मुंबईतील ‘पार्ले-टिळक विद्यालय असोसिएशन’च्या साठये महाविद्यालयात (स्वायत्त) दि. १६ आणि दि. १७ ऑक्टोबर रोजी साठये महाविद्यालय (स्वायत्त), भारतीय भाषा समिती, शिक्षण मंत्रालय भारत सरकार, विज्ञान भारती कोकण प्रांत आणि ‘सृष्टिज्ञान’ मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित लेखकांसाठी दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय परिसंवाद आणि रुजवात कार्यानुभव आयोजित करण्यात आला होता. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत...
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे विकसित झालेल्या नवनवीन गोष्टी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी नवोदित लेखकांसाठी दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. साठये महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाच्या विभागप्रमुख सुकृता पेठे या परिसंवादाच्या संयोजिका होत्या, तर भारतीय भाषा समिती, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार येथील शैक्षणिक समन्वयक डॉ. रचना विश्वकर्मा या परिसंवादाच्या सहसंयोजिका होत्या. भारतीय भाषा समितीकडून मिळालेल्या अनुदानामुळे हा परिसंवाद पार पडू शकला.
परिसंवादाचे उद्घाटन पहिल्या दिवशी (दि. १६ ऑक्टोबर) सकाळी ९.३० वाजता विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांच्या उद्घाटनपर संबोधनाने सुरू झाले. याप्रसंगी साठये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी साठये महाविद्यालय, तसेच भारतीय भाषा समितीचा परिचय उपस्थितांना करून दिला, तर नरेश चाफेकरांनी ‘विज्ञानभारती’विषयी आणि डॉ. जयंत जोशी यांनी ‘विज्ञानभारती’ व ‘सृष्टिजन’ मासिकाविषयी उपस्थितांना माहिती दिली. विज्ञानलेखनाविषयी आवड आणि आत्मविश्वास विकसित करणे, योग्य शब्द वापरण्यासाठी शब्द कसे वापरावे, शब्दकोशाचा वापर करून आपले लिखाण समृद्ध करावे, लिखाण करताना योग्य संदर्भ वापरून स्रोत नमूद करणे, तसेच लिखाण संक्षिप्त आणि नेमके ठेवावे, या सर्व गोष्टींबाबत त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात बीजभाषणाने झाली. या बीजभाषणाचे वक्ते होते डॉ. बाळ फोंडके. त्यांनी विज्ञान आणि मराठी भाषा यांची उत्तम सांगड घालत अत्यंत सोप्या व रंजक भाषेत मार्गदर्शन केले. कठीण वैज्ञानिक संकल्पना सुलभतेने स्पष्ट करून त्यांनी या परिसंवादाची सुरुवात अतिशय ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी पद्धतीने केली.
डॉ. बाळ फोंडके यांच्या भाषणानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचा विषय होता, ‘विज्ञान लेखनातील सध्याच्या परिस्थितीतील आव्हाने.’ या चर्चासत्रासाठी चार तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. बाळ फोंडके, हेमंत लागवणकर, डॉ. शशिकांत धारणे आणि डॉ. मेधा लिमये या तज्ज्ञांनी सध्याच्या काळात मराठीतून विज्ञान लेखन करताना येणार्या अडचणी, परिभाषेचे आव्हान आणि वाचकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग यावर सखोल चर्चा केली. नवोदित लेखकांनी या क्षेत्रातील आव्हानावर मात कशी करावी, याचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन या सत्रातून मिळाले. या चर्चेनतर हेमंत लागवणकर यांनी विज्ञान लेखनासाठी योग्य विषयाची निवड कशी करावी आणि मजकुराला नेमकी दिशा कशी द्यावी, यावर मार्गदर्शन केले. सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी नवोदित लेखकाच्या मनात असणार्या शंकांचे निरसन करून त्यांच्यात लेखनाचा आत्मविश्वास निर्माण केला.
‘वैज्ञानिक भाषा आणि शब्दसंपदा’ या विषयावर डॉ. शशिकांत धारणे यांनी आपली मते मांडली. वैज्ञानिक संकल्पनेमध्ये अचूकपणाा आणण्यासाठी योग्य भाषा संज्ञा यांचे त्यांनी महत्त्व विशद केले. ‘मराठी शब्दसंग्रह संपत्तीचा विश्वसनीय स्रोत आणि संदर्भलेखन’ या विषयावर डॉ. मेधा लिमये यांनी आपली मते मांडली. लेखनासाठी विश्वासनीय स्रोत ओळखणे, माहितीची पडताळणी करणे, अचूकता व विश्वासार्हता सुनिश्चित करणे, तसेच योग्य संदर्भ पद्धतीचे पालन कसे करावे, या गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात डॉ. सुधीर पानसे यांनी वैज्ञानिक माहितीची संक्षिप्त व प्रभावी मांडणी कशी करावी, तसेच लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत कशी मांडावी, याबद्दल मार्गदर्शन केले.
दुसर्या दिवसाची (दि. १७ ऑटोबर) सुरुवात सकाळी स्मिता पोतनीस यांच्या ‘मराठी विज्ञान कथा; संकल्पना ते लेखन’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. या सत्रात त्यानी विज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान कथेचे नियम काय असतात, हे स्पष्ट केले. तसेच, विज्ञानकथा म्हणजे काय नाही,’ हेदेखील त्यांनी अचूकपणे समजावून सांगितले. अभिजित मुळ्ये यांनी ‘विविध माध्यमांसाठी विज्ञान लेखन’ या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले.
रुजवात कार्यानुभव : पहिल्या दोन व्याख्यानांनंतर महाविद्यालयाच्या ग्रंथपाल स्वप्ना गावडे आणि शिक्षकांनी एक प्रात्यक्षिक सत्र घेतले. या सत्राचे नियंत्रण डॉ. शशिकांत धारणे आणि त्यांच्या सहकारी जयंत जोशी यांनी केले. निवडलेल्या विषयावर निबंध लिहायला सांगण्यात आले. लेखनाबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. ९.३० वाजता विज्ञानकथा सत्रावर आधारित प्रात्यक्षिके घेण्यात आली. वैज्ञानिक तसेच संशोधकांनी आपापल्या विषयातील संशोधन मराठीत सादर केले. नूतन कर्णिक (प्राणिशास्त्र) यांनी हे सत्र आभासी (ऑनलाईन) पद्धतीने घेतले. त्यांनी एका विशिष्ट प्रकारच्या मुंग्यांबद्दल अतिशय रंजक माहिती दिली. राणी मुंगी आपली सत्ता कशा प्रकारे हस्तांतरित करते, हे रहस्य त्यांनी उलगडले, जे अनेक लोकांसाठी नवीन होते.
पुढे डॉ. अनुराधा गर्ग (गणित) यांनी मराठी संशोधनावर आधारित सादर व्याख्यान सादर केले. प्रा. आलोक दाबाडे (सांख्यिकी शास्त्र) यांनी ‘उपयोजित संख्याशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मागणी आणि पुरवठा, तसेच रोजच्या वापरातील गोष्टींची उदाहरणे देऊन विषय सोपा करून सांगितला. सांख्यिकी शास्त्राचा वापर आपण कुठेकठे करू शकतो, हे त्यांनी समर्पक उदाहरणांतून स्पष्ट केले. डॉ. मनीष भट (सूक्ष्मजीवशास्त्र) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अमोल दिघे यांनी ‘बर्फाखाली आकाश शोधणारी दुर्बीण’ या विषयावर अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान दिले. सहज व सुंदर उदाहरण देऊन त्यांनी अणुभट्टीची संकल्पना स्पष्ट केली. डॉ. कल्पित म्हात्रे (वनस्पतिशास्त्र) यांनी आभासी पद्धतीने हे व्याख्यान दिले. त्याच्या सादरीकरणाचा विषय महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमातीमधील पारंपरिक औषधी ज्ञान व वनस्पती विविधता हा होता. त्यांनी साधारणतः २०० आजारांवर कोणत्या वनस्पतीचा वापर करतात, हे दाखवून दिले. या सादरीकरणातून हे स्पष्ट झाले की, बर्याच वेळा अशिक्षित लोकांकडेही तज्ज्ञ डॉटरांइतकेच सखोल आणि प्रभावी ज्ञान असते.
‘विज्ञान भारती’चे राष्ट्रीय सहसचिव प्रवीण रामदासी यांनी आपले मनोगत उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाची सांगता पदार्थविज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथील निवृत्त प्राध्यापक विज्ञानकथा लेखक डॉ. संजय ढोले यांच्या उपस्थितीत झाली. कार्यक्रमाचा आढावा सादर झाल्यावर डॉ. ढोले यांच्या भाषणाने परिसंवादाची सांगता झाली. एकूण १४३ जण या परिसंवादात सहभागी झाले. नोंदणी केलेल्या सदस्यांना आयोजकांकडून ‘सृष्टिज्ञान’ आणि ‘सायन्स इंडिया’ मासिकाचे अंक देण्यात आले. तसेच परिसंवादाच्या शेवटी सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विज्ञानवादी विचारप्रणाली संवर्धित करण्यासाठी आणि त्या प्रणालीला साहित्यात अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा परिसंवाद अत्यंत मौल्यवान होता.