ऊसतोडणी मजुरांच्या लेकरांना मायेचा आधार!

 
Sugarcane Workers’ Children Education in Beed
 
शिक्षण, क्रीडा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर बीडमधील साने गुरुजी आश्रमशाळा ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचे भविष्य घडवते आहे; त्यांच्या हाती आहेत कोयत्याऐवजी पुस्तकं, क्रीडा साहित्य आणि तंत्रज्ञानाची साधने!
 
मराठवाडा म्हटले की डोळ्यांसमोर येतो तो दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकणारा ऊसतोडणी मजूर. पोटाची खळगी भरण्यासाठी हाती कोयता घेऊन, स्थलांतर करणार्‍या या कुटुंबांतील मुलांच्या वाट्यालाही अनेकदा मजुरी, शिक्षणापासूनची फारकत, कुपोषण आणि बालविवाहाचे संकटच येते. या मुलांना या दुष्टचक्रातून बाहेर काढायचे कसे, त्यांच्या हातातील कोयता कायमचा सोडवून त्यांना शिक्षणाच्या बळावर सन्मानाचे आयुष्य कसे मिळवून कसे द्यायचे, हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे.
 
मात्र, बीडच्या केज तालुयातील साने गुरुजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळेने, या प्रश्नाचे उत्तर कृतीतून शोधण्याचा प्रयत्न केला. ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी चालविल्या जाणार्‍या या शाळेत शिक्षणासोबतच क्रीडा, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य आणि सुरक्षित निवासाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार दिला जात आहे. संस्थेचे अध्यक्ष नरसिंह गित्ते आणि मुख्याध्यापिका डॉ. कविता गित्ते यांच्या पुढाकारातून, ही शाळा अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन आली आहे.
 
दुष्काळाच्या सावटात शिक्षणाची आशा
 
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा मराठवाड्याला मोठाच फटका बसत आहे. पावसाचे घटते प्रमाण, शेतीतील नुकसान आणि रोजगाराचा अभाव यांमुळे, ग्रामीण कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचे गंभीर संकट उभे राहते. अशा वेळी ऊसतोडणी कामगार कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. त्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होतो. शाळा बदलणे, शिक्षणात खंड पडणे, बालमजुरी आणि मुलींसमोर बालविवाहाचा धोका अशा अनेक समस्यांना या मुलांना सामोरे जावे लागते.
 
या पार्श्वभूमीवर साने गुरुजी आश्रमशाळेचे कार्य महत्त्वाचेच. ही संस्था केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यापुरतीच मर्यादित नाही. ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे, हे या शाळेच्या कार्याचे महत्त्वाचे पैलू. पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित, अनुभवाधारित आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर येथे भर दिला जातो.
 
क्रीडांगणावर विद्यार्थ्यांची सुवर्णझेप
 
शाळेत प्रवेश करताच, खेळाच्या मैदानावर बेसबॉलच्या सरावात मग्न असलेले विद्यार्थी लक्ष वेधून घेतात. गेल्या १५ वर्षांपासून येथे बेसबॉल आणि शॉटबॉलचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाच्या जोरावरच शाळेतील ४२ विद्यार्थ्यांनी, राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमधील, दोन टक्के क्रीडा आरक्षणासाठीचीही पात्रता मिळवली आहे. याशिवाय सुमारे २५० विद्यार्थ्यांनी विविध क्रीडास्पर्धांमध्ये यश मिळवले असून, ते राज्य सरकारच्या नोकर्‍यांमधील पाच टक्के क्रीडा आरक्षणासाठी पात्र ठरले आहेत.
 
दरवर्षी शाळेचे सहा संघ राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्यात मुलींची कामगिरी विशेष उल्लेखनीयच. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांमध्येही राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची क्षमता असते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले.
 
‘एआय’-रोबोटिस लॅबमधून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख
 
बदलत्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या कौशल्यांची ओळख होणेही आवश्यक आहे. हीच गरज लक्षात घेऊन, शाळेत ‘एआय’-रोबोटिस प्रयोगशाळा उभारण्यात आली. या प्रयोगशाळेत ‘थ्रीडी प्रिंटिंग मशीन’च्या साहाय्याने विविध आकारांतील खेळणी, नमुने आणि प्रतिकृती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. मात्र, शाळेकडे सध्या एकच ‘थ्रीडी प्रिंटिंग मशीन’ असल्याने, या विषयात विशेष आवड असलेल्या निवडक विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षण देणे शक्य होते.
 
रोबोटिसच्या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करण्यास आणि स्वअध्ययनातून प्रारुप निर्मितीस प्रोत्साहन दिले जाते. सुरुवातीला विद्यार्थी पुस्तकांतील माहितीच्या आधारे प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यातील अडचणी सोडवण्यसाठी शिक्षक आणि प्रशिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात. या प्रक्रियेतूनच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, तार्किक विचारशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमतावृद्धी होते.
 
नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा : विज्ञान झाले सोपे!
 
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून, शाळेला नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा लाभ घेता यावा, यासाठी वेळापत्रकानुसार स्वतंत्र दिवसही निश्चित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत विविध वैज्ञानिक उपकरणे, गणितीय साहित्य, वेगवेगळ्या लांबीचे दोलक, विद्युत घंटा, साधी यंत्रे आणि माहितीपर फलक उपलब्ध आहेत. या साहित्याच्या मदतीने विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करतात. त्यामुळे पुस्तकांतील संकल्पना केवळ वाचण्याऐवजी, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येतो. विज्ञान आणि गणितातील विषय अधिक सोप्या, रंजक आणि कृतिशील पद्धतीने समजून घेण्याचीही संधी यामुळेच विद्यार्थ्यांना मिळते.
 
डिजिटल वर्गखोल्यांतून शिक्षणाची नवी वाट
 
डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने, शाळेला २५० टॅब उपलब्ध करून दिले आहेत. या टॅबमध्ये अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून, सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचा अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात आला आहे.
 
लहान लहान गोष्टी, कार्टून, चित्रफिती आणि स्लाईड्सच्या माध्यमातून, अभ्यासक्रम समजावून सांगितला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषयही आकर्षक पद्धतीने शिकता येतात. पारंपरिक वर्गशिक्षणाला डिजिटल माध्यमाची जोड मिळाल्याने, अभ्यासातील रुची वाढण्यासही मदत होते. विशेष म्हणजे, विद्यार्थी हे टॅब काळजीपूर्वक हाताळतात. आर्थिक परिस्थितीमुळे आधुनिक शैक्षणिक साधनांपासून दूर राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना, या माध्यमातून नवे जग अनुभवण्याचीही संधी मिळत आहे.
 
मुलींसाठी सुरक्षित वसतिगृह; मायेची उब आणि आरोग्याची काळजी
 
ऊसतोडणी मजुरांच्या कुटुंबांना रोजगारासाठी वारंवार स्थलांतर करावे लागत असल्याने, मुलींच्या शिक्षणासमोर अनेक अडथळे उभे राहतात. शिक्षणात खंड पडणे, आरोग्याकडे दुर्लक्ष होणे आणि कमी वयात विवाह होण्याचा धोका अशा समस्या गंभीर आहेत. अशा परिस्थितीत साने गुरुजी आश्रमशाळेतील मुलींचे निवासी वसतिगृह त्यांच्यासाठी सुरक्षित आधार ठरत आहे.
 
मुख्याध्यापिका डॉ. कविता गित्ते या मुलींची आईच्या मायेने काळजी घेतात. वसतिगृहातील मुलींच्या दैनंदिन गरजा, आरोग्य आणि सुरक्षिततेकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असते. मुलींच्या मासिक पाळीच्या नोंदी, आजारपण आणि आरोग्यविषयक समस्यांचीही दखल घेतली जाते. मुलींना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक नियमांचे पालनही काटेकोर पद्धतीने केले जाते. या व्यवस्थेमुळेच मुलींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अनुकूल वातावरण मिळते. केवळ शाळेत दाखल होणेच नव्हे, तर शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधीही त्यांना मिळते. शिक्षणाच्या माध्यमातून बालविवाह आणि बालमजुरीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्गही खुला होतो.
 
आश्रमशाळेतील मुली आपल्या भावना व्यक्त करताना सांगतात की, "आम्ही आज घरी असतो, तर आमचे लग्न झाले असते किंवा आम्ही कोणाच्या तरी शेतावर मजुरी करत असतो. मात्र, गित्ते सर आणि मॅडम यांनी आम्हाला येथे आणले, शिक्षण दिले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली. आम्ही इथे आहोत, म्हणून सुरक्षित आहोत.”

कोयत्याऐवजी हातात पुस्तक; स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल
 
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचे आयुष्य बदलणे, म्हणजे केवळ त्यांना शाळेत दाखल करणेच नव्हे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, त्यांच्या कौशल्यांना वाव देणे, आरोग्याची काळजी घेणे आणि भविष्यात रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी सक्षम करणे, ही त्यामागची व्यापक प्रक्रिया आहे.
 
साने गुरुजी आश्रमशाळेत क्रीडा, विज्ञान, रोबोटिस, डिजिटल शिक्षण आणि सुरक्षित निवासी व्यवस्थेच्या माध्यमातून, याच दिशेने प्रयत्न केले जात आहेत. या सुविधा अधिक व्यापक करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षण उपलब्ध झाल्यास, आणखी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. ऊसतोडणी मजुरांच्या हातातील कोयता कायमचा सोडवून, त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक, क्रीडा साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साधने देण्याचा संकल्प ही केवळ एका शाळेचीच जबाबदारी नाही; ती समाज आणि व्यवस्थेसमोरील महत्त्वाची गरज आहे.
 
आजच्या यशाचे श्रेय आश्रमशाळा परिवाराचे!
 
आज जे यश दिसत आहे, ते माझ्या एकटीचे नाही. आमच्या शाळेच्या संपूर्ण परिवाराचे हे श्रेय आहे. जी मुलं आज शाळेपासून कोसो दूर आहेत, त्यांना शालेय प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करतो. या मुलांना शाळेत आणण्यापासून ते तंत्रज्ञानाला जोडण्यापर्यंत शिक्षण देण्याचे काम हा आमचा परिवार करत आहे. जी मुलं शरीरयष्टीने धडधाकट आहेत त्यांना क्रीडा क्षेत्रात, जी मुलं अभ्यासात हुशार आहेत त्यांना विज्ञान तंत्रज्ञानात, कला क्षेत्रात असं आम्ही प्रत्येकच क्षेत्रात मुलांना पारंगत करत आहे. इतकंच नाही, तर व्यावसायिक शिक्षणही आम्ही देतो. शाळेच्या दारं-खिडक्या हे सर्व आमच्या माजी विद्यार्थ्यांनी घडवलं आहे. - डॉ. कविता गित्ते, प्राचार्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका
 
या शाळेत नक्कीच मुलांचे भविष्य घडेल!
 
मी या हंगामात तामिळनाडूला होतो. गेले दोन महिने मी बाहेरच होतो. माझी मुलं पहिलीपासूनच याच शाळेत आहेत. माझा मुलगा आता चौथीला आणि मुलगी तिसरीला आहे. माझी मुलं अत्यंत सुरक्षित वातावरणात आहेत. काहीच दिवसांपूर्वी माझ्या मुलाला खेळताना छोटा अपघात झाला. त्याने आम्हालाही कळवलं नाही, इतकी चांगली काळजी त्याची इथे घेतली गेली. आज तो पूर्ण बरा झाला आहे. आमच्या मुलांनी काहीतरी मोठं व्हाव, यासाठीच त्यांना इथे पाठवलं आहे. त्यांच्या हाती कधीही कोयता नको! -प्रकाश आडे, पालक, गाव : माजलगाव मोगरा
 
शाळेमुळेच खेळात राष्ट्रीय स्तर गाठू शकले!
 
मी गेली आठ वर्षे या शाळेत शिक्षण घेत आहे. या शाळेत गुणवत्तापूर्ण आणि क्रीडा शिक्षण दिले जाते. मी बेसबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविले आहे. मला जर मॅडमनी या शाळेत आणलंच नसतं, तर मीही माझ्या आई-वडिलांसोबत ऊस तोडायला गेले असते. - पूजा तिडके, खेळाडू




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर