मुंबई : (Vasudhaiva Kutumbakam India)‘वसुधैव कुटुंबकम्’ हीच आपल्या भारताची मूळ ओळख आणि संस्कृती आहे. या जीवनदृष्टीला अनुसरून संघ स्वयंसेवकांनी राष्ट्रपरिवर्तन व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजात प्रत्यक्ष उतरून काम करणे गरजेचे आहे. राष्ट्रनिर्माणाच्या या कार्यात समाजातील सर्व सज्जनशक्तीला सोबत घेऊन काम करण्यास संघ सदैव तत्पर आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (विद्यापीठ भाग) तर्फे आयोजित विजयादशमी उत्सवात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्पीथिएटरमध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर, विद्यापीठ भाग संघचालक सुभाष कदम आणि गोखलेनगर भाग संघचालक अनिल देशमुख उपस्थित होते.(Vasudhaiva Kutumbakam India)
संघाच्या शताब्दी वर्षातील विविध उपक्रमांचा संदर्भ देत मनमोहन वैद्य म्हणाले, "स्वयंसेवकांनी स्वतःमध्ये ‘स्व’बोध आणि स्व-जागरूकता निर्माण करून ती प्रत्यक्ष आचरणात आणणे काळाची गरज आहे. तरच देश प्रगतीच्या पथावर वेगाने पुढे जाईल. आपल्या प्राचीन संस्कृतीतील कालजयी व समृद्ध मूल्यांचा आपण अभिमानाने स्वीकार केला पाहिजे. संघात व्यक्ती निर्माण हेच मुख्य ध्येय असून, राष्ट्रविकासाची स्पष्ट दृष्टी असल्यामुळेच आज समाज संघाकडे आकर्षित होत आहे."
समाजातील वाढत्या अपेक्षांचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, "योग्य दृष्टिकोन ठेवून स्वयंसेवकांनी पुढाकार घेतल्यास समाजातील अनेक प्रश्न सुटू शकतील. याच भावनेतून आज संघ सेवा, संपर्क, ग्रामविकास, गोसेवा, सद्भाव, सामाजिक समरसता, धर्मजागरण आणि शिक्षण यांसारख्या विविध सामाजिक क्षेत्रांत व्यापक कार्य करत आहे."(Vasudhaiva Kutumbakam India)
उत्सवापूर्वी सकाळी ८.०० ते ९.३० या वेळेत गोखलेनगर आणि विद्यापीठ परिसरात पूर्ण गणवेशातील ५३० हून अधिक स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध सघोष पथसंचलन पार पडले. संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी व महिलांनी पथसंचलनावर उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नगर कार्यवाह प्रथमेश निरगुडकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर स्वयंसेवकांनी 'नियुद्ध'चे प्रात्यक्षिक सादर केले. या सोहळ्यास परिसरातील नागरिक, महिला व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Vasudhaiva Kutumbakam India)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक