१०० वर्षांचा प्रवास हा कोणत्याही संघटनेच्या सामर्थ्याचा गौरव असतो. मात्र, त्या सामर्थ्याचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान किती, यावर त्याचे खरे महत्त्व ठरते. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विजयादशमी उद्बोधनातून संघाच्या ‘शताब्दी’पर्वानंतरची दिशा स्पष्ट होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘शताब्दी’ वर्षाने, प्रदीर्घ संघटनात्मक प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा गाठला. ‘व्यक्तिनिर्माणातून समाजसंघटन आणि समाजसंघटनातून राष्ट्रनिर्माण’ ही संघाची भूमिका, १०० वर्षांनंतरही केंद्रस्थानी आहे. कार्यकर्त्यांचे जाळे, शाखांच्या माध्यमातून रुजवलेली शिस्त आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, हीच संघाची वैशिष्ट्ये. ‘शताब्दी’ वर्षातील कार्यक्रम आणि संपर्क उपक्रमांतून, या संघटनशक्तीचे व्यापक स्वरूप अधोरेखित झाले. या शतकपूर्तीचा खरा अर्थ, भूतकाळातील कामगिरीचा गौरव करण्याबरोबरच भविष्यातील राष्ट्रनिर्मितीसाठी तिचा उपयोग करण्यात आहे.
आज देशाची सुरक्षितता आणि सामाजिक स्थैर्यासाठीही विवेकाची गरज जाणवते. बाह्य शक्तींकडून देशांतर्गत मतभेदांचा गैरफायदा घेतला जाण्याविषयी सरसंघचालकांनी व्यक्त केलेली चिंता, याचसंदर्भात समजणे आवश्यक. काही देशांतील अस्थिरतेने अंतर्गत असंतोष, आर्थिक-सामाजिक नाराजी आणि माहितीचा राजकीय हेतूंसाठी वापर कसा होऊ शकतो, याकडे जगाचे लक्ष वेधले. सत्तापालट घडवून आणण्यासाठी, स्थानिक असंतोषाचा वापर होण्याविषयी सजग राहणे आवश्यक आहे. सजगतेचा अर्थ, संशयाचे वातावरण निर्माण करणे नव्हे; तर घटनांचे स्वरूप, पुरावे आणि त्यामागील हितसंबंधांचे विवेकपूर्ण आकलन करणे होय. यासंदर्भात तरुणांची भूमिका विशेष महत्त्वाची. तरुणाईची ऊर्जा, तंत्रज्ञानावरील पकड आणि समाजमाध्यमांवरील सक्रियता देशाच्या प्रगतीसाठी मोठी शक्ती ठरू शकते. परंतु, अप्रमाणित माहिती, भावनिक आवाहने आणि दिशाभूल करणारी कथने तरुणांच्या विचारांवर प्रभाव टाकू शकतात. सत्यता न तपासता प्रतिक्रिया देणे किंवा अर्धवट माहितीवरून निष्कर्ष काढणे, यामुळे अनवधानाने विभाजनकारी शक्तींना मदत होते. म्हणूनच, माहितीची सत्यता पडताळणे, विविध बाजू समजून घेणे आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने विचार करणे, ही तरुणांची महत्त्वाची जबाबदारी ठरते.
लोकशाहीत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि धोरणांबाबत मतभेद व्यक्त करणे, हे नागरिकांचे अधिकार आहेत. मात्र, या मतभेदांचे निराकरण संवाद आणि घटनात्मक प्रक्रियांतून करण्याची तयारी असली, तर संघर्षाचे रूपांतर विधायक परिवर्तनात होऊ शकते. शासन, राजकीय नेतृत्व, सामाजिक संघटना आणि आंदोलनकर्ते या सर्वांनीच, सार्वजनिक हित आणि संविधानिक मर्यादांचे भान राखले पाहिजे. असंतोषामागील मूळ प्रश्न सोडवणे आणि बाह्य हितसंबंधांना त्याचा गैरफायदा घेण्याची संधी न देणे, यासाठी संवादही आवश्यकच. संघाच्या ‘शताब्दी’पर्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वैश्विक संवाद आणि वैश्विक दायित्व. भारताची सांस्कृतिक परंपरा मानवकल्याण, सहअस्तित्व आणि विश्वबंधुत्वाचा विचार मांडते. आज जग आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय संघर्ष, पर्यावरणीय संकटे आणि सामाजिक तणावांचा सामना करताना, या मूल्यांना व्यापक संदर्भ प्राप्त झाला. भारताने स्वतःच्या अनुभवातून विकसित झालेली जीवनदृष्टी जगासमोर मांडतानाच, अन्य समाजांच्या अनुभवांतूनही शिकण्याची तयारी ठेवावी. वैश्विक संवाद म्हणजे विचार मांडणे एवढेच नव्हे; तर जागतिक प्रश्नांच्या निराकरणात जबाबदार योगदानही देणे. भारतीय मूल्यांची उपयुक्तता कृतीतून सिद्ध झाल्यास, भारताची जागतिक भूमिका अधिक विश्वासार्ह होईल.
यासाठी शिक्षण, विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि सार्वजनिक संस्थांच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण प्रगती आवश्यक आहे. ‘विश्वगुरू’ होण्याची आकांक्षा घोषणेपुरतीच मर्यादित न राहता ज्ञाननिर्मिती, गुणवत्तापूर्ण कार्य आणि जागतिक समस्यांच्या निराकरणातील योगदानातून साकार झाली पाहिजे. व्यक्तीच्या कर्तव्यपालनाला संस्थात्मक कार्यक्षमता आणि सामाजिक सहकार्याची जोड मिळाली, तर राष्ट्रनिर्मितीचा पाया मजबूत होतो. स्वयंसेवकांच्या सेवाभाव समाजाच्या व्यापक गरजांशी जोडला गेल्यास, संघटनशक्तीचा लाभ देशाला मोठ्या प्रमाणावर होईल. ‘शताब्दी’ वर्षातील कार्यक्रम आणि उपक्रमांनी संघाची सामाजिक पोहोच, कार्यकर्त्यांचे जाळे आणि समाजाशी संवादी राहण्याची क्षमता अधोरेखित केली. विशेषतः तरुणांचा सहभाग संघाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे.
संघाच्या कार्यपद्धतीचा वैचारिक आधार म्हणजे ‘स्वबोध’. स्वतःची सांस्कृतिक ओळख, इतिहास, परंपरा आणि जीवनमूल्ये यांचे भान असलेला समाज, आत्मविश्वासाने भविष्याकडे पाहू शकतो. जागतिकीकरणाच्या काळात ज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभव स्वीकारताना, स्वतःची ओळख जपणेही आवश्यकच. ‘स्वबोध’ म्हणजे, स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवून जगाशी आत्मविश्वासाने संवाद साधणे. भारतीय परंपरेतील मानवकल्याण, सहजीवन आणि विश्वबंधुत्वाची मूल्ये आधुनिक काळाशी जोडली, तर सांस्कृतिक आत्मभान राष्ट्रीय प्रगतीचे प्रेरणास्रोत होईल. या ‘स्वबोधा’चा महत्त्वाचा पैलू म्हणजे हिंदू एकता आणि हिंदूभाव. हिंदू समाजाचे संघटन ही संघाची मूलभूत भूमिका राहिली आहे. या एकतेचा आशय संघटनात्मक बांधणीपुरताच मर्यादित नाही. विविध भाषा, प्रांत, जाती, परंपरा आणि उपासनापद्धती यांच्यातील सांस्कृतिक नात्याची जाणीव दृढ करणे, परस्परांविषयी आत्मीयता निर्माण करणे आणि व्यापक समाजहितासाठी एकत्र कार्य करण्याची प्रेरणा देणे, हाच हिंदूभावाचा सामाजिक अर्थ. विविधतेला सामावून घेणारी एकात्मता समाजाला अंतर्गत बळ देते. सामायिक सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव प्रबळ झाल्यास, सहकार्याची क्षमता वाढते आणि संकटकाळात समाज अधिक सक्षमपणे उभा राहतो.
या विचाराला व्यवहारात आणणारी पंच-परिवर्तनाची संकल्पनाही, ‘शताब्दी’पर्वानंतर महत्त्वाची. सामाजिक समरसता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध व स्वदेशी आणि नागरिक कर्तव्यपालन या पाच विषयांतून, व्यक्तीपासून समाजापर्यंत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न दिसतो. सामाजिक समरसतेतून परस्परांविषयी आदर, कुटुंबप्रबोधनातून संवाद व संस्कार, पर्यावरण संरक्षणातून निसर्गाप्रति जबाबदारी, स्वदेशीतून स्थानिक उत्पादनाला बळ आणि नागरिक कर्तव्यपालनातून सार्वजनिक शिस्त वाढावी, हीच त्यामागील अपेक्षा. या संकल्पनांचे यश त्याच्या दैनंदिन आचरणावर अवलंबून आहे. या आचरणासाठी विवेकवादी दृष्टिकोन अत्यावश्यकच. विवेक म्हणजे परंपरेचा नकार नव्हे आणि आधुनिकतेचे अंधानुकरणही नव्हे; तर योग्य-अयोग्य आणि सत्य-असत्य यांचा विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता. व्यक्तिगत जीवनात तो भावनांच्या आहारी न जाता निर्णय घेण्यास, कौटुंबिक जीवनात पिढ्यांमधील संवाद व परस्परांचा आदर वाढवण्यास, तर सामाजिक जीवनात अफवा, पूर्वग्रह आणि द्वेषापासून दूर राहून व्यापक हिताचा विचार करण्यास मदत करतो. सांस्कृतिक आत्मभानाला विवेकाची जोड मिळाल्यास, परंपरेतील मूल्ये अधिक अर्थपूर्ण होतात.
१०० वर्षांचा प्रवास हा अभिमानाचा टप्पा असून, पुढील शतकाच्या वाटचालीचा तो प्रारंभही आहे. कार्यकर्त्यांची शिस्त, सेवाभाव आणि समाजाशी संपर्क साधण्याची क्षमता ही राष्ट्रनिर्मितीची महत्त्वाची साधने आहेत. त्यांचा उपयोग व्यक्तिनिर्माण, हिंदू समाजातील आत्मीयता, सामाजिक समरसता, स्वावलंबन, विवेकशील नागरिकत्व आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी झाला; तर संघाचे योगदान व्यापक राष्ट्रजीवनात अधिक प्रभावीपणे उमटेल. सशक्त संघटनातून समर्थ समाज आणि समर्थ समाजातून समर्थ राष्ट्र घडविण्याचा संकल्प कृतीत उतरवणे, हेच संघाच्या ‘शताब्दी’पर्वानंतरच्या वाटचालीचे महत्त्वाचे ध्येय ठरावे.