सेवा हैं यज्ञकुंड...!

    24-Oct-2026
 
 Nana Palkar Smruti Samiti Dr Madhavrao Paralkar
 
गेली ५८ वर्षे अविरत रूग्णसेवेचे व्रत घेतलेली ‘नाना पालकर स्मृती समिती.’ स्व. डॉ. माधवराव परळकर यांनी समितीची पायाभरणी केली. डॉ. परळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या कार्यगौरवासाठी जन्मशताब्दी समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आज, शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पू) येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने स्व. डॉ. माधवराव परळकर यांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा मागोवा...
 
‘नाना पालकर स्मृती समिती’चे संस्थापक सदस्य, रा. स्व. संघाचे प्रचारक, योगगुरू, सेवामहर्षी डॉ. माधवराव परळकर यांचे दि. ३ जानेवारी २०२६ ते दि. २ जानेवारी २०२७ हे जन्मशताब्दी वर्ष. ‘नाना पालकर स्मृती समिती’ या रुग्णसेवाविषयक प्रकल्पाशी त्यांचे नाव इतके घट्ट जोडले गेले आहे की, माधवराव परळकर म्हटले की, नाना पालकर स्मृती समितीच आठवते. तसेच ’नाना पालकर स्मृती समिती’ म्हटले की, डॉ. माधवराव परळकर आठवतात. परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या कार्यक्रमासाठी आणि स्मृती विशेषांकासाठी पाठवलेल्या शुभेच्छांमध्ये म्हणतात, "नाना पालकर स्मृती समिती आणि डॉ. माधवराव परळकर हे असे अद्वैत आहे, ज्याची एकाशिवाय दुसर्‍याची कल्पना करणे अशक्य आणि अपूर्ण आहे. रुग्णसेवेचा आदर्श म्हणून स्थापित या समर्पित कर्मयोगी सात्त्विक सेवापुरुषाला शत शत नमन!”
 
विकसित व्हावे, अर्पित होऊनि जावे!
 
डॉ. माधवराव परळकर यांचा संघाशी संबंध अगदी शालेय वयातच आला. नवव्या इयत्तेत असताना संघशिक्षा वर्गाचे (ओटीसी) प्रथम वर्ष, मग द्वितीय वर्ष आणि मॅट्रिक झाल्यावर तृतीय वर्ष असे त्यांचे संघदृष्ट्या प्रशिक्षण झाले. आपले संपूर्ण जीवन संघकामासाठी अर्पण करायचे ठरवूनच, ते तृतीय वर्ष पूर्ण करून नागपूरहून परत आले. मॅट्रिक झाल्यानंतर ते प्रचारक म्हणून निघाले. नंतर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेसाठी, मुंबईत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाली. विद्यार्थी परिषदेचे काम करण्यासाठी, माधवरावांनी शीवच्या आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. परिषदेचे काम मुंबई महानगरात विस्तारले, स्थिरावले. परिषदेच्या वाढत्या कामाची जबाबदारी पार पाडत असतानाच, त्यांचे आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षण सुरुच होते. काही काळाने माधवराव विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री झाले. त्याच सुमारास ते ‘आयुर्वेद प्रवीण’ परीक्षेतही यशस्वी झाले.
 
माधवरावांनी वैद्यकीय शिक्षण तर घेतलेच, सोबतच शास्त्रशुद्ध ’मालिश चिकित्सा’, ’किरो प्रॅटिस’, ’योगसाधना’, ’ध्यानधारणा’ हेदेखील त्यांनी आत्मसात केले. माधवरावांचा हात जरी रुग्णाच्या शरीरावरून फिरला, तरी त्यांनी केलेल्या मालिशने रुग्णाला बरे वाटत असे. डॉक्टर माधवराव परळकर हे खरेतर ‘आयुर्वेद प्रवीण’ ही पदवी धारण केलेले एक उत्कृष्ट वैद्य होते. पण, लोकांनी त्यांना प्रेमाने ‘डॉक्टर’ ही पदवी दिली आणि ‘डॉक्टर’ हेच त्यांच्या नावासोबत कायमचे जोडले गेले. आणीबाणीत नाशिक कारागृहात असताना, तेथील रुग्णांवर मसाज चिकित्सेचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले. राजबंद्यांसाठी तर त्यांनी योगवर्ग घेतलेच; पण सामान्य कैद्यांसाठीदेखील घेतले.
 
उत्तम काच्याचे दुटांगी धोतर आणि स्वच्छ पांढरा सदरा असा वेश ल्यायलेले प्रसन्न व्यक्तिमत्त्व, बोलका उत्साही स्वभाव, असे डॉक्टर माधवराव परळकर आजही अनेकांना आठवतात.
 
एकदा एखादा विषय हाती घेतला की, त्यात यश मिळवायचेच अशी त्यांची जिद्द. त्या प्रयत्नांत सर्वांना बरोबर घेऊन आणि स्वतःला झोकून देऊन उत्तमरीत्या काम पूर्ण करणे, हा त्यांचा ध्यास होता. ते रुग्णांच्या मनात जगण्याविषयीचा उत्साह, ऊर्जा निर्माण करत. त्यामुळे रुग्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत असे. निराश, चिडचिडा, त्रागा करणार्‍या रुग्णातही डॉ. माधवराव आत्मविश्वास निर्माण करत, रुग्णाच्या वेदनेवर फुंकर घालीत. रुग्णाची प्रकृती सुधारण्यात याचा खूप उपयोग व्हायचा. रुग्णांच्या नातेवाईकांनादेखील माधवरावांचा मोठाच मानसिक आधार असे. रुग्णांच्या नातेवाईकांना रोगाची स्पष्ट कल्पना देऊन, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते उभे करत असत.
 
‘नाना पालकर स्मृती समिती’ची स्थापना
 
अनेक संघस्वयंसेवक उपचारासाठी मुंबईत यायचे. पण, त्यांची वा त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांची काहीही सोय मुंबईत नसल्याने काय करायचे, हा त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न असे. अशा काही स्वयंसेवकांची सोय संघाच्या कार्यालयात होई. पण, मुंबईत उपचारांसाठी येणार्‍या स्वयंसेवकांची संख्या मोठीच होती. एकदा कर्नाटकातील एक स्वयंसेवक कर्करोगाच्या उपचारासाठी मुंबईच्या टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल झाले. माधवरावांनी त्यांची योग्य ती व्यवस्था केली. केरळम्चे एक ज्येष्ठ प्रचारक हृदयाच्या उपचारांसाठी ‘केईएम’ रुग्णालयात दाखल झाले, शस्त्रक्रिया झाली. त्यावेळीही माधवराव त्यांची व्यवस्था बघण्यात अग्रभागी होते.
 
पण, प्रत्येक दिवशी असे शेकडो रुग्ण रोज मुंबईत येतात, रुग्णालयात दाखल होतात. त्यांच्याबरोबर येणार्‍या त्यांच्या नातेवाईकांची मुंबईत काहीच सोय नसल्याने ते अक्षरश: रुग्णालयाबाहेर पदपथावर राहतात, मिळेल ते खातात, हे माधवरावांनी पाहिले. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे, हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. असाध्य रोग जडलेल्या स्वयंसेवकांच्या उपचाराची स्वस्त आणि विश्वासू व्यवस्था मुंबईत असावी, अशी इच्छा पूजनीय गुरुजींनी त्याच सुमारास बोलून दाखवलीच होती. त्यानुसार, देशभरातून येणार्‍या रुग्णांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न डॉ. माधवराव यांनी सुरू केले. अशाच प्रकारचे काम वैयक्तिक स्तरावर नारायणराव भिडे नावाचे परळमधील आणखी एक स्वयंसेवक करत होते. दोघांच्या कामाचे स्वरूप सारखेच होते. त्यावेळचे महाराष्ट्र प्रांताचे संघाचे कार्यवाह, सुविख्यात लेखक नाना पालकर यांचा काविळीच्या जीवघेण्या आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या ‘नाना पालकर स्मृती समिती’ने, रुग्णसेवा हेच आपले कार्यक्षेत्र ठरवून घेतले. माधवराव परळकर आणि नारायणराव भिडे यांचे काम एकत्रितरीत्या ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या नावाने सुरू झाले.
 
कर्करोग, क्षयरोग आणि इतर गंभीर आजारांसाठी भारतभरातून लोक मुंबईत येतात. रुग्णाची तर हॉस्पिटलमध्ये राहण्या-खाण्याची व्यवस्था होते. पण, त्यांच्यासोबत येणार्‍या नातेवाईकांची मात्र पंचाईत होते. त्यांच्यासाठी अतिशय अल्प दरांत जेवण आणि नि:शुल्क राहण्याची सोय देऊ करणारे केंद्र सुरू व्हावे, या श्रीगुरुजींच्या इच्छेप्रमाणे ‘नाना पालकर स्मृती समिती’ काम करू लागली. अखंड परिश्रम आणि निःस्वार्थ सेवाभावनेच्या जोरावर डॉ. माधवराव परळकर आणि ‘नाना पालकर स्मृती समिती’तील त्यांच्या सहकार्‍यांनी, परळ भागात ‘रुग्णसेवा सदन’ उभे करण्याचे स्वप्न पाहिले आणि पूर्णत्वास नेले. डॉ. माधवराव परळकर यांच्यासोबतच डॉ. अजित फडके, शरदराव दांडेकर, मामा सावरकर, नारायणराव भिडे, कृष्णाजी छत्रे, वामनराव घैसास, अरविंदराव खरे अशा निष्ठावान कार्यकर्त्यांनी, ‘रुग्णसेवा सदन’ उभे करण्यासाठी अविश्रांत काम केले.
 
‘नाना पालकर स्मृती समिती’ची सद्यस्थिती
 
आजचे ‘रुग्णसेवा सदन’ सुरू झाले, तेव्हा ते सात मजल्यांचे होते. जिथे ६४ रुग्ण आणि त्यांचे दोन-दोन नातलग यांची विनामूल्य राहण्याची व्यवस्था होती. आता ‘रुग्णसेवा सदना’ची इमारत दहा मजली आहे. भारतभरातून येणार्‍या रुग्णाला विनामूल्य निवास, त्याचबरोबर अत्यल्प दरात भोजन मिळावे, यासाठी भोजनालयाचीही व्यवस्था आहे. यासोबतच उत्तम ‘डायलिसिस सेंटर्स’ही सुरू आहेत. सांताक्रूझ, बोरिवली, तसेच ठाणे मिळून, आता सुमारे ४९ डायलिसिस मशिन्स रुग्णांना विनामूल्य अथवा अल्पदरांत सेवा देत आहेत. अत्यल्प दरात रक्त तपासणी केंद्रही असून, फिजिओथेरपी सेंटर्सही आहेत.
 
व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती!
 
‘व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती, जागृत करणे तयाप्रति, मनात प्रीती हृदयी भक्ती, संघटनेने ये शक्ती’ या काव्यपंक्ती, माधवरावांनी यथार्थ सार्थ केल्या होत्या. माणसांना भेटणे, आपलेसे करणे आणि संघकामाला जोडून घेण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. माधवराव परळकर आणि नारायणराव भिडे रुग्णालयात रुग्णांना भेटायला जात, तसेच ते नामवंत डॉटरांनाही भेटत. डॉ. बी. के. गोयल, डॉ. भगवती, डॉ. राममूर्ती, डॉ. भट्टाचार्य, डॉ. मांडके, डॉ. सिंघम, डॉ. प्रफुल्ल देसाई, डॉ. बी. के. गोयल अशा अनेक नामवंत डॉटरांशी त्यांचे स्नेहसंबंध होते. माधवराव अशा अनेक डॉटरांना, वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघपरिवाराची माहिती देत. त्यांना संघपरिवाराचे सदस्य बनवत.
 
संघाच्या रुग्णसेवा कार्याशी माधवरावांनी जोडून घेतलेल्या तज्ज्ञ डॉटरांची यादी खूप मोठी आहे. डॉ. भट्टाचार्य, डॉ. परुळेकर, डॉ. अश्विन मेहता, डॉ. शरद पांडे, डॉ. नीतू मांडके, डॉ. पहिलाजानी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ‘हृदयरोगतज्ज्ञ’; डॉ. बोर्जेस, डॉ. प्रफुल्ल देसाई, डॉ. व्यास असे नावाजलेले ‘कॅन्सर सर्जन’; डॉ. राममूर्ती, डॉ. बी.के. गोयल, डॉ. सिंघल, डॉ. दामले, डॉ. पै यांच्यासारखे ‘फिजिशियन’; डॉ. फडके, डॉ. श्रीखंडे, डॉ. भगवती आदी ‘सर्जन’; ‘होमिओपॅथी’चे डॉ. हब्बू, वैद्य नानल, वैद्य अंतरकर, खडीवाले वैद्य यांच्यासारखे ‘आयुर्वेद विशारद’ ही त्यातील काही नावे. डॉ. माधवराव यांनी अनेक योगतज्ज्ञ, मालिश उपचारतज्ज्ञ, हाडवैद्य, निसर्गोपचारतज्ज्ञ यांचेही साहाय्य मिळवले. विविध रुग्णालयांतील परिचारिका, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, रुग्णालयाचे प्रमुख, विभागप्रमुख यांच्याशी नित्य संपर्क ठेवून, त्यांनाही संघविचाराशी आणि ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या रुग्णसेवेच्या कार्याशी जोडून ठेवले. वैद्यकीय क्षेत्रातील माणसांसोबतच, इतर क्षेत्रातील माणसेदेखील त्यांनी ‘नाना पालकर स्मृती समिती’ची स्नेही बनवली. आजही व्यापार, अर्थकारण, व्यवस्थापन या क्षेत्रांतील उच्चपदस्थ ‘नाना पालकर स्मृती समिती’साठी, आपला वेळ आणि सेवा आनंदाने देत असतात.
 
कार्यकर्त्यांची क्षमता ओळखून, त्यांना आपल्या कामाशी जोडून घेणे, हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. किसनराव छत्रे निवृत्त होण्याचाही आधीच डॉटर परळकरांनी त्यांना, "नाना पालकर स्मृती समितीच्या कामासाठी वेळ राखून ठेव,” असे सांगितले. निवृत्तीच्या दुसर्‍या दिवसापासून, किसनरावांनी ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या कामात स्वतःला झोकून दिले व पुढे ३२/३५ वर्षे त्यांनी ‘नाना पालकर’मध्ये पूर्णवेळ काम केले.
 
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा
 
डॉक्टर परळकर जसे ‘रुग्णसेवा सदना’तील सर्व रुग्णांची आपलेपणाने चौकशी करायचे, तसेच सर्व कर्मचारी वर्गाचीही चौकशी करायचे. त्यावेळी त्यांचे अतिशय वत्सल असे रूप दिसे. अनेक स्वयंसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि स्वयंसेवक नसलेल्या रुग्णांसाठीही, डॉ. माधवराव तेवढ्याच तळमळीने धडपड करीत. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे त्यांच्या बाबतीत नुसते वाक्य नव्हते, तर जीवनधर्म होता. अगदी महान व्यक्तींपासून ते समाजाच्या दृष्टीने एखादी लहान व्यक्ती असेल तिच्यापर्यंत, सर्वांशीच ते स्नेहार्द्र वृत्तीने, आपलेपणाने वागत. त्यात कोणताच भेदभाव नसे.
 
डॉ. माधवराव यांना डॉक्टर असल्याने संघश्रेष्ठींच्या आजारपणात त्यांच्या समवेत आणि सेवेत राहायला मिळाले. प. पू. गुरुजी, कृष्णराव मोहरीर, अप्पाजी जोशी, बाबासाहेब घटाटे, पांडुरंग क्षीरसागर, यादवराव जोशी, दादा परमार्थ, एकनाथजी रानडे अशी कितीतरी नावे सांगता येतील. अनेक अधिकार्‍यांना माधवरावांच्या सेवेचा आणि ज्ञानाचा उपयोगही झाला. मोरोपंत पिंगळे यांनादेखील डॉ. माधवराव परळकरांनी केलेल्या मसाजाने बरे वाटत असे. अनेकांच्या निद्रानाशावरदेखील माधवरावांनी उपाय केले होते.
 
समिधा सम हम जलें|
 
डॉ. माधवरावांनी जवळजवळ ६५ वर्षे निरंतर काम केले. वयाच्या ८२व्या वर्षी अगदी मृत्यू येईपर्यंतही त्यांचा रुग्णसेवेचा ध्यास सुरूच होता. ‘सेवा हैं यज्ञकुंड, समिधा सम हम जलें’ या ओळी ते जगले. अनेकांच्या सहकार्याने आणि डॉ. माधवराव परळकरांच्या अविश्रांत धडपडीने रुग्णसेवेच्या बीजाचा आज मोठा वृक्ष होऊन, ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या रूपाने हजारो रुग्णांना दिलासा देत आहे.
 
- वृंदा टिळक




संबंधित मजकूर