मुंबई, : (Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper Train)देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन १ नोव्हेंबर रोजी सुरू होण्याची शक्यता असून ही ट्रेन मुंबई-बंगळुरू या मार्गावर धावणार आहे. या सेवेमुळे दोन्ही शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ही ट्रेन बेंगळुरूमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) यांना जोडणार आहे. सध्या या मार्गावर धावणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसला प्रवासासाठी सुमारे २२ ते २४ तास लागतात. त्या तुलनेत वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी कमी होऊन सुमारे १६ तासांवर येण्याची अपेक्षा आहे.(Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper Train)
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ही ट्रेन बेंगळुरूहून रात्री ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मुंबईत पोहोचेल. मुंबईहून परतीच्या प्रवासात ट्रेन रात्री ८.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी सुमारे १५ तास ४५ मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे. दि. २ नोव्हेंबरपासून नियमित प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता असून, ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.(Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper Train)
तीन वातानुकूलित श्रेणींमध्ये ८२३ बर्थ
१६ डब्यांच्या या ट्रेनमध्ये एकूण ८२३ बर्थ असतील. प्रवाशांसाठी वातानुकूलित प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी अशा तीन पर्यायांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावर पुणे, कल्याण, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर, गुत्ती आणि अनंतपूर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे अपेक्षित आहेत. तिकिटांचे संभाव्य दर २,६८४ रुपयांपासून सुरू होण्याचा अंदाज आहे.(Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper Train)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.