‘स्त्री ने ठरवलं, तर एखाद्याला तारू ही शकते आणि मारूही शकते. वेळप्रसंगी चंडिकाही होऊ शकते,’ हा संवाद ऐकून, तुम्हाला साधारणतः ‘दशमी’चा अंदाज आला असेलच. मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांना नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. ‘दशमी’ हा चित्रपटही सामाजिक विषयाला हात घालतच, प्रेक्षकांसमोर काही विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. मनोरंजनासोबतच सामाजिक वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी देणारा हा चित्रपट, प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करतो. स्त्रीशक्ती, संघर्ष आणि अन्यायाविरुद्धचा लढा हे विषय आजही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचेच. स्त्रीला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, अन्यायाविरोधात उभे राहण्याची तिची जिद्द आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तिची शक्ती, या गोष्टी चित्रपटांसाठी नेहमीच महत्त्वाचा विषय ठरल्या. ‘दशमी’ हा मराठी चित्रपट याच सामाजिक आशयाला केंद्रस्थानी ठेवतो.
‘दशमी’चा मुख्य गाभा स्त्रीशक्ती, संघर्ष आणि अन्यायाविरोधातील लढा आहे. समाजात अन्यायाला सामोरे जाणार्या व्यक्तीला केवळ परिस्थितीशीच नव्हे, तर व्यवस्थेशी आणि स्वतःच्या मर्यादांशीही लढावे लागते. अशा संघर्षाची मांडणी करताना कथानकातील भावनिक गुंतवणूक, व्यक्तिरेखांची जडणघडण आणि प्रसंगांची परिणामकारकता महत्त्वाची ठरते. स्त्रीच्या संघर्षाकडे पाहताना तिची अगतिकता दाखवण्याबरोबरच तिचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि परिस्थितीशी लढण्याची ताकदही ठळकपणे समोर येणे आवश्यक असते. ‘दशमी’चा विषय या दृष्टीने महत्त्वाचा. मात्र, अशा विषयाला अधिक प्रभावी करण्यासाठी पटकथा आणि व्यक्तिरेखांच्या मांडणीला विशेष बळ मिळणे आवश्यक होते. दिग्दर्शक योगेश भोसले हा समतोल राखण्यात थोड्या प्रमाणात कमी पडल्याचे दिसते.
कथेमध्ये एका शहरात पाठोपाठ खुनांचे सत्र सुरू होते. याचा उलगडा करण्यासाठी एण्ट्री होते,ती एसीपी आसिफ मुजावर (रवी प्रकाश)ची. तपासाचे धागे-दोरे लक्ष्मी (गौरी इंगवले)वर झालेल्या अत्याचाराच्या केसपर्यंत येऊन पोहोचतात. यातून अनेक धक्कादायक खुलासे होतात. आता लक्ष्मीचा भूतकाळ काय असतो? शहरातील खुनाचे सत्र थांबते का? चित्रपटातील खरा रावण कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी तुम्हाला ‘दशमी’ बघावाच लागेल.
सामाजिक विषयावरील चित्रपटात आशय जितका महत्त्वाचा, तितकीच त्याची मांडणीही . हा चित्रपट खूप वेगाने धावतो. दिग्दर्शक योगेश भोसले यांनी वर्तमान आणि भूतकाळाची सांगड सिनेमात उत्तम घातली आहे. पणम्, अतिवेगवान मांडणीमुळे चित्रपटातील पात्रांशी आपण जोडले जात नाही. चित्रपटातील काही गोष्टी तर अतार्किक वाटतात.चित्रपटातील रवी प्रकाश यांची पोलीस अधिकार्याची भूमिका लक्षवेधी ठरते. अशा भूमिकांमध्ये केवळ संवादफेकच नव्हे, तर देहबोलीही महत्त्वाची असते. रवी प्रकाश यांच्या कामगिरीतून व्यक्तिरेखेला आवश्यक असा ठामपणा जाणवतो. या चित्रपटातून मराठीत त्यांचं जोरदार पदार्पण झालं आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेला आणखी सखोलता देणारे प्रसंग आणि अधिक विस्तार मिळाला असता, तर तिचा प्रभाव आणखीच वाढला असता.
चित्रपटाची संपूर्ण मदार गौरी इंगवलेच्या खांद्यावर आहे. मात्र, ही मोठी भूमिका पेलताना गौरी इंगवलेच्या अभिनयाला काही मर्यादा जाणवतात. व्यक्तिरेखेच्या संघर्षाची तीव्रता आणि तिच्या भावविश्वातील चढ-उतार अधिक प्रभावीपणे व्यक्त झाले असते, तर प्रेक्षकांची तिच्याशी अधिक घट्ट भावनिक नाळ जोडली गेली असती. मकरंद अनासपुरे यांनी, गौरीच्या वडिलांच्या भूमिकेत उत्तम कामगिरी केली आहे. चाकोरीबाह्य भूमिकेत ते विशेष लक्षात राहतात. इन्स्पेटर जवळकरच्या भूमिकेत दया गायकवाड जबरदस्तच! राज कुंदनपणही वासूच्या भूमिकेत लक्षात राहतो. बंटी म्हात्रेच्या भूमिकेत दिग्दर्शक योगेश भोसले यांनी चकित केले असून, तर मल्हारच्या भूमिकेत विजय निकम यांनी शेवटच्या बॉलवर षट्कार मारला आहे.
सुरेश पंडित यांचं संगीत चांगलंच आहे; विशेषतः ‘चंडिका’ गाणं जुळून आलं आहे. अवि लोहारच पार्श्वसंगीत आणि विकास सिंहचं छायांकनही उत्तम जुळलं आहे. विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा चित्रपट, व्यक्तिरेखांच्या प्रभावी सादरीकरणातून आणि भावनिक मांडणीतून आणखी परिणामकारक होऊ शकला असता. एकूणच काय, मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
निर्माता-दिग्दर्शक : योगेश भोसले
लेखक : सुरेश पंडित
कलाकार : मकरंद अनासपुरे, रवी प्रकाश, गौरी इंगवले, देवेंद्र गायकवाड, राज कुंदन, महेश मांजरेकर, योगेश भोसले, विजय निकम
वेळ : २ तास २० मिनिटे
- कपिल देशपांडे