समय लिखेगा, उनका भी अपराध|

    23-Oct-2026
 
 Jantar Mantar Protest and Ramesh Patange Editorial
 
जंतरमंतरवर गोंधळ घालणारी ‘दशानन सेना’ ही आसुरी सेना आहे आणि तिचे समर्थन करणारे महाराष्ट्रातील राजनेते,उत्तर प्रदेशातील, दिल्ली आणि इतर ठिकाणचे राजनेते हे सर्व असुरस्नेही आहेत.
 
दसर्‍याला भारतात सर्व ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम होतो. ‘रामायणा’तील कथेप्रमाणे रावणाला दहा तोंडे होती. शरीरशास्त्राप्रमाणे एका धडावर एकच तोंड असते. मग रावणाला दहा तोंडे कशी? ही दहा तोंडे राक्षसी प्रवृत्तीची प्रतीके आहेत. या प्रवृत्ती अशा- दंभ, दर्प, ईर्षा, मत्सर, क्रोध, असत्य भाषण, अहंकार, दुसर्‍याची वस्तू बळजबरीने प्राप्त करण्याची इच्छा, सत्प्रवृत्त लोकांचा छळ करण्याची वृत्ती, अत्यंतिक घोर लालसा. रावण या सर्व प्रवृत्तीचे प्रतीक होता. म्हणून, त्याला ‘दहातोंडी’ म्हणायचे!
 
जोवर मनुष्यसमाज अस्तित्वात राहणार आहे, तोवर या प्रवृत्ती १०० टक्के संपतील, असे वाटत नाही. वाल्मीकी महर्षींच्या ‘रामायणा’त ‘रामराज्य’ म्हणजे काय, हे उत्तम प्रकारे विशद केलेले आहे. हे ‘रामराज्य’ आदर्श राज्य आहे. परंतु, तो आदर्श आजच्या युगात आणि नजीकच्या भविष्यकाळात प्रत्यक्षात येणे, खरोखर शय आहे का? मनुष्यप्रवृत्ती पाहता ते संभवत नाही.
 
‘आदर्श राज्या’ची संकल्पना डोळ्यांसमोर धरून आपल्या संविधान निर्मात्यांनी उदात्त आशय असलेले संविधान निर्माण केले. सर्वांना न्याय, कायद्यापुढे समानता, सर्वांना कायद्याचे संरक्षण, सर्वांना उपासना पंथाचे स्वातंत्र्य, भारतात कुठेही जाऊन राहण्याचे स्वातंत्र्य, आवडीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, सर्वांना शिक्षण, आपले विचार मांडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता ही सर्व उदात्त मूल्ये आपल्या संविधानात कायदेशीर कलमात आलेली आहेत. ती सर्वांनी तंतोतत जगायचे ठरविले, तर दोन-चार वर्षांत ‘रामराज्य’ अवतरेल.
 
परंतु, समाजात असलेले रावण त्याप्रमाणे वागत नाहीत. ते दहा तोंडाने या सर्व मूल्यांविरुद्ध संघर्ष करीत राहतात. गेले सुमारे महिनाभर दिल्लीत जो गोंधळ चालू आहे आणि गोंधळ घालणारे ‘दशानन’ कोण आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते ‘रिजीम चेंज’ - सत्तापालटाची भाषा करतात. ते म्हणतात, ‘लढाई संसदेत होणार नाही, तर ती सडकेवर करावी लागेल.’ ते म्हणतात की, "आमची संसद आणि न्यायपालिका अकार्यक्षम झालेली आहे. न्यायपालिका न्याय देत नाही आणि संसद अन्यायाचे समर्थन करते.”
 
रावण चरित्रामध्ये आपण हे वाचतो की, रावण आणि त्याचे सहकारी हे मायावी होते. मायावी म्हणजे, हवे ते रूप घेणारे. सीतेला मोहात पाडणार्‍या सुवर्णकांती हरणाचे रूप रावणाचा मामा ‘मारीच’ याने घेतले. रावण संन्यासी बनून आला आणि त्याने सीतेचे अपहरण केले. रावणाच्या सर्व पुत्रांकडे आकाशात उंच उडण्याची, शरीर महाकाय करण्याची शक्ती होती. या सर्व शक्तींचा उपयोग करून ते सीतेला धमकावित असत. इथे सीता म्हणजे, धर्माचरणाची मूर्तिमंत मूर्ती आहे. ती आपला पत्नीधर्म सोडायला तयार नाही. आपल्या न्यायव्यवस्थेचे ब्रिदवाय आहे, ‘यतो धर्मस्ततो जयः’ जेथे धर्म, तेथे विजय!
 
जंतरमंतरवर गोंधळ घालणारी ‘दशानन सेना’ ही आसुरी सेना आहे आणि तिचे समर्थन करणारे महाराष्ट्रातील राजनेते, उत्तर प्रदेशातील, दिल्ली आणि इतर ठिकाणचे राजनेते हे सर्व असुरस्नेही आहेत. आपले पवित्र संविधान सांगते की, यथावकाश सत्ताबदल झाला पाहिजे. परंतु, तो मतपेटीच्या माध्यमातून झाला पाहिजे. संसदेत अविश्वासाचा प्रस्ताव आणून झाला पाहिजे. ज्यांना सत्ता प्राप्त करायची आहे, त्यांनी सर्वप्रथम लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. बर्गर आणि बिर्याणी खाऊन आणि वाटेल त्या शिव्या देऊन लोकांचा विश्वास प्राप्त होत नाही.
 
लोकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी लोकांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न हाती घ्यावे लागतात. प्रश्न अनंत आहेत. कुठलाही प्रश्न हाती घेऊन आंदोलन करता येत नाही, ते यशस्वी होत नाही. प्रतिभावंत राजनेता एखाद-दुसर्‍या विषयावर सर्वशक्ती केंद्रित करतो. ज्या प्रमाणे गोलकातून केंद्रीभूत सूर्यकिरण जेव्हा कापसावर पडतात, तेव्हा कापूस जळू लागतो. अशी प्रतिभा नसली की, झुरळांना बरोबर घेऊन किंवा त्यांना आपल्या अंगाखांद्यावर बागडून आंदोलन करावे लागते.
 
अशा आंदोलनाला कोणतीही दिशा राहात नाही. सत्ताबदल करायचा आहे, ही घोषणा होते. परंतु, ज्या जनतेसाठी सत्ताबदल करायचा आहे, ती जनता जर म्हणत असेल की, आम्हाला सत्ताबदल नको आहे; तर तुम्ही कितीही डोके आपटले, तरी त्या डोयाखाली झुरळे मरतील, बाकी काही होणार नाही.
 
हा संघर्ष ‘यतो धर्मस्ततो जयः’ या सर्वोच्च न्यायालयाच्या घोषवायाच्या विरुद्ध आहे. सगळे रावणाचार्य ‘यतो अधर्मोस्ततो जयः’ या मनोवृत्तीने पछाडलेले आहेत. सनातन भारताच्या इतिहासात अधर्माचा जय झाल्याचे एकही उदाहरण नाही. अधर्मी लोक काहीकाळ यशस्वी होतात. त्यांच्या असंख्य कथा आहेत. हिरण्यकश्यपुची कथा सर्वांना माहीत आहे. त्याला मांडीवर घेऊन नरसिंहाने त्याचे पोट फाडले. कंसाला कृष्णाने यमसदनात पाठविले आणि कुरुक्षेत्रावरील सर्व अधर्मी राजे, महाराजे आणि त्यांचे चाहते या सर्वांना कृष्णाने पांडवांच्या मतदीने विक्राळ काळाच्या उदरात टाकून दिले.
या असुर संग्रामासंबंधीचे एक उत्तम गीत आहे-
 
‘अभी कुरुक्षेत्र में
पाञ्चजन्य बजाना बाकी हैं,
असुर निर्दलन बाकी हैं,
राष्ट्र का वैभव पाना बाकी हैं|
कोटि-कोटि कंठों से मिलकर,
नव इतिहास बनाना बाकी हैं,
धर्म-ध्वजा को विश्व पटल पर,
फिर से आज फहराना बाकी हैं|
असुर निर्दलन बाकी हैं,
राष्ट्र का वैभव पाना बाकी हैं|
 
अल्बानियात सर्वोच्च न्यायालयाला आंदोलकांनी आग लावली. तशी आग लावण्याचे स्वप्न पाहणार्‍या अनेकांना आनंद झाला. त्यांनी सरकारला इशारे द्यायला सुरुवात केली. भारतातही हे घडू शकते, असे दिवास्वप्न ते पाहू लागले आहेत. परंतु, भारतीय जनता ही भारतीय जनता आहे. ती प्रसंग आल्यास ‘नरसिंह’ अवतार धारण करू शकते. भगवान शंकराप्रमाणे तिसरा डोळा उघडू शकते आणि हनुमंताप्रमाणे विक्राळ रूप धारण करून जबरदस्त गदाप्रहार करू शकते. हे सर्व असुरीशक्तींनी समजून घेणे आवश्यक आहे आणि धर्मशरण होणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांचा रावण झाल्याशिवाय काही राहात नाही.
 
कवी दिनकर यांनी आपल्या सर्वांना एक उत्तम इशारा देऊन ठेवला आहे. एका कवितेतील त्यांच्या काही ओळी जे कुंपणावर बसलेले असतात, त्यांनी उत्तम प्रकारे समजून घ्याव्यात अशा आहेत, ते म्हणतात-
 
समर शेष हैं,
नहीं पाप का
भागी केवल व्याध,
जो तटस्थ हैं,
समय लिखेगा
उनका भी अपराध|
 
रमेश पतंगे
९८६९२०६१०१




संबंधित मजकूर