मुंबई (Zakir Naik India Return) : फरार इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याने भाजप केंद्रातील सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच आपण भारतात परतणार असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नाईकने भारतात सत्तांतर व्हावे, अशी आपली इच्छा उघडपणे व्यक्त केली. मनी लाँडरिंग, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत आणि प्रक्षोभक भाषणे अशा गंभीर आरोपांप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला नाईक याने केंद्रातील भाजप सरकार सत्तेतून गेल्यानंतरच भारतात पाऊल ठेवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
समोर आलेल्या स्टींग ऑपरेशनच्या व्हिडिओ फुटेजनुसार, नाईकने नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर असताना भारतात परतण्याची भीती वाटत असल्याचे कबूल केल्याची माहिती आहे. भारतात परतल्यास आपल्याला अटक होऊ शकते किंवा पुन्हा परदेशात जाण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो, अशी त्याला भीती असल्याचे यातून दिसून येते. त्याचबरोबर भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवत नाईकने ‘कॉकरोच जनता पार्टी’ संबंधित अराजकतावादी घटकांचे समर्थन केले. या घटकांकडून बांगलादेश आणि नेपाळमधील अलीकडील अशांततेप्रमाणे भारतातही व्यापक जनक्षोभ निर्माण करून सत्तांतर घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.(Zakir Naik India Return)
स्टिंग ऑपरेशनदरम्यान नाईकने भारतातील राजकीय परिस्थिती बदलण्याची आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली; तर काँग्रेस नेते राहुल गांधींचे कौतुक केले. काँग्रेसला स्वबळावर पुन्हा सत्ता मिळवता येईल का, असे विचारले असता नाईकने काँग्रेसला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूचित केले. मात्र, “काँग्रेसने आघाडी सरकारच्या माध्यमातून सत्तेवर यायला हवे!” असे तो म्हणाला. अशा राजकीय बदलामुळे भारतात परतण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे त्याने सूचित केले. राष्ट्रीय सुरक्षा आणि कट्टरतावादाबाबत पंतप्रधान मोदी सरकारच्या कठोर भूमिकेच्या तुलनेत नाईकला अपेक्षित असलेला राजकीय पर्याय वेगळा असल्याचेही निदर्शनास येते आहे.(Zakir Naik India Return)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक