टोल प्लाझावरील सेवांबाबत थेट एनएचएआयकडे अभिप्राय; ‘राजमार्गयात्रा’ ॲपमध्ये ‘टोल प्लाझा फीडबॅक’ सुविधा सुरू

प्रवाशांना तक्रारी आणि सूचना नोंदविण्याची संधी; नागरिकांच्या सहभागातून सेवांचा दर्जा सुधारणार


Rajmargyatra App Toll Plaza Feedback
 
 
मुंबई, : (Rajmargyatra App Toll Plaza Feedback)राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डिजिटल अभिप्राय प्रणाली सुरू केली आहे. यासाठी दि. १९ ऑक्टोबर रोजी ‘राजमार्गयात्रा’ या मोबाईल ॲपमध्ये ‘टोल प्लाझा फीडबॅक’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना टोल प्लाझावरील अनुभव, सेवांशी संबंधित समस्या आणि सुधारणा करण्यासाठीच्या सूचना थेट प्राधिकरणाकडे नोंदविता येणार आहेत.
 
या सुविधेअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा ओलांडल्यानंतर वार्षिक पासधारकांना राजमार्गयात्रा ॲपवर सूचना मिळणार आहे. या सूचनेद्वारे प्रवाशांना टोल प्लाझावरील सेवांबाबत आपला अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन केले जाईल. याशिवाय, ॲप वापरणाऱ्या सर्व नागरिकांना मेन्यू विभागातील ‘टोल प्लाझा फीडबॅक’ हा पर्याय वापरून देशातील महामार्ग नेटवर्कवरील कोणत्याही टोल प्लाझाबाबत अभिप्राय नोंदविता येणार आहे.(Rajmargyatra App Toll Plaza Feedback)
 
या डिजिटल सुविधेद्वारे प्रवाशांना निश्चित केलेल्या श्रेणीनुसार टोल प्लाझावरील अनुभवाचे मूल्यांकन करता येईल. तसेच प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींशी संबंधित पर्याय निवडून त्याबाबत सविस्तर टिप्पणी नोंदविता येणार आहे. टोल प्लाझावरील सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि सुधारणा सुचविण्याचीही संधी मिळणार आहे.
टोल प्लाझावरील सेवांशी संबंधित समस्या ओळखणे, वारंवार उद्भवणाऱ्या अडचणींचे निरीक्षण करणे आणि कोणत्या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, हे निश्चित करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग वापरणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा सक्रियपणे वापर करण्याचे आवाहन केले आहे. टोल प्लाझावरील आपले अनुभव, तक्रारी आणि सूचना राजमार्गयात्रा ॲपद्वारे नोंदविण्याचे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहभागातून टोल प्लाझावरील समस्या अधिक प्रभावीपणे समजून घेता येतील. त्यानुसार आवश्यक सुधारणा करून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.(Rajmargyatra App Toll Plaza Feedback)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर