मुंबई : (Bharatiya Mazdoor Sangh Pulwama Office)काश्मीरमध्ये तळागाळातील लोकांशी संपर्क वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत भारतीय मजदूर संघाने पुलवामा येथे आपले पहिले कार्यालय सुरू केले आहे. या माध्यमातून या प्रदेशातील कामगार, कर्मचारी आणि लहान व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्याच्या संघटनेच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे. भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस सुरेंद्रनजी यांनी या परिसराला भेट देऊन फुलविक्रेते आणि लहान व्यावसायिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतानाच त्यांच्या उपजीविकेच्या साधनांविषयीही माहिती घेतली.
दक्षिण काश्मीरमधील मध्यवर्ती ठिकाण आणि या भागातील मोठ्या संख्येने असलेले कामगार लक्षात घेऊन पुलवामाची कार्यालयासाठी निवड करण्यात आली. काश्मीरमधील या स्तरावरील कार्यालय सुरू करण्यामागील उद्देश कर्मचाऱ्यांना आणि इतर कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणे तसेच त्यांच्याशी सन्मानाने वागले जाईल, याची खात्री करणे हा आहे, असे भारतीय मजदूर संघाचे काश्मीरमधील प्रभारी समीर कुचे यांनी सांगितले.(Bharatiya Mazdoor Sangh Pulwama Office)
कामगारांशी थेट संपर्क प्रस्थापित करण्याच्या भारतीय मजदूर संघाच्या बांधिलकीचे हे पाऊल प्रतीक आहे. कामगार आणि लघुउद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेणे, त्यांना सन्मानाची वागणूक मिळवून देणे, योग्य व्यवहार सुनिश्चित करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुलवामा येथे विभागीय कार्यालय सुरू झाल्याने दक्षिण काश्मीरमध्ये संघटनेचा विस्तार करण्याच्या भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नांना महत्त्वाचे बळ मिळाले आहे. कामगार आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या तसेच कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी हे कार्यालय संपर्ककेंद्र म्हणून काम करणार आहे.
कुचे यांच्या माहितीनुसार, काश्मीरमधील सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २० कामगार संघटना भारतीय मजदूर संघाशी संलग्न आहेत. कामगार आणि कर्मचाऱ्यांचे हित जपणे, हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी त्यांच्या धार्मिक किंवा राजकीय विचारसरणीचा कोणताही भेद केला जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सुरेंद्रनजी यांनी पुलवामा येथे फुलविक्रेते आणि लहान व्यावसायिकांशी साधलेल्या संवादातून सामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. विविध व्यवसायांत गुंतलेल्या लोकांची भेट घेऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.(Bharatiya Mazdoor Sangh Pulwama Office)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संबंधित अन्य संघटना यापूर्वीही काश्मीरमध्ये सक्रिय होत्या. मात्र, २०१९ नंतर तुलनेने शांततापूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संघटनात्मक कामासाठी अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे कुचे यांनी सांगितले. 'मुलांच्या हातात दगडांऐवजी पुस्तके आणि पेन असणे आवश्यक आहे, याची जाणीव आता लोकांना झाली आहे', असे ते म्हणाले. २०१९ पूर्वी पुलवामा येथे कार्यालय सुरू करणे कठीण का होते, हे स्पष्ट करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
२०२० नंतर परिस्थिती बदलली...
२०१९ पूर्वीच्या अनुभवांना उजाळा देताना कुचे यांनी या प्रदेशात आपली राजकीय आणि राष्ट्रीय बांधिलकी सार्वजनिकपणे व्यक्त करताना येणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला. २०२० पूर्वी पुलवामा येथे भारतीय राष्ट्रध्वज फडकवून त्याचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्या व्हिडिओवर आलेल्या १,३८४ प्रतिक्रियांपैकी केवळ दोन प्रतिक्रिया सकारात्मक होत्या, असे त्यांनी सांगितले. "२०२० नंतर परिस्थिती बदलली आहे. शांतता आणि विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक मूल शाळेत जाते आणि आनंदाने तिरंगा हातात घेते,” असे कुचे म्हणाले.(Bharatiya Mazdoor Sangh Pulwama Office)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक