भ्रष्टाचार हीच संस्कृती!

    23-Oct-2026   
 
Pakistan Corruption Allegations and Dual Citizenship
 
पाकिस्तानमध्ये नुकताच एका सरकारी उच्चपदस्थ अधिकार्‍याच्या मुलीचा निकाह झाला. त्या निकाह सोहळ्यात ठरावीक आणि निमंत्रितच उपस्थित होते. रीतीनुसार लोक आहेराची देवाणघेवाण करू लागले. लोकांनी आहेर म्हणून पैसे दिले. किती रुपयांचा आहेर आला असावा? तर तब्बल ४०० कोटी! भुकेकंगाल पाकिस्तानमध्ये लोकांकडे इतका पैसा कुठून आला असेल? तर, या अधिकार्‍याने भ्रष्टाचार करून भरपूर काळा पैसा जमवला. त्या पैशाला हिशोबात आणण्यासाठी त्याने शक्कल लढवली. भ्रष्टाचारातून गोळा केलेला पैसा त्याने काही लोकांना दिला. तो पैसा मुलीच्या निकाहामध्ये आहेर म्हणून द्यायला लावला. या अधिकार्‍यावर कारवाई करावी, तर त्याने युरोपचे नागरिकत्व घेतलेले. ही घटना सांगण्याचे कारण म्हणजे, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेला दावा. ते म्हणाले की, पाकिस्तानमधले ५० टक्के उच्चपदस्थ अधिकारी आयुष्यभर भ्रष्टाचार करतात. त्या पैशावर चैनीचे आयुष्य व्यतित करण्यासाठी युरोपचे नागरिकत्व मिळवतात.
 
नुसते उच्चपदस्थ अधिकारीच नव्हेत, तर पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जीवनाचा मागोवा घेतला; तर जाणवले की, बहुसंख्य नेत्यांची मुले ही परदेशात आणि विशेषतः युरोपमध्येच स्थायिक आहेत. या नेत्यांनी युरोपीय देशांत चैनीच्या आयुष्यासाठी आलिशान घर आणि इतर सर्वच जंगम मालमत्ता विकत घेतली. हे पैसे कुठून आले असतील? अर्थात, भ्रष्टाचारातूनच! पाकिस्तानात हे नेते ‘शरियाराज’चे चाहते, ‘अल्लाचे बंदे’ म्हणून राहतात आणि जनतेलाही तसेच आवाहन करतात. मात्र, युरोपात यांची मुले पाश्चिमात्य पद्धतीचे जीवन जगतात. थोड्याबहुत फरकाने भारतातील काश्मिरी मुस्लीम नेत्यांचेही असेच आहे.
 
तर ख्वाजा आसिफ यांनी असेही आरोप केले की, पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकारी पाकिस्तानमध्ये नोकरी करता-करताच, युरोपीय देशामध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, नव्हे दुहेरी नागरिकत्व मिळवून ठेवतात. त्यामुळे पाकिस्तानात जर भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार असे चिन्ह दिसले की, ते लगेच युरोपात पळून जातात. त्यांचे म्हणणे खरेच असावे. कारण, एका अधिकृत अहवालानुसार, पाकिस्तानमधील २२ हजारांहून अधिक सरकारी अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह दुहेरी नागरिकत्वधारक आहेत. यामध्ये ‘ग्रेड-१७’ ते ‘ग्रेड-२२’मधील २ हजार ३०० पेक्षा जास्त उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
 
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लोक पोर्तुगालचा ‘गोल्डन व्हिसा’ मिळवण्यासाठी जंगजंग पछाडतात. ते पोर्तुगालमध्ये गुंतवणूक करतात. मग त्यांना सहज ‘गोल्डन व्हिसा’ मिळतो. त्याच व्हिसावर त्यांच्या पत्नी आणि मुलांनाही व्हिसा मिळतो. नियमानुसार, दोन वर्षांत १४ दिवस गुंतवणूकदाराने पोर्तुगालमध्ये राहणे आवश्यक आहे. दहा वर्षे अशाप्रकारे ही व्यक्ती पोर्तुगालमध्ये राहिली की, तिला नागरिकत्व मिळते. सगळ्यात महत्त्वाचे, ही व्यक्ती पोर्तुगालच्या ‘गोल्डन व्हिसा’वर युरोपातील इतर २९ देशांमध्ये मुक्त प्रवास करू शकते. याचाच अर्थ, पोर्तुगालमध्ये गुंतवणूक करून युरोपातील २९ देशांमध्ये विनाव्हिसा प्रवास करण्याची संधी त्यांना मिळते. त्यासाठीच पाकिस्तानी अधिकारी, नागरिक हे पोर्तुगालचा ‘गोल्डन व्हिसा’ घेतात. युरोपातील या २९ देशांमध्ये प्रवास करतात, राहतात. तिथे राहून बहुतेकजण कट्टरता वाढवतात. गुन्हा करणे तर त्यांची राष्ट्रीय संस्कृती. त्यामुळे सध्या युरोपची अवस्था काय झाली, हे आपण पाहात आहोत.
 
अशीच एक घटना. युरोपियन देशांचा व्हिसा मिळवून देतो म्हणत, एकाने पाकिस्तानातील शेकडो उच्चपदस्थांना करोडो रुपयांचा गंडा घातला. परदेशात जाण्यासाठी इतके पैसे कुठून आले, हा प्रश्न विचारला; तर उत्तर काय देणार, म्हणून अधिकार्‍यांनी तक्रार केलीच नाही, तर भिकार्‍यांचे आणि भ्रष्टाचार्‍यांचे माहेरघर असलेला पाकिस्तान जगाच्या पाठीवर मात्र मोठ्या मुत्सद्दीपणाचा आव आणतो. जसे- नुकताच पाकिस्तानने तुर्कीये, कतार, इंडोनेशियासोबत ‘बद्र’ नावाचा करार केला. त्यानुसार, शस्त्रनिर्मिती आणि संरक्षणासंदर्भात हे चार मुस्लीम देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत म्हणे. बाकीच्यांचे ठीक; पण पाकिस्तानचे काय? गृहयुद्धाने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे हे वागणे म्हणजे, ‘घरात नाही आणा आणि मला बादशहा म्हणा!’
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर