मध्य-पूर्वेतील पायाभूत सुविधा विकासाच्या बदलत्या समीकरणांमध्ये, जॉर्डनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले. संयुक्त अरब अमिराती अर्थात ’यूएई’च्या सहकार्याने उभारण्यात येणार्या २.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या, ’अकाबा-अल-शिदिया-मआन’ रेल्वे प्रकल्प भूमिपूजननाचा समारंभ पार पडला. खनिज उत्पादन क्षेत्रांना लाल समुद्रावरील अकाबा बंदराशी जोडणारा हा प्रकल्प, जॉर्डनच्या खनिज निर्यात व्यवस्थेचे आधुनिकीकरण, ‘लॉजिस्टिस’ खर्चातील कपात आणि प्रादेशिक व्यापारातील स्थान बळकट करणार्या व्यापक धोरणाचा भाग आहे.
जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या उपस्थितीत, दि. ५ ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. जॉर्डन-‘यूएई’ रेल्वे कंपनीमार्फत विकसित होणार्या या प्रकल्पात सुमारे ४०३ किलोमीटर लांबीचे रेल्वेजाळे, ५५ पूल आणि सहा बोगद्यांचा समावेश आहे. यातून दक्षिण जॉर्डनमधील खनिज उत्पादन केंद्रे, ‘मआन लॉजिस्टिस झोन’ आणि अकाबा बंदर यांच्यात, मालवाहतूक साखळीनिर्मितीचा प्रयत्न आहे.‘फॉस्फेट’ आणि ‘पोटॅश’ ही जॉर्डनच्या प्रमुख खनिज निर्यातपैकी एक. यांच्या मोठ्या प्रमाणावर आणि नियमित वाहतूकीसाठी रेल्वे हा अधिक सक्षम पर्याय ठरेल. कारण, अवजड मालाच्या वाहतुकीत प्रतिटन वाहतूक खर्च, इंधन, वाहनांची उपलब्धता आणि वाहतुकीचा कालावधी हे घटक थेट परिणाम करतात. या रेल्वेमार्गावरून दरवर्षी सुमारे १६ दशलक्ष टन खनिजांच्या वाहतूकीचे लज्क्ष्य असून, ‘फॉस्फेट’ आणि ‘पोटॅश’च्या वाहतूक खर्चात वार्षिक सुमारे ४० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची बचत होईल. मात्र, या बचतीचे प्रत्यक्ष प्रमाण रेल्वेच्या वापराचे प्रमाण, मालवाहतुकीचे नियोजन, परिचालन खर्च आणि बंदर हाताळणी कार्यक्षमतेवर अवलंबून असेल.रेल्वेच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी, नियमित मालपुरवठा, दीर्घकालीन मालवाहतूक करार, कार्यक्षम टर्मिनल व्यवस्था आणि रिकाम्या मालगाड्यांच्या फेर्या कमी करण्याचेही नियोजन आवश्यक असते. या बाबी प्रभावीपणे हाताळल्यास एकूण ‘लॉजिस्टिस’ खर्च कमी होतो. शिवाय, खनिज निर्यातीसाठी विश्वासार्ह वाहतूक व्यवस्थाही विकसित होते.
या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक म्हणजे, ‘मआन लॉजिस्टिस झोन’चा प्रस्तावित विकास! ड्राय पोर्ट, सीमाशुल्क सुविधा, औद्योगिक उपक्रम आणि माल साठवणुकीच्या सुविधांमुळे, हा परिसर अंतर्गत मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होईल. ड्राय पोर्टमुळे, सीमाशुल्क आणि माल हाताळणी प्रक्रिया बंदराच्या आतील भागातच करता येतात. यामुळे बंदरावरील गर्दी कमी करणे, मालसाठवणूक अधिक कार्यक्षम करणे आणि वाहतुकीच्या विविध टप्प्यांतील समन्वय वाढविणेही शक्य होते.
जागतिक ‘लॉजिस्टिस’ व्यवस्थेत बंदरांची क्षमता आणि त्याला जोडलेल्या अंतर्गत वाहतूकीच्या कार्यक्षमतेचा परस्पर संबंध असतो. रेल्वे, रस्ते, गोदामे, सीमाशुल्क प्रक्रिया आणि जहाजांच्या वेळापत्रकांमध्ये समन्वय नसल्यास, मोठ्या रेल्वेमार्गातून अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नाहीत. त्यामुळेच ‘अकाबा-मआन’ प्रकल्पाचे यश एकात्मिक ‘लॉजिस्टिस’ प्रणाली म्हणूनच, त्याच्या विकासावर अवलंबून राहील.
या प्रकल्पात अबुधाबीच्या ‘एल’इमाद होल्डिंग’चा ५० टक्के हिस्सा असून, उर्वरित हिस्सा जॉर्डनच्या चार भागधारकांचो आहे. यामध्ये ’जॉर्डन फॉस्फेट माईन्स’ कंपनी, ’अरेब पोटॅश’ कंपनी, सरकारी गुंतवणूक व्यवस्थापन संस्था आणि सामाजिक सुरक्षा गुंतवणूक निधीचा समावेश आहे. ‘एतिहाद रेल’कडून रेल्वे विकास आणि संचालनातील अनुभवाचे सहकार्य मिळणार आहे.
जॉर्डनने भविष्यात याचा विस्तार सीरियाच्या दिशेने भूमध्य समुद्रावरील बंदरांपर्यंत, तसेच सौदी अरब आणि आखाती देशांशी संपर्कासाठी करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. हे प्रत्यक्षात झाल्यास जॉर्डन पूर्व भूमध्य समुद्र, लाल समुद्र आणि आखाती बाजारपेठांदरम्यान मालवाहतुकीचा दुवा म्हणून विकसित होईल. एकूणच, ’अकाबा-अल-शिदिया-मआन’ रेल्वे प्रकल्प, जॉर्डनच्या पायाभूत सुविधा धोरणाचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, प्रकल्पाचे खरे यश हे वेळेत अंमलबजावणी, परिचालन कार्यक्षमता, प्रत्यक्ष खर्चबचत आणि सातत्यपूर्ण मालवाहतूक यांच्यावरच निर्भर असणार आहे.