फ्रान्समधील दंगली आणि भारतातील आंदोलनाचा परस्पर संबंध

फॉक्स न्यूजच्या अहवालातून नऊ देशांमधील १०१ संघटनांचे जाळे उघड

    22-Oct-2026   

France and India Protests
 
नवी दिल्ली :  (France and India Protests)फ्रान्समधील दंगली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत भारतात सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनांमध्ये परस्पर संबंध असल्याचा दावा ‘फॉक्स न्यूज’च्या डिजिटल तपास अहवालात करण्यात आला आहे. ‘फॉक्स न्यूज’च्या वरिष्ठ संपादक अस्रा नोमानी यांनी केलेल्या या तपासात नऊ देशांमधील १०१ संघटनांचे जाळे उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संघटना ‘रेड-ग्रीन प्रोटेस्ट इकोसिस्टम’चा भाग असल्याचे अहवालात म्हटले आहे. या संज्ञेद्वारे इस्लामी आणि कम्युनिस्ट गटांचा संदर्भ देण्यात आला असून, हे गट युरोपमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांचे समन्वयन, आयोजन किंवा प्रसार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आंदोलनांचे जाळे विस्तारत असल्याचेही अहवालात नमूद आहे.
 
‘ग्लोबल केऑस इन्क. ग्रोज टू १०१ ग्रुप्स’ या शीर्षकाच्या अहवालात फ्रान्सस्थित ‘इंडियन अलायन्स पॅरिस’ या संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. फ्रान्स आणि भारतातील आंदोलनांशी संबंधित संदेशांमध्ये ही संघटना दुवा म्हणून काम करत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. तसेच, या संघटनेची मॅनहॅटनमधील ‘पीपल्स फोरम’शी भागीदारी असल्याचेही म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या भांडवलशाहीविरोधी संघटनेच्या ‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’ या संघटनेचाही अहवालात उल्लेख आहे. १६ ऑक्टोबर रोजी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या संघटनेने फ्रान्स, स्पेन, भारत आणि अल्बानिया येथील सध्याच्या आंदोलनांचा एकत्रित उल्लेख केला होता. या नव्या बंडखोर आंदोलनांना त्यांना जन्म देणाऱ्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याइतकी संघटित ताकद प्राप्त होऊ शकते का, असा प्रश्नही या निवेदनात उपस्थित करण्यात आला होता. ‘या आंदोलनांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्यात परस्पर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल काम करत आहे,’ असे या संघटनेने आपल्या निवेदनात म्हटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.(France and India Protests)
 
नोमानी यांच्या अहवालानुसार, युरोपमधील अस्थिरतेला कम्युनिस्ट विचारसरणीशी संबंधित संघटनांच्या जाळ्याकडूनही अनुकूल प्रसिद्धी दिली जात आहे. यामध्ये ‘ब्रेक थ्रू न्यूज’, ‘कोडपिंक’ आणि ‘पार्टी फॉर सोशलिझम अँड लिबरेशन’ या संघटनांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संघटनांना शांघायमध्ये वास्तव्यास असलेले अमेरिकेत जन्मलेले तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती नेव्हिल रॉय सिंघम यांच्याकडून आर्थिक मदत आणि पाठबळ मिळत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
 
दि. १४ ऑक्टोबर रोजी ‘ब्रेक थ्रू न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीत सिंघम यांच्या पत्नी आणि ‘कोडपिंक’च्या सहसंस्थापक जोडी इव्हान्स यांनी फ्रान्स, स्पेन आणि भारतातील आंदोलनांचा उल्लेख केला होता. "लोकांनी फ्रान्स, स्पेन आणि भारताकडे पाहून स्वतःलाच विचारावे, आपण कुठे आहोत? आपण रस्त्यावर का उतरत नाही?" असे विधान त्यांनी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ‘डिसइन्फोलॅब’ या अन्य एका ‘एक्स’ खात्यावरून पॅरिसस्थित भारतीय वंशाचे पत्रकार आणि आयएपीचे सचिव जॉय बॅनर्जी यांच्याविषयी एक पोस्ट करण्यात आली होती. बॅनर्जी हे यापूर्वी फ्रान्समधील सीजीटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी होते आणि त्यांचे फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता.(France and India Protests)
 
ग्रीस, बेल्जियम, इटली, फ्रान्स अशा विविध ठिकाणी अराजकता पसरल्याचे दिसते आहे. त्या-त्या सरकारने अशा अराजकतावाद्यांवर तातडीने कारवाई करावी. अहवालातून अनेक खुलासे झाले, मात्र आता कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. भारताने देखील अमेरिकेकडून तसेच संबंधित देशांकडून ह्या संबंधी कारवाई करण्याबाबत पुढाकार घ्यावा व केलेल्या कारवाईची माहिती जगासमोर आणावी, अशी मागणी आहे.- प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर