राऊत सांगा कुणाचे?

    22-Oct-2026   
 
Sanjay Raut Rahul Gandhi Regime Change Statement
 
"राहुल गांधी व्हिएतनामहून आले की, भारतात ‘रिजीम चेंज’ होईल,” असे महाराष्ट्रातल्या ‘उद्धव ब्रो’चे ‘राईट हॅण्ड’ संजय राऊत म्हणाले. ममा, मी परदेशात जाऊन भारताची सत्ता उलथवण्याचे कारस्थान करतो, असाच त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे ना? अरे, हे कोण म्हणाले की, आधीच काँग्रेसला देशात कुणी विचारत नाही. वर संजय राऊत मला नेता मानतात आणि मी परदेशात देशाची सत्ता उलथवण्यासाठी जातो, हे पाहून लोक तसेही देशाची ‘रिजीम’ बदलणार नव्हते. मात्र, राऊतांच्या बोलण्यावरून लोक आपल्याला हाकलवून काँग्रेसमधील आपलीच ‘रिजीम चेंज’ करतील!
 
तसे पण ‘रिजीम चेंज’च्या नादात जानवे घालून दाखवले, कालपरवा तर मी आणि माझी बहीण आंदोलनाच्या नावावर रस्त्यावर पडून राहिलो. झुरळांबरोबर झुरळ झालो. मी ‘हिंदू दहशतवाद’ म्हणायचो, मंदिरात मुलींना छेडण्यासाठी जातात म्हणायचो; पण आता मला हे सगळे म्हणता येत नाही. पूर्वी कसे मनात आले तेव्हा नानीच्या गावी जावे, मनात आले तेव्हा थायलंडला जावे, मनात आले तेव्हा व्हिएतनामला जावे, मनात आले तर पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंगांनी पास केलेला निर्णयाचा कागद फाडून टाकावा, एका इशार्‍यावर देशाचे प्रशासन हलत होते; आता काय? प्रशासन तर सोडाच, देशाची जनता पण भाव देत नाही. बरे जरा कुठे मन मोकळे करायला गेलो व्हिएतनामला, तर लगेच संजय राऊत म्हणाले, ‘मी व्हिएतनामहून आलो की, सत्ता पलटवणार आहे!’ त्यांच्या अशा बोलण्याने लोक आणि कमळवाले सगळं खणून काढतील- मी व्हिएतनामला गेलो होतो का? तिथे काय केले? आपल्या गँगचा, साथीदार काय करतो हे लहान मुले पण सांगत नाहीत. गुलाब पाटील म्हणाले होते की, "राऊत पांढर्‍या पायाचे आहेत. जातील तिथे सगळा सत्यानाश होतो.” तर, हे राऊत कुणाच्या बाजूने आहेत? मी व्हिएतनामहून आल्यावर ‘रिजीम चेंज’ करणार, असे बोलून त्यांनी लोकांना ‘अर्लट’ केले. ‘धुरंधर’ सिनेमात ‘हिरो’ जशी पाकिस्तानची वाट लावतो, तसे उरलेला उबाठा पक्ष आणि आपल्या उरलेल्या काँग्रेसला संपवण्यासाठी त्यांना कुणी आपल्यात सोडले नाही ना? ममा, राऊत कुणाचे आहेत? हे कोण म्हणाले की, "राऊत थालीचे बैंगन आहेत. सत्ता मिळवायची या विचाराने ते कुणाचेही समर्थन करतात. अगदी झुरळ असो की उमर खालिद! सांगा राऊत नक्की कुणाचे?”
 
झुरळांची वळवळ!
 
या देशावर मुस्लिमांनी ८०० वर्षे कट्टरतेचे जुलमी राज्य केले, इंग्रजांनी दीडशे वर्षे कपटी हिंसक सत्ता राबवली; पण या देशाची संस्कृती, संस्कार आणि हिंदूमन ते बदलू शकले नाहीत. पण, झुरळांना वाटले की, जंतरमंतरवर काही लोकांना नंगानाच करायला लावून या देशाचे संस्कार आणि संस्कृती कोलमडून टाकू. तसेच परदेशात जसे लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात हिंसक दंगल करतात, तसे झुरळ नेत्यांना अटक केल्यावर मोठा जनक्षोभ उसळेल, असा अभिजीत झुरळासह अनेक झुरळसमर्थकांचा आशावाद होता. पण, तसे झाले नाही. आशुतोष आणि सौरभ झुरळावर कारवाई झाली. मग स्वतःला वाचवण्यासाठी झुरळ अभिजीत काय म्हणाला तर, "माझं काम फक्त आशुतोष आणि सौरभच्या ऑर्डर फॉलो करणं होतं. बाहेर लोकांना वाटतंय की, मी लीडर आहे. पण, मी लीडर नाही.” तर हा आहे झुरळांचा नेता.
 
असो. पेपरफुटीच्या विरोधात सुरू झालेले झुरळ आंदोलन ठरल्याप्रमाणे ‘एसआयआर’ प्रक्रियेवर येऊन थांबले. दुबार आणि खोट्या मतदारांची नावे मतदारयादीतून रद्द करणार्‍या या ‘एसआयआर’ प्रक्रियेला झुरळांचा विरोध का? ‘ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा,’ असे म्हणत तेच झुरळ आंदोलनाच्या नावावर ‘मेरा लिंग मेरी मर्जी’चा नारा का देत होते? समाजासह आई-बाबांनी ओवाळून टाकलेले आणि अश्लील हावभाव करणारे विकृत लोक हे या देशाचे भाग्यविधाता आहेत, असे दाखवून समाजाचा-देशाचा अपमान करण्याचे कारस्थान झुरळ अभिजीत आणि त्याच्या समर्थकांनी केले. आता झुरळ आंदोलनाची तुलना फ्रान्सच्या हिंसक आंदोलनाशी करू नका, असे दीपके म्हणतो. पण, दीपक्याला या देशात काय करायचे होते आणि त्याचे आका कोण आहेत, हे भारतीयांना चांगले माहिती आहे. त्यामुळेच आशुतोष आणि सौरभवर कारवाई झाली आणि भारतीय जनतेने जल्लोष केला. लोकांनी दसर्‍याला रावणाबरोबर झुरळाचा पुतळा जाळला. सत्याला सत्य आणि असत्याला सत्य म्हणण्याचे संस्कार आजही भारतीयांमध्ये आहेत. त्यामुळे ‘झुरळराजा’ अभिजीत दीपकेला आंदोलनाच्या नावावर चालणारी विकृतता थांबवावी लागली. तरीही, दीपक्या झुरळाची वळवळ कायमची थांबायला हवी.
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर