आपल्या कौशल्य आणि चिकाटीच्या बळावर ‘क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्|’ या तत्त्वाने संस्कृतसाठी अखंड सेवारत डॉ. हर्षदा जोशी-सावरकर यांच्याविषयी...
ठाणे शहर तेव्हा तसे छोटेच होते. बर्यापैकी सोयीसुविधा असल्या, तरी त्या सर्वत्र पोहोचल्याच होत्या, असे नाही. तेथील लहान-लहान मुलांनी उंच उडायची स्वप्ने पाहण्याआधीच, त्यांना मर्यादांची बंधने घालून पंख छाटले जात. त्यांच्या आयुष्यात केवळ अंधार असे. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत, पाठांतरावरच भर देत ही मुले शिकत. अशाच परिस्थितीशी सामना करत, डॉ. हर्षदा जोशी-सावरकर मात्र मेधावी बुद्धीच्या जोरावर आज संस्कृतमध्ये ‘डॉक्टरेट’ पदवीपर्यंत पोहोचल्या आहेत.
जोशी घराणे हे वाडवडिलांपासूनच बुद्धिवादी. हर्षदा यांचे आजोबा संस्कृतचे मोठे जाणकार आणि वडीलही पौरोहित्य करणारे. त्यामुळे हर्षदांच्या कानांवर संस्कृत पहिल्यापासूनच पडत होते. परिणामी, लहान वयातच त्यांना मराठीसह संस्कृतचीही गोडी लागली. हर्षदा यांनी त्यांची बलस्थाने लहानपणीच चांगली पारखली होती. त्यांनी शालेय जीवनातच संस्कृत क्षेत्रात काहीतरी करण्याचा निश्चय केला. त्यामुळे दहावीला चांगले गुण मिळवल्यावर नातेवाईकांच्या विज्ञान शाखेत जाण्याचा आग्रह झुगारून, त्यांनी कला शाखेचीच निवड केली. परंतु, संस्कृतातून पदवीची सोय तेव्हा ठाण्यात नसल्याने, त्यांनी मुंबईच्या ‘रुईया’ महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘रुईया’तील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे, हर्षदा यांना संस्कृतचा खरा आवाका आणि भविष्यातील संधी समजल्या.
हर्षदा पहिल्यापासूनच अभ्यासू. पण, त्यांच्या कष्टांना त्यांच्या गुरूंनी दिशा दिली आणि त्यांना संस्कृत व्याकरणाची वाट सापडली. प्रत्येक शब्दरूपाच्या, धातूच्या मुळाशी जाऊन त्याचा विचार करण्याचे त्यांच्या मेंदूवर भिनवले गेले. त्यातूनच त्यांच्या चौकस वृत्तीने झेप घेतली. व्याकरण अभ्यासातून हर्षदा यांनी संस्कृत भाषेतील मौज अनुभवली. पुढे व्याकरणातच ‘पदव्युत्तर’ पदवी पूर्ण करून, त्या तत्कालीन ‘भारतीय संस्कृतिपीठम्’ म्हणजे आताच्या सोमय्या विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजूही झाल्या. पुढे त्या संस्कृत आणि इंग्रजी पुस्तकांचे लिखाण, मुद्रितशोधन आणि संपादनकार्यही शिकल्या. याच काळात त्यांना ‘इंटर-रिलिजियस यूथ डायलॉग’मध्ये, हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इटलीला जाण्याची संधी मिळली. तेथे जगभरातील तरुणांशी संवाद साधताना, इतर धर्म-पंथांची माहिती मिळवताना हर्षदा यांना, आपल्या धर्माचे-धर्मग्रंथांचे महत्त्व अधिकच प्रकर्षाने जाणवले. शिवाय, परदेशांत ‘रामायण’-‘महाभारत’ ग्रंथांविषयी असलेली उत्सुकताही जाणवली.
यातून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर, हर्षदा मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग आणि ‘चाणय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज’मध्ये शिकवू लागल्या. एखादा नवीन विषयही नेमकेपणाने शिकवणे, हीही त्यांचे बलस्थान. अखंड वाचन, टिपणे काढणे, अशी त्यांची साधना अहोरात्र सुरुच असते. यामुळेच शिकवताना, विविध ग्रंथांमधील संदर्भजोड देण्यात हर्षदा यांचा हातखंडा आहे. हर्षदा यांचा अभ्यास लिष्ट ग्रंथांचा असला, तरी ते ज्ञान सुलभ करुन सांगण्याचीही कला त्यांच्याकडे आहे. यामुळेच अरुण फडके यांनी, ‘शालेय अभ्यासक्रमासाठी संस्कृत निबंधलेखन आणि पत्रलेखन’ यावर पुस्तक लिहिण्याची त्यांना विनंती केली. हर्षदा यांनी त्यातही नवनवीन प्रयोग करत, प्रत्येक निबंधामध्ये व्याकरणाची वैशिष्ट्य पेरली. त्यांना एका नाट्यलेखनाचीही संधी मिळाली. त्यांच्या नाट्यकृतीसाठी त्यांना ‘५६व्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धे’चा, महाराष्ट्र सरकारचा लेखनपुरस्कारही मिळाला.
याशिवाय, एखाद्या विषयाची निवड करून, त्याविषयीची सुभाषिते सर्व संबंधित ग्रंथांत शोधून, ती ससंदर्भ एकत्र करून त्यांचा संग्रहित ग्रंथ तयार करण्याचे कामही त्या चिकाटीने करतात. अलीकडेच ‘वैदिक अनुक्रमणी ग्रंथ’ या विषयाचा सखोल अभ्यास करत, त्यांनी डॉ. माधवी नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएचडी’देखील पूर्ण केली. त्यांना मुख्यतः अनुवादाची आवड आहे. सध्या त्या ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’त, ‘महाभारता’च्या मराठी अनुवादाचे काम करत आहेत. यातूनच ‘महाभारता’तील प्रत्येक शब्द त्याच्या व्याकरणासह, वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. डॉ. हर्षदा ‘हिंदू काऊन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया’ या संस्थेच्या माध्यमातून, ऑस्ट्रेलियातील भारतीयांच्या मुलांनाही संस्कृतचे अध्यापन ऑनलाईन पद्धतीने करतात.
डॉ. हर्षदा यांचा ‘वेद’, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘चाणयनीति’ यांचाही अभ्यास असून, त्या आपल्या संयत आणि प्रभावी; पण मधुर वाणीने जेव्हा विषय मांडतात, तेव्हा श्रोतृवर्ग हरखून जातो. रेडिओवरील मुलाखतीदरम्यान किंवा व्याख्यानांमध्ये डॉ. हर्षदा यांना ऐकणे, ही बुद्धिजनांसाठीची मोठीच पर्वणी!
वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया|
लक्ष्मीः दानवती यस्य सफलं तस्य जीवितं॥
हे सुभाषित जणू डॉ. हर्षदा यांच्यासाठीच रचल्यासारखे भासते. डॉ. हर्षदा जोशी-सावरकर यांना, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
ओवी लेले
९८६९३४५७५३