बस्तरची शोधयात्रा : प्रश्नांकडून उत्तराकडे!

    25-Oct-2026
 
Bastar Documentary
 
‘बस्तरची शोधयात्रा’ या माहितीपटाची निर्मिती, छत्तीसगढ-बस्तरमध्ये दंतेवाडा जिल्ह्यातील ‘बनफूल जनकल्याण समिती’तर्फे नुकतीच करण्यात आली. या माहितीपटाचे लोकार्पण पुण्यात आज होणार आहे. याविषयी अधिक माहिती देणारा हा विशेष लेख.
 
नक्षलवादाच्या छायेतील छत्तीसगढमधील दंतेवाडा परिसरात दोन तपांहून अधिक काळ वैद्यकीय सेवाकार्य करणे, हे आव्हानात्मकच कार्य. सर्वसामान्य व्यक्तीच्या कल्पनेपलीकडचे हे काम महाराष्ट्रातील डॉ. राम व सुनीता गोडबोले दाम्पत्य चिवटपणे करीत आहेत. सुनीताताई या मूळच्या पुण्याच्या, तर डॉ. राम गोडबोले हे सातारचे. शांतपणे व निरलसपणे चालणारे यांचे हे काम, प्रसिद्धी-पराङ्मुखतेमुळेच महाराष्ट्राला अपरिचित राहिले. आता या दाम्पत्याला यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार (वैद्यकीय सेवा) नुकताच प्रदान करण्यात आला. त्यामुळे प्रदीर्घ काळ सामाजिक कार्यात राहूनही अपरिचित असणार्‍या, या सेवासमर्पित दाम्पत्याचे कार्य ठळकपणे लोकांपुढे येऊ लागले. त्यातूनच लोकांच्या मनात बस्तरविषयी कुतूहल जागृत झाले. याबबात त्यांच्याकडे वारंवार विचारणा होऊ लागली. त्यामुळे बस्तरचे प्रश्न व तेथील आदिवासींचे भावविश्व चित्रफितीच्या माध्यमातून लोकांपुढे आणण्याचा चंग, ‘बनफूल’ परिवाराचे पुण्यातील कार्यकर्ते महेश भुस्कुटे यांनी बांधला. त्यासाठी पुण्यातून देणग्यांमधून आवश्यक निधीही त्यांनी उभारला. सुमारे दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे काम आता पूर्णत्वास गेले. त्यांच्या माहितीपटनिर्मिती करणार्‍या चमूने यासाठी बस्तरचे जंगल तुडवत, आव्हानात्मक परिस्थितीत अनेक फेर्‍या केल्या. याच्या दिग्दर्शिका विनिता अनगळ यांनी अभ्यासूपणे व बारकाईने बस्तरमधील वनवासींच्या प्रश्नांची मांडणी, त्याची कारणमीमांसा करत आदिवासींचे भावविश्व हळुवारपणे उलगडले. या माहितीपटाचे लोकार्पण रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य व ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश तथा भैय्याजी जोशी यांच्या हस्ते, स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आज रविवार, दि. २५ ऑटोबर संध्याकाळी ५ ते ८ यावेळेत होणार आहे.
 
बस्तरमधील अत्यंत प्रतिकूल व आव्हानात्मक परिस्थिती :
 
एकेकाळी मध्य प्रदेशचा भाग असलेला बस्तर जिल्हा, हा देशातील अत्यंत मागास म्हणून ओळखला जाई. आदिवासी जनजाती राहात असलेल्या अबुजमाडसारख्या प्रदेशात, त्याकाळी जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय प्रवेशही मिळत नसे. बस्तरच्या दंडकारण्यातला आदिवासी समाज हा अत्यंत पारंपरिक, चालीरीतींना कवटाळून बसणारा व भौतिकदृष्ट्या अतिमागास आहे. यांपैकी बहुतेक कुटुंबाचे अर्थकारणही हलाखीचेच असते. भौगोलिक दुर्गमतेमुळे हा समाज, मध्यवर्ती शहरी समाजापासून अगदी अलगथलग पडला. भौगोलिक दुर्गमतेमुळे शहरी समाज त्यांच्यापर्यंत पोहोचणे, ही बाबच दुरापास्त झाली होती. अंधश्रद्धा व आत्यंतिक रूढी-परंपरावादी दृष्टिकोनामुळे, आदिवासींवर आधुनिक उपचार करणेही आव्हानात्मकच असे. आजारपणाचा परिणाम त्यांच्या रोजंदारीवर होई. तुटपुंजी शिल्लकही हिरावल्याने, जगण्याचा स्तरही अधिकच खालावतो. अशांसाठी वैद्यकीय सेवेचे महत्त्व मोठेच. गंभीर आजारांच्या उपचाराबाबत नियमितपणे पाठपुरावा करणे, अत्यंत जिकिरीचे काम असते. यात अनेक प्रसंगी आदिवासी रुग्णाचा व त्याच्या कुटुंबीयांचा मिळणारा थंड प्रतिसाद, आपल्या भावनाच गोठवतो.
 
प्रश्नांच्या शोधयात्रेकडून उत्तराच्या दिशेने :
 
"बस्तरमधील आदिवासींचे शोषण, मलेरिया, माता व बालकांचे कुपोषण, भ्रष्टाचार, दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळणे हे प्रमुख प्रश्न. या सर्वांना शहरी समाजाचे झालेले दुर्लक्षच कारणीभूत. यातून मग एखादा आदिवासी बंदूक उचलण्यास राजी होतो. म्हणून, वर्तमानकाळात आपण या समाजाच्या उत्थानासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले पाहिजेत,” हे गोडबोले दाम्पत्याचे म्हणणे पटणारे आहे. सरकार आणि सुरक्षा दलांच्या मोहिमांमुळे नक्षलवादी संपतील; पण नक्षलवादाचे काय? तो मुळापासून संपण्यासाठी आपल्यालाच काम करावे लागेल. जनजाती समाजात आत्मभान येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील, हे सुनीताताईंचे म्हणणे विचार करण्यास लावते.
 
बस्तरच्या प्रश्नांमधून उलगडणारी ही शोधयात्रा, उत्तरात परिवर्तित होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. एकेकाळी महात्मा गांधींनी महाराष्ट्राला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हणून संबोधिले होते. आता महाराष्ट्राजवळ पूर्वीचा सेवाभाव आहेच, शिवाय नव्याने आलेली समृद्धीही आहे. अशा समृद्ध महाराष्ट्रने बस्तरमधील डॉ. गोडबोले दाम्पत्याच्या कामापाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे, हे वेगळे सांगायची गरज नाही.
 
-विवेक गिरीधारी
९४२२२३१९६७




संबंधित मजकूर