डोंबिवली(Dombivli Water Shortage): निवासी भागातील पाणीटंचाईविरोधात रहिवाशांनी एमआयडीसी कार्यालयावर काढलेला आक्रोश मोर्चा आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांतून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया यांची प्रशासनाने दखल घेतली आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा सलग ३६ तासांचा शटडाऊन विभागून घेण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणे, पाणीचोरी व गळतीवर संयुक्त पथकाद्वारे कारवाई करणे आणि कूपनलिकांना अटी-शर्तींवर परवानगी देणे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर रहिवाशांनी आक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर गुरुवारी कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांनी रहिवाशांच्या प्रतिनिधींशी सुमारे सव्वा तास चर्चा केली. (Dombivli Water Shortage)
शटडाऊनचे २४ + १२ तास करण्याचा प्रस्ताव
पाणीपुरवठ्यासाठी सलग ३६ तास शटडाऊन घेण्याऐवजी आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी २४ आणि १२ तास असे विभाजन करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली. याबाबत जलसंपदा विभाग आणि वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले. मात्र, या बदलाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. (Dombivli Water Shortage)
पाणीचोरी, गळतीवर संयुक्त कारवाई
पाणीचोरी, अनधिकृत जोडण्या आणि पाइपलाइनमधील गळती रोखण्यासाठी एमआयडीसी, पोलीस आणि केडीएमसीचे संयुक्त पथक तयार करून कठोर कारवाई करण्याचे बैठकीत सांगण्यात आले. मिलापनगर तलावातील पाण्यावर प्रक्रिया करून ते इमारतींना दुय्यम वापरासाठी उपलब्ध करून देता येईल का, याचाही विचार करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. (Dombivli Water Shortage)
कूपनलिकांना परवानगी; जलकुंभाचे काम सुरू
एमआयडीसी हद्दीतील निवासी इमारतींना काही अटी-शर्तींवर कूपनलिका (बोअरवेल) उभारण्याची परवानगी देण्याबाबतही महत्त्वाची माहिती बैठकीत देण्यात आली. यामुळे पाणीटंचाईच्या काळात रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घरडा सर्कल येथील शिवाजी महाराज चौकाजवळ मोठ्या जलकुंभाचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठवण क्षमता वाढणार आहे.
या बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी श्रीकांत राऊत, औदुंबर आलाट, गणेश जंगले आणि निलेश गोपाळे यांच्यासह माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, विवेक देशपांडे, राजू नलावडे, संजय चव्हाण, हरी नायर, अश्विनी भंडारी आणि डॉ. सुनेत्रा जावकर उपस्थित होते. (Dombivli Water Shortage)