कोल्हापूरातील तिलारीनगरमधून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध

    25-Oct-2026

tillarinagar kolhapur
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्रीच्या जैवविविधतेत आणखी एका नव्या प्रजातीची भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारीनगर परिसरातील निमसदाहरित जंगलात जमिनीवर राहणाऱ्या अतिसूक्ष्म गोगलगायीची नवी प्रजाती संशोधकांनी शोधली आहे (tillarinagar kolhapur). डायक्रॅक्स तिलारिएन्सिस’ असे या प्रजातीचे शास्त्रीय नामकरण करण्यात आले असून, तिचे इंग्रजी सामान्य नाव ‘तिलारी मायक्रो-स्नेल’ असे सुचविण्यात आले आहे (tillarinagar kolhapur). अमृत भोसले, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांनी केलेले हे संशोधन २४ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. (tillarinagar kolhapur)
 
 
 
तिलारीनगरमधील स्वप्नवेल पॉइंट परिसरात या प्रजातीचे नमुने आढळले. संशोधकांनी जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांवर नमुने गोळा केले. या गोगलगायीचे कवच, शरीररचना आणि दातांची रचना यांचा सूक्ष्म अभ्यास करून तिची स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख निश्चित करण्यात आली. या प्रजातीचे नमुने कोल्हापूर जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे ७३० ते ७४० मीटर उंचीवरील जंगलात आढळले. तिचे अस्तित्व सध्या याच परिसरापुरते नोंदविण्यात आले आहे.
 
 
 
या गोगलगायीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे अतिशय लहान आणि विशिष्ट आकाराचे कवच. संशोधनात नोंदविलेल्या नमुन्यांच्या कवचाची रुंदी सुमारे ४.२१ ते ४.८७ मिलिमीटर, तर उंची ३.०१ ते ३.५२ मिलिमीटर असल्याचे आढळले. कवचाचा रंग पांढरट ते फिकट तपकिरी छटेचा असून, त्यावर असलेल्या उंचवट्यांची आणि बरगड्यांची रचना या प्रजातीला इतर जवळच्या प्रजातींपासून वेगळे ठरवते. कवचाच्या आतील भागातील झाकणावर ठळक स्तनाग्रासारखा उंचवटा हेही तिचे एक वैशिष्ट्य आहे. या प्रजातीची तुलना पश्चिम घाट आणि दक्षिण भारतात आढळणाऱ्या डायक्रॅक्स वंशातील इतर चार प्रजातींशी करण्यात आली. त्यामध्ये डायक्रॅक्स देवरावासी ही भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक जवळची प्रजाती ठरली. मात्र, कवचाची उंची, त्यावरील बरगड्यांमधील अंतर आणि विशिष्ट उंचवट्यांची रचना यांमध्ये महत्त्वाचे फरक आढळले. त्यामुळे तिलारीतील गोगलगाय ही स्वतंत्र प्रजाती असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.
 
 
झाडांच्या पोकळ्यांमध्येही वास्तव्य
या गोगलगायीचे वास्तव्य समजून घेण्यासाठी संशोधकांनी तिच्या अधिवासाचाही अभ्यास केला. दाट वृक्षाच्छादन, जमिनीवर साचलेला पालापाचोळा आणि ओलसर माती असलेल्या निमसदाहरित जंगलात ही प्रजाती आढळली. जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीत झाडांच्या बुंध्यांजवळील माती, कुजलेली लाकडे, दगडांच्या खालचा भाग आणि पालापाचोळ्यात तिचे नमुने मिळाले. विशेष म्हणजे, सप्टेंबरच्या मध्यात परिसर तुलनेने कोरडा असतानाही संशोधकांना झाडाच्या पोकळीत साचलेल्या कुजलेल्या पदार्थांमध्ये, ओलसर मातीत आणि पालापाचोळ्यात या गोगलगायीचे १५ प्रौढ व अर्धवाढ अवस्थेतील नमुने आढळले. ही पोकळी जमिनीपासून सुमारे ३० ते ६० सेंटीमीटर उंचीवर होती. आजूबाजूच्या जंगलातील जमिनीच्या तुलनेत या पोकळीतील माती आणि कुजलेले पदार्थ अधिक ओलसर होते.





संबंधित मजकूर