अलीकडे सातत्याने घडणार्या विमान अपघातांमुळे विमानप्रवासाची सुरक्षा चर्चेत असतानाच, ‘फ्लाय दुबई’ कंपनीच्या विमान हायजॅक प्रकरणानंतर या प्रवासातील नवीन आव्हाने प्रकर्षाने अधोरेखित झाली. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याने अनर्थ टळला असला, तरी धोके कायम आहेत. त्याचा मागोवा घेणारा हा लेख...
दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईहून तेल अवीवकडे ‘फ्लाय दुबई’ कंपनीचे जे विमान झेपावले, त्या विमानाच्या ‘कॉकपिट’मध्ये विमानाचे सहवैमानिक हमाम अल-हमामी याने विमानाचे चालक आणि मूळ भारतीय असणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही बाबच मुळी अतर्य व धक्कादायक आहे. धारदार शस्त्रांसह हमाम अल-हमामी याने कॅप्टन स्मित यांच्यावर हल्ला करून, त्यांना रक्तबंबाळ केले. जखमी असतानाही आपल्या सहकार्याच्याच या अनपेक्षित व प्राणघातक हल्ल्याला प्रखरतेने उत्तर देतानाच, कॅप्टन स्मित यांनी उच्च दर्जाचे प्रसंगावधान दाखवले. त्यांनी त्या विमानातून प्रवास करणार्या सुमारे १७४ प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी, जखमी अवस्थेतही ‘कॉकपिट’चा दरवाजा उघडला. विमानाचे संतुलन कायम राखण्यसाठी त्यांनी जे शर्थीचे प्रयत्न केले, या दुर्दम्य साहसी कृतीला मोजके देश वगळता, उभ्या जगताने दाद दिली. विमानात प्रवास करणार्या प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवासी इस्रायली असल्याने, या विमानाचा आत्मघाती हल्ल्यासाठी उपयोग करण्याचा दहशतवादी हमाम अल-हमामी याचा प्रयत्न कॅप्टन स्मित यांच्या शौर्यामुळे अयशस्वी ठरला. असे असले तरी यानिमित्ताने विमानवाहतुकीच्या सुरक्षेविषयक काही मूलभूत प्रश्न समोर आले आहेत.
‘फ्लाय दुबई’ विमानाबाबत घडलेल्या घटनेतून समोर येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, विमानप्रवास व विमानवाहतूक यांच्याबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संदर्भात फार कडक नियम व निष्कर्ष आहेत. या सार्या नियमांचे पालन प्रवासी व मालवाहतुकीसंदर्भात कठोरपणे करावे लागते. यासाठी प्रामुख्याने प्रत्येक विमानतळावरुन विमानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवासी, त्यांचे सामान, विमानसेवेतील कर्मचारी व त्यांचे सहकर्मी या सार्यांची विशेष तपासणी केली जाते. यासाठी द्विस्तरीय सुरक्षा तपासणी पद्धती व यंत्रणेचाही वापर होतो. अगदी देशांतर्गत विमान प्रवासातही प्रवाशांना त्यांच्या बेल्टपासून पाण्याच्या बाटलीपर्यंतची तपासणी झाल्यावरच, त्यांना प्रवास करता येतो. एवढे सगळे नियम आणि सुरक्षापद्धती असतानाही ‘फ्लाय दुबई’च्या दहशतवादी घटनेमुळे, जगभरातील विमान सुरक्षा व सुरक्षित हवाईप्रवासवर मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानप्रवास सेवेशी संबंधित सर्व वस्तू-पदार्थांची, हाताळणी करणार्या प्रत्येकाची सखोल तपासणी ही अत्यावश्यक बाब म्हणून केली जाते, हे उल्लेखनीयच आहे. या विशेष सुरक्षा तपासणीत विमानवाहतूक व सेवेशी संबंधित सर्वजण म्हणजेच विमानतळ, विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानाची ने-आण अथवा हाताळणी करणारे कर्मचारी, प्रवाशांची प्रत्यक्षात सुरक्षा तपासणी करणारे विविध संस्थांचे तपासणी अधिकारी, विमानतळावर वाहनांद्वारे प्रवाशांना नेणारे, विमानाची साफसफाई करणारे, धावपट्टीवरील हालचालीचे नियंत्रण करणारे, विमानांची व वाहनांची निगा राखणारे, प्रवाशांचा खाद्यपदार्थ पुरविणारे, विमानाच्या आतील कर्मचारी, एवढेच नव्हे; तर वैमानिक-सहवैमानिक या सार्यांचीच कसून सुरक्षा तपासणी केली जाते. ते आवश्यकच आहे.
या सुरक्षा तपासणी यंत्रणा व पद्धतीशी संबंधित प्रवासी व कर्मचारी, हे प्रामाणिक व नियम पाळणारेच असतात. मात्र, विमानवाहतुकीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारे ज्या दुर्घटना झाल्या आहेत, त्यामागे विमानसेवा वा हवाईवाहतूक सेवेशी संबंधितच कर्मचारी वा व्यक्ती जबाबदार असल्याचे समोर आले आहे. काही वेळा त्यांनी हे कृत्य योजनापूर्वक व कट म्हणून केल्याचेही स्पष्ट झाले. विमान अपघाताच्या संदर्भातील पुढील मोठ्या घातपाती घटनांवरून, ही बाब स्पष्ट होते.
२०२५ मध्ये ‘शरम अल-शेख’ विमानतळावरील उड्डाणापूर्वी, कुणाच्या तरी मदतीने विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याच्या स्फोटामुळे विमानातील सर्व २२४ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी ‘जर्मनविंग्ज’च्या एका साहाय्यक वैमानिकाने, मानसिक आजारी असतानाही केलेल्या उड्डाणामुळे विमान धडकले. यामध्ये १५० जणांचा नाहक बळी गेला. २०१८ मध्ये एका विमानतळावरील विमान निगराणी विभागातील एका कर्मचार्याने, विमानातील काही महत्त्वाचे भाग काढून त्याची जाणीवपूर्वक चोरी केल्याचे ‘एफबीआय’च्या तपासणीत आढळून आले होते. २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामावर नसलेल्या एका वैमानिकाने, ‘कॉकपिट’मधील आग प्रतिबंधक यंत्रणेची मुद्दाम नासधूस केल्याचीही घटना घडली होती.
याशिवाय, २०२४-२५ दरम्यान ‘ऑस्प्रे फ्लाईट सोल्यूशन्स’च्या नोंदीनुसार, सुमारे २० देशांमध्ये विमानवाहतुकीच्या माध्यमातून नशेच्या पदार्थांची तस्करीची गंभीर नोंद घेण्यात आली आहे. याशिवाय, विमानप्रवास-सेवेच्या माध्यमातून सोन-हिर्यांचीही अवैध तस्करी झाल्याचे मध्यंतरी समोर आले होते. यात काही प्रमुख भारतीय विमानतळांचाही समावेश होता, ही बाब चिंताजनकच.
हवाईवाहतूक व प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित घटनांवर अधिक कठोर नियंत्रणाच्या उद्देशाने, आंतरराष्ट्रीय हवाईवाहतूक संघटनेने आपल्या सुरक्षा तपासणीच्या ‘परिशिष्ट १६’ मध्ये महत्त्वाचे बदल केले. यानुसार, विमानतळ व विमानवाहतूक क्षेत्राशी संबंधित ‘गैरप्रवासी’ व्यक्तींचीही कडक तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचदरम्यान, विमान सुरक्षा विषयाशी संबंधित ‘संभाव्य अंतर्गत धोका’विषयक विशेष सुरक्षा सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. याचे पालन करण्याच्या संदर्भात, आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक संघटनेच्या विशेष सुरक्षा नियमांचे पालन सुमारे फक्त ६५ टक्केच होत असल्याचे समोर आले असून, ही बाबही चिंताजनकच. विमान प्रवासातील विमान व विमान प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भातील वरील आकडेवारी क्षणभर बाजूला ठेवली, तरी या संदर्भात व विशेषतः ‘फ्लाय दुबई’ प्रकरणी कॅप्टन स्मितवरील हल्ल्यामुळे, लाखो प्रवाशांच्या विश्वासाला प्रचंड धक्का बसला आहे व ही बाब काळजी वाढविणारी ठरणार आहे.
एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे ५० लाख प्रवासी विमानप्रवास करणे अपेक्षित आहे. दरम्यान, विमान अपघातांचे प्रमाण व त्यातून होणार्या जीवघेण्या अपघातांमुळे, मृत प्रवाशांचे प्रमाणही वाढत आहे. तुलनात्मकदृष्ट्या नमूद बघितल्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावर अपघातग्रस्त विमानांची संख्या २०२३ मध्ये ६६ एवढी होती. ती एकाच वर्षात म्हणजे, २०२४ मध्ये तब्बल ९५वर गेली. याच एक वर्षाच्या कालावधीत हवाई अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ६२ वरून २९६ वर पोहोचली आहे.
‘फ्लाय दुबई’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे, विमानप्रवासाच्या सुरुवातीला होणार्या प्रवाशांच्या सुरक्षा उद्घोषणेत प्रवासाच्या दरम्यानच्या जोखमीची म्हणजेच, ‘आपातस्थिती’विषयीची घोषणा व त्यावेळच्या उपाययोजनांची महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते. ‘फ्लाय दुबई’नंतर ही कथित ‘आपातस्थिती’ केवळ विमानतळ वा विमानातच नव्हे, तर ‘कॉकपिट’मधील वैमानिक-सहवैमानिकामध्ये व सशस्त्र पद्धतीने होऊ शकते, याचा वस्तुपाठ उभ्या जगाला मिळाला आहे. कॅप्टन स्मित मच्छार आता उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले, ही बाब सर्वांसाठीच समाधानकारक. तरी त्यांचे सहवैमानिक असणार्या हमाम अल-हमामी यांची जिहादी वृत्ती व त्याचे जागतिक आव्हान मात्र कायम आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर - व्यवस्थापन सल्लागार आहेत)
९८२२८४७८८६