आयुष्मानचा ‘उडता तीर’ पैसावसूल!

    24-Oct-2026
 
Udata Teer Movie Review
 
भारत-पाकिस्तान संबंध हा हिंदी चित्रपटसृष्टीचा आवडता विषय. यावर अनेक चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. तथापि, दिग्दर्शक आकाश कौशिक यांचा आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘उडता तीर’ हा चित्रपट ‘आयएसआय’, हेरगिरी आणि दहशतवादासारखे गंभीर मुद्द्यांवर विनोदी आणि उपहासाच्या अंगाने भाष्य करतो. या चित्रपट भारत-पाकिस्तानमधील वैर मनोरंजक पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात तर्क आणि कारणांचा अभाव असला, तरी चित्रपट बघताना प्रेक्षकांना मजा मात्र नक्कीच येते.
 
चित्रपटामध्ये कथेची सुरुवातच रंजक पद्धतीने होते. यात भारतीय गुप्तहेर विक्रांत (आयुष्मान खुराना) आणि त्याची टीम, पाकिस्तानी दहशतवादी अझहर मकसूदला (मुकुल देव) पकडण्याच्या मोहिमेवर असतात. अझहरचा पाठलाग करताना, विक्रांत पाकिस्तानात प्रवेश करतो. पण, इथेच कथेला एक धक्कादायक वळण मिळते. तेव्हा हे उघड होते की, तो भारतीय गुप्तहेर विक्रांत नसून, भारतातून गुप्त माहिती गोळा करण्यासाठी पाठवलेला ‘आयएसआय’ एजंट बिलाल अहमद आहे. भारतात बिलाल आपली ओळख लपवून, भारतीय गुप्तचर सेवेतील गुप्तहेर म्हणून वावरत असतो. येथे तो त्याची आई (सुप्रिया पिळगावकर) आणि पत्नी यामिनी (सारा अली खान) यांच्यासोबत राहतो, तर पाकिस्तानात तो जनरल मीर (गुलशन ग्रोव्हर) आणि नियाझी (राम कपूर) यांना रिपोर्ट करत असतो. मात्र, जेव्हा त्याचे रहस्य उघडकीस येणारच असते, तेव्हा त्याचा अपघात होतो आणि तो आपली स्मरणशक्ती गमावतो, हाच चित्रपटातील रोमांचक क्षण आहे. पुढे आपली खरी ओळख विसरलेला बिलाल, स्वतःलाच खरा भारतीय गुप्तहेर विक्रांत समजू लागतो. आता विक्रांत त्याची स्मृती परत आल्यावर पुन्हा बिलाल होईल का? जेव्हा यामिनीला कळेल की तिचा नवरा एक देशभक्त गुप्तहेर नसून एका शत्रूंचा गुप्तहेर आहे, तेव्हा काय होईल? कथेचा शेवट काय असेल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहेत.
 
चित्रपटामध्ये भारत-पाकिस्तान तणाव आणि गुप्तचर कारवायांसारखा गंभीर विषय, हलया-फुलया पद्धतीने हाताळला आहे. तर्काच्या शोधात असलेले प्रेक्षक गोंधळतील; पण ज्यांना निव्वळ मनोरंजन हवे आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट फुल टाईमपास आहे. या कथेत ओळख पटवण्यातील चुका, देशभक्तीचा गोंधळ आणि अनपेक्षित खुलाशांमधून निर्माण होणारे अनेक विनोदी क्षण आहेत. ही परिस्थितीजन्य विनोदी शैलीच चित्रपटाची ताकद आहे. रहस्य, अ‍ॅक्शन आणि नाट्य यांचा मिलाप उत्तम जुळला आहे.
 
दिग्दर्शक आकाश कौशिक यांची कथा हेरगिरी, रहस्य आणि कौटुंबिक मनोरंजनाचे एक मिश्रण आहे. यात पाकिस्तानच्या राजकारणावरही उपहासातून व्यंग केले आहे. पंतप्रधान शरीफ यांचे जनरलच्या कार्यालयाबाहेर थांबणे, जनरलचा देवापुढे नतमस्तक होण्यास नकार आणि चीनचे आज्ञाधारक असणे अशी दृश्ये अतिशय विनोदीच. सुरुवातीस कथेचा वेग चांगला असला तरी कथा मध्यांतरानंतर थोडी मंदावताना दिसते, पण नंतर अनपेक्षित वळणे आणि मार्मिक संवादांमुळे पुन्हा वेग पकडते. बिलाल, जो विक्रांत म्हणूनही ओळखला जातो, त्याच्याच बोटांच्या टोकावर भारत आणि पाकिस्तानची संपूर्ण गुप्तचर यंत्रणा आहे; ही गोष्ट अविश्वसनीय असली, तरी आपले चांगलेच मनोरंजन करणारी ठरते.
 
लोकप्रिय चित्रपट, गाजलेली गाणी आणि अविस्मरणीय पात्रांच्या संदर्भांचा केलेला चातुर्यपूर्ण वापर, हेही चित्रपटाच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ‘तुझे याद ना मेरी आई’ यांसारख्या लोकप्रिय गाण्याला दिलेला नवा साजही, विनोदाला अधिक उठावदार करतो. संगीतामध्ये कथेच्या ‘मूड’ला साजेशी ‘उडता तीर’, ‘चुईजे’, ‘भूतनी का’ आणि ‘जय हिंद’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. चित्रपटाचा ‘लायमॅस’ अपेक्षित असला, तरी तो खटकत नाही.
 
आयुष्मान खुराना हा या चित्रपटाचा आत्मा आहे. त्याचं पात्र विनोदी असण्यासोबतच, अनेक नकारात्मक छटा आणि गुंतागुंतीने भरलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या गुप्तचर सेवांमध्ये सामील असलेल्या एका व्यक्तीचं खेळकर आणि मनोरंजक चित्रण, हे चित्रपटाचं मुख्य आकर्षण. मात्र, सारा अली खानला यात फार काही करण्यास मिळालेले नाही. दिवंगत मुकुल देव यांच्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट, त्यांच्या अभिनयाला वाहिलेली आदरांजलीच आहे. अझर मसूदची त्यांची आकर्षक भूमिका खळखळून हसवणारीच. राहुल बोस, राम कपूर, गुलशन ग्रोव्हर, ब्रिजेंद्र कला, सुहेल नय्यर आणि संदीप आनंद यांनीही आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
 
दिग्दर्शक-लेखक आकाश कौशिक यांनी देशभक्ती, अ‍ॅक्शन, रहस्य आणि विनोदीचा मिलाप साधणारा एक मनोरंजक चित्रपट सादर केला. चित्रपट काही ठिकाणी संथ वाटला, तरी प्रभावी आहे. चित्रपटातील दमदार वळणे, राहुल बोसचा अप्रतिम विनोदी अभिनय आणि आयुष्मानची अनोखी शैली या उणिवा भरून काढतात. एकूणच काय, तर ‘उडता तीर’ हा पैसा वसूल सिनेमा आहे.
 
निर्माता : करण जोहर, आदर पुनावाला, अपूर्व मेहता, गुनीतमोंगा कपूर
दिग्दर्शक : आकाश ए कौशिक
कलाकार : आयुष्मान खुराना, सारा अली खान, राम कपूर, मुकुल देव, राहुल बोस, गुलशन ग्रोवर, सुप्रिया पिळगावकर
अवधी : २ तास २० मिनिटे
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर