावे लागेल.
 
-योगिता साळवी
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर