मुंबई (Tripura Youth Racial Abuse Case) : दिल्लीमध्ये त्रिपुरातील एका तरुणासोबत वांशिक दुर्व्यवहार केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणात कंटेंट क्रिएटर आमिर शौकीन याच्यावर संबंधित तरुणाविरोधात वांशिक टिप्पणी करणे, आक्षेपार्ह हावभाव करणे आणि त्रिपुरा राज्यासाठी अपमानास्पद शब्द वापरण्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ १९ सप्टेंबर रोजी अपलोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे ईशान्य भारतातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर आमिर शौकीन याने इन्स्टाग्रामवरून माफी मागितली आहे. हा व्हिडिओ पूर्वनियोजित पटकथेनुसार तयार करण्यात आल्याचा दावा त्याने केला. तसेच, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण आपला परिचित असल्याचेही त्याने सांगितले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्याने स्पष्ट केले. त्रिपुरातील नागरिकांची माफी मागताना त्याने म्हटले की, आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आपल्याला खेद आहे. मात्र, माफीनंतरही या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी कायम आहे.(Tripura Youth Racial Abuse Case)
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या वांशिक दुर्व्यवहाराचा निषेध करत आरोपीविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, या दुष्ट व्यक्तीला शिक्षा होईल. अधिकृत तक्रार दाखल करण्यास विलंब झाला असला, तरी दिल्ली पोलीस आणि त्रिपुरा पोलीस त्याला धडा शिकवतील. समाजातील अशा चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करणारे आणि ते सहन करणारे लोकही द्वेष पसरवण्यासाठी जबाबदार असल्याचे मत रिजिजू यांनी व्यक्त केले.
त्रिपुरातील दोन संघटनांनी या प्रकरणी अगरतळा येथील एनसीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये यूथ टिपरा फेडरेशन आणि टिपरा इंडिजिनस स्टुडंट्स फेडरेशन या संघटनांचा समावेश आहे. आमिर शौकीन याने त्रिपुरातील तरुणाला लक्ष्य करून कथित वांशिक टिप्पणी केल्याचा आणि राज्यातील नागरिकांविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली आहे.(Tripura Youth Racial Abuse Case)
हे प्रकरण समोर आल्यानंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिल्ली पोलिसांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेप्रकरणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक