मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक नातेसंबंध, माणसांच्या भावभावना आणि जीवनातील छोट्या-मोठ्या घटनांमधून उलगडणारे नात्यांचे पदर, यांवर भाष्य करणारे चित्रपट अधूनमधून पाहायला मिळतात. त्यातून माणसांच्या नात्यांचे अनेक पैलू उलगडतात. मात्र, माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं जेव्हा पडद्यावर येतं, तेव्हा त्यात प्रेम, विश्वास, निष्ठा आणि निःस्वार्थ भावनेचा एक वेगळाच अनुभव दडलेला असतो. ‘कापूस कोंडा’ हा चित्रपट कुत्रा आणि माणूस यांच्यातील जिव्हाळ्याची गोष्ट मांडणारा आहे. सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांसारखे कलाकार या चित्रपटात असल्याने, चित्रपटाकडून चांगल्याच अपेक्षा होत्या. हा चित्रपटही तुम्हाला निराश करणार नाही. संपूर्ण कुटुंबासह तुम्ही हा चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
कुत्रा हा केवळ घराची राखण करणारा प्राणी नाही, तर अनेकांसाठी तो कुटुंबाचा सदस्य असतो. त्याच्या निरागस प्रेमात अपेक्षा नसतात, स्वार्थ नसतो आणि नात्यांमधील गुंतागुंतही नसते. माणसांच्या व्यवहारात हरवलेला जिव्हाळा, कधीकधी एखादा मुका जीव सहजपणे शिकवतो. ‘कापूसकोंडा’ची मध्यवर्ती संकल्पना याच नात्याभोवती फिरते. अशा विषयावर चित्रपट साकारताना केवळ भावनिक प्रसंगांची पेरणी करून चालत नाही; तर पात्रांतील नातही हळूहळू विकसित होणं, त्यातील बारकावे जाणवणं आणि प्रेक्षकांना त्या नात्याशी जोडून घेता येणं, महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे या चित्रपटाचं खर्या अर्थाने यश, त्यातील भावनिक मांडणी सहज आणि प्रभावी करण्यातच आहे.
‘कापूसकोंडा’ची कथा सत्य घटनेवर प्रेरित आहे. चित्रपटाची कथा एका निवृत्त पोस्टमनच्या आयुष्यात येणार्या कुत्र्याभोवती फिरते. एका प्राण्याच्या येण्याने कुटुंबातील नातेसंबंध कसे बदलतात, हा विचार चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. हमीद भाई (सचिन पिळगांवकर), नुसरत (मधुराणी गोखले), हीना (अक्षता पाडगांवकर), शीना (जान्हवी तांबट) चित्रपटातील या प्रमुख पात्रांभोवतीच कथानक फिरतं. या सुखी कुटुंबाच्या आयुष्यात नवीन सदस्य (कुत्रा) आल्यावर काय धमाल घडते; हमीद भाई त्याला स्वीकारतात का; अनपेक्षित काय घटना घडतात, या सगळ्यांची उत्तरं जाणण्यासाठी तुम्हाला हा चित्रपटच बघावा लागेल.
चित्रपटाचा विषय केवळ कुत्रा आणि त्याच्या मालकापुरताच मर्यादित नाही. एका नव्या सदस्यामुळे घरातील माणसांच्या स्वभावाचे, विचारांचे आणि परस्पर संबंधांचे वेगवेगळे पैलू समोर येतात. कधी एखाद्या छोट्या प्रसंगातून विनोद निर्मिती होते, तर कधी त्याच प्रसंगातून भावनिक संघर्षही उभा राहतो. अशा कथेत मनोरंजन आणि संवेदनशीलता यांचा समतोल राखण्यात दिग्दर्शक सचिन मोहिते यशस्वी ठरले आहेत. ते स्वतःच चित्रपटाचे लेखक असल्याने, सगळ्याच पात्रांमध्ये समतोल ठेवण्यात त्यांना यश मिळालं. कुत्र्याच्या उपस्थितीमुळे निर्माण होणारे गमतीशीर प्रसंग तुम्हाला हसवतील, तर त्याच्याशी निर्माण होणारं नातं मनाला स्पर्श करेल. हसता हसता तुमचे डोळे नकळत हृदयस्पर्शी प्रसंगांनी पाणवतीलही.
सचिन पिळगावकर यांचा अनुभव आणि अभिनयातील सहजता, ही चित्रपटाची जमेची बाजू. विनोद असो किंवा भावनिक प्रसंग, सचिन पिळगावकरांनी प्रत्येक प्रसंगात जीव ओतला आहे. त्यांच्यातील अफाट ऊर्जा बघून, युवा कलाकारांनी खरंच शिकायला हवं. मधुराणी गोखले यांनीही सचिन पिळगावकरांच्या तोडीस तोड काम केलं आहे. अक्षता आणि जान्हवीनेही या दोन दिग्गज कलाकारांना उत्तम साथ दिली.
अशा चित्रपटात अनावश्यक नाट्यमयता टाळून, साध्या प्रसंगांतून भावना व्यक्त करणं अधिक परिणामकारक ठरतं. कुत्र्याच्या माध्यमातून माणसांच्या नात्यांवर भाष्य करताना चित्रपट उपदेशात्मक न होता, प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्यातील नात्यांचा विचार करायला भाग पाडतो.
हा विषयच खरं तर धाडसी होता. पण सचिन मोहिते यांनी ज्या पद्धतीने हा विषय पडद्यावर मांडला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन! ए. व्ही. प्रफुलचंद्र यांचं संगीत उत्तम जमून आलं असून, चित्रपटाचं शीर्षकगीतहे सुरेख झाले आहे. सचिन पटेकरचं कॅमेरावर्कही उत्तमच. या सणासुदीच्या काळामध्ये ‘कापूसकोंडा’ हा एक उत्तम कौटुंबिक चित्रपट ठरणार आहे. माणूस आणि प्राणी यांच्या घट्ट नात्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट, तुम्हाला नक्कीच निराश करणार नाही.
निर्माते : कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, सचिन मोहिते, स्नेहल मोहिते, दीपक प्रभू, अनिरुद्ध अंधोरीकर
लेखन आणि दिग्दर्शन : सचिन मोहिते
कलाकार : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले, अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट
अवधी : २ तास १० मिनिटे
- कपिल देशपांडे