यशाची वाट शोधताना...

    23-Oct-2026
Sudhir Kulkarni Writer Director Journey
 
आयुष्यात अनेकदा यश-अपयश पचवत, नाट्यलेखनापासून ‘खाशाबा’पर्यंतचा रोमांचकारी प्रवास करणार्‍या युवा लेखक-दिग्दर्शक सुधीर कुळकर्णीविषयी...
 
प्रत्येकजण स्वप्ने पाहतोच. कुणाला अभिनेता व्हायचे असते, कुणाला दिग्दर्शक, कुणाला लेखक, तर कुणाला कलेच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करायची असते. पण, पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. या प्रवासात कोणाला लगेच यश मिळते, तर कोणाचा संघर्ष आयुष्यभर सुरूच असतो. मनोरंजनविश्वात संघर्ष करणार्‍यांची संख्या मोठीच. हातात पोर्टफोलिओ, डोळ्यांत स्वप्ने आणि मनात काहीतरी करण्याची जिद्द घेऊन अनेक तरुण मुंबईत येतात. सुरुवातीला एकदा योग्य व्यक्ती भेटली, एखादी संधी मिळाली की, आपले आयुष्य बदलेल. मात्र, प्रत्यक्षात हा प्रवास इतका सरळ नसतो. या प्रवासातील एक व्यक्ती म्हणजे, नाशिकचा युवा लेखक-दिग्दर्शक सुधीर कुळकर्णी!
 
नाशिकमध्ये २००२-२००३च्या सुमारास, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून सुधीरच्या नाट्यप्रवासाला सुरुवात झाली. अभिनयापासून तो या क्षेत्रात आला. अभिनयाची प्रचंड आवड असल्याने, त्याने सुरुवातीला एकांकिका आणि नाटकांमध्ये अभिनय केला. मात्र, पुढे लेखन आणि दिग्दर्शनाची ओढ त्याला लागली. त्याच काळात नाशिकमधील एका वृत्तवाहिनीत, पत्रकार म्हणून कामाची संधी सुधीरला लाभली. तिथे ‘डॉक्युमेंटरी’ तयार करणे, वेगवेगळे ‘फीचर्स’ लिहिण्यासारख्या कामांतून दृक्श्राव्य माध्यमांशी त्याच्याशी ओळख झाली. थोडेफार तांत्रिक ज्ञानही मिळाले. यामुळे त्याचे चित्रपटनिर्मितीविषयीचे आकर्षण वाढले. सुधीरच्या मनात नाटकापलीकडे जाऊन ‘शॉर्टफिल्म’ आणि ‘डॉक्युमेंटरी’ निर्मितीची इच्छा निर्माण झाली.
 
२००७ मध्ये त्याने पुण्यात ‘मास कम्युनिकेशन’च्या प्रवेशासाठी प्रयत्न केले. मात्र, तिथे प्रवेश मिळाला नाही. मग त्याने अहिल्यानगरमध्ये प्रवेश घेऊन, शिक्षण सुरू केले. हाच निर्णय त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. तिथे नागराज मंजुळे, गार्गी, कुतुब आणि ‘आटपाट’च्या टीममधील अनेकांची त्याच्याशी ओळख झाली, नव्हे सगळेच त्याचे चांगले मित्र झाले. इथेच नव्या संधीचीही चाहूल त्याला लागली.
 
नागराज यांच्यातील कवी आणि लेखक सुधीरला सुरुवातीपासूनच आकर्षित करे. त्यांचे वाचन, अनुभव आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनाविषयी त्याला आदर होता. त्यांच्यात सुरुवातीस फार घट्ट मैत्री नव्हती; पुढे मात्र त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ झाले, ते आजही कायम आहेत.
 
२००९ नंतर मुंबईत स्थायिक झाल्यावर, सुधीरने काही मालिकांसाठी लेखन केले, तसेच विविध चित्रपटांसाठी साहाय्यक म्हणून काम केले. तो याही काळात नागराज यांच्या संपर्कात होता. ‘झुंड’साठीही काम करण्याची संधी मिळाली. २०१७-१८मध्ये नागराज यांना त्याने ऐकवलेली कथा आवडली आणि त्यानंतर त्यांच्यासोबतचा त्याचा प्रवास सुरू झाला.
 
सुधीर कुळकर्णी यांनी नागराज यांच्यासोबत ‘वैकुंठ’ या ‘शॉर्टफिल्म’साठी, कथा आणि पटकथा लेखनात सहभाग घेतला,साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. त्यानंतर ‘घर बंदूक बिर्याणी’ आणि ‘मटका किंग’सारख्या प्रकल्पांमध्ये, पटकथा पर्यवेक्षक म्हणूनही सुधीरने जबाबदारी पाहिली. मात्र, त्याच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प म्हणजे ‘खाशाबा’! या प्रकल्पासाठी त्याने संपूर्ण टीमसह पाच-सहा वर्षे प्रचंड मेहनत घेतली. संशोधनापासून पटकथालेखनापर्यंत आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या प्रक्रियेतही त्याचा सहभाग आहे. त्याचबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. यातून चित्रपटनिर्मितीच्या अनेक पैलूंचा अनुभव सुधीरला आला. आजवर एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, नाट्यलेखन, दिग्दर्शन, ‘शॉर्टफिल्म’ आणि चित्रपटांसाठी साहाय्यक असाच सुधीरचा प्रवास राहिला आहे. आता स्वतःच्या कल्पना स्वतंत्रपणे पडद्यावर आणण्याच्या दिशेने तो प्रयत्नशील आहे. येत्या काळात या प्रयत्नांना यश मिळेल आणि नव्या कामाला सुरुवात होईल, अशी आशा सुधीरने व्यक्त केली आहे.
 
कलाकाराच्या आयुष्यात संघर्ष असतोच. मात्र, जेव्हा संघर्षाचा विषय निघतो, तेव्हा त्याला शेतकरी आणि जवानांची आठवण होते. त्यांच्या तुलनेत आपला संघर्ष सुधीरला खूपच लहान वाटतो. त्यामुळे स्वतःच्या संघर्षाचे भांडवल करण्यापेक्षा आपण या प्रवासातून काय शिकतो, हे त्याला अधिक महत्त्वाचे वाटते. कलाकार म्हणून प्रत्येकालाच स्वतःला व्यक्त करण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्यात संघर्षही वाट्याला येतो. पण, संघर्षाकडे सतत बसण्यापेक्षा या प्रवासाचा आनंद घेणे, नवीन गोष्टी शिकणे, चुकांतून परिपक्व होत जाणे महत्त्वाचे असल्याचे सुधीर म्हणतो.
 
लेखनासाठी संघर्ष आवश्यकच आहे, असेही त्याला वाटते. तो आर्थिक, मानसिक किंवा वैचारिक असू शकतो. मनात प्रश्न निर्माण होणे, एखाद्या गोष्टीविषयी गोंधळ असणे आणि नव्या गोष्टींचा शोध घेणे, या प्रक्रियाही सर्जनशीलतेसाठी महत्त्वाच्याच. माणूस ‘कम्फर्ट झोन’मध्ये अडकला, तर त्याची सर्जनशीलता मर्यादित होऊ शकते. त्यामुळे नवीन लोकांना भेटणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणे आणि संवाद वाढवणे गरजेचे आहे. सुधीर त्याच दिशेने प्रयत्न करत आहे. यातूनच नवीन कथा सापडतील असा त्याला विश्वास आहे. सुधीरसाठी हा प्रवास स्वतःला समजून घेण्याचा, सतत शिकण्याचा आणि नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा आहे. आता स्वतंत्र कामाची संधी मिळावी आणि मनातील कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता याव्यात, हीच त्याची इच्छा आहे.
 
गेल्या २२-२३ वर्षातील संघर्षांचा त्याला आनंद आहे. आपल्या कामात गुणवत्ता असेल, आपण प्रामाणिकपणे लिहीत असू, तर यश मिळतेच. त्यामुळे संघर्षाची चिंता करण्यापेक्षा काम करत राहण्यावर विश्वास असल्याचे सुधीर मानतो. संघर्षाच्या माध्यमातून रसिकजनांची सेवा करणार्‍या सुधीर कुळकर्णी याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर