लेखी हमीपत्रानंतर दास व रांका यांची सुटका; पुढील सुनावणी २३ ऑक्टोबरला

    22-Oct-2026   

Saurav Das and Ashutosh Ranka Release
 
मुंबई (Saurav Das and Ashutosh Ranka Release) : दिल्ली उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतल्यानंतर काही तासांतच ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरव दास आणि आशुतोष रंका यांची २१ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. जंतरमंतर येथे आंदोलन पुकारणार नाही आणि शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था कायम राखू, असे लेखी हमीपत्र दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त ऋतुराज यांच्यासमोर ही हमीपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलका आणि जामीनदाराच्या हमीवर दोघांच्या सुटकेचे आदेश दिले.
 
दोघांनी स्वतंत्रपणे सादर केलेल्या हमीपत्रांमध्ये शांततेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच, ‘एसईएम न्यायालयासह न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. कायद्यानुसार जंतरमंतर हे आंदोलनस्थळ अधिसूचित क्षेत्रातून वगळलेले असेपर्यंत तेथे आंदोलन करण्याचे आवाहन करणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली. भविष्यात कोणतेही आंदोलन केल्यास ते संविधानाच्या चौकटीतच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Saurav Das and Ashutosh Ranka Release)
 
दि. १३ ऑक्टोबर रोजी पूर्वीच्या एका कारवाईनंतर शांतता राखण्याचे हमीपत्र दिलेले असतानाही दोघांनी अनधिकृतपणे जंतरमंतर परिसरात प्रवेश केला होता. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सात दिवसांच्या कोठडीनंतर त्यांची सुटका झाली. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी १९ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी केलेल्या काही विधानांकडे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या विधानांमुळे एसईएम न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप करण्यात आला. दास आणि रंका यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी न्यायालयात तोंडी आणि बिनशर्त माफी मागितली. तसेच, भविष्यात अशा प्रकारचे वर्तन पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही दिली.
 
यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दोघांच्या वर्तनाबद्दल गंभीर आक्षेप नोंदवले होते. त्यांच्या कृतीतून कायद्याबद्दल आदर नसल्याचे दिसून येते, तसेच अधिसूचित क्षेत्रातून वगळलेल्या ठिकाणी वारंवार आंदोलनाचे आवाहन करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे चिंता निर्माण होत असल्याचे दंडाधिकाऱ्यांनी नमूद केले होते. मात्र, बुधवारी सुनावणीदरम्यान भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १३५(३) अंतर्गत अपेक्षित प्रतिबंधात्मक उपाययोजना नव्याने सादर केलेल्या लेखी हमीपत्रांसह शांतता राखण्याच्या मुचलक्यांद्वारे पुरेशा प्रमाणात सुनिश्चित करता येतील, असे दंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या टप्प्यावर दोघांना आणखी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी नमूद केले. दिल्ली पोलिसांनी आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची केलेली मागणीही त्यांनी फेटाळली.(Saurav Das and Ashutosh Ranka Release)
 
दरम्यान, बुधवारीच दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांनी पूर्वी दिलेल्या शांतता राखण्याच्या हमीपत्रांचा कथित भंग केल्याबद्दल आणि उपलब्ध वैधानिक उपायांचा अवलंब करण्याऐवजी उच्च न्यायालयात धाव घेतल्याबद्दल दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर दोघांनीही आपल्या याचिका मागे घेतल्या. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोरील या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू आहे. पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी होणार असून, जामीनदारांच्या पडताळणीसंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.(Saurav Das and Ashutosh Ranka Release)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर