अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा कट; १०५ खासदार मैदानात!

‘हेट क्राइम’ म्हणून तपास करण्याची एफबीआयकडे मागणी; भारतीय-अमेरिकींना ऑनलाइन धमक्या देणाऱ्यांवर कारवाईसाठीही दबाव

    21-Oct-2026

Hindu Temple Attack Attempt in Illinois 
 
मुंबई (Hindu Temple Attack Attempt in Illinois) : अमेरिकेतील १०० हून अधिक खासदारांनी एफबीआयचे संचालक काश पटेल यांना पत्र लिहून, इलिनॉय राज्यातील एका हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाची ‘फेडरल हेट क्राइम’ अर्थात संघीय स्तरावरील द्वेषप्रेरित गुन्हा म्हणून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भारतीय-अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाइन धमक्यांना आळा घालण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याबाबतही त्यांनी उत्तर मागितले आहे.
 
काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी लिहिलेले हे पत्र शिकागोजवळील ऑरोरा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात १९ वर्षीय तरुणाने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर काही दिवसांनी पाठवण्यात आले आहे. दि. १५ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत संबंधित तरुणाच्या बंदुकीत (शॉटगन) बिघाड झाल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि मोठी दुर्घटना टळली.(Hindu Temple Attack Attempt in Illinois)
 
अमेरिकेच्या काँग्रेसमधील १०५ सदस्यांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये चार अमेरिकी सिनेटरांचाही समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काही विधानांवरही या खासदारांनी टीका केली आहे. या विधानांमुळे वांशिक आणि धार्मिक पूर्वग्रहांना अप्रत्यक्षपणे मान्यता मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये भारतीय-अमेरिकी काँग्रेस सदस्य प्रमिला जयपाल, रो खन्ना, अमी बेरा आणि सुहास सुब्रमण्यम यांचाही समावेश आहे.
 
खासदारांनी अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या एका सोशल मीडिया पोस्टचाही उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये एका शीख व्यक्तीचे छायाचित्र देऊन, “आमच्या रस्त्यांवरून निघून जा. तुम्हाला गाडी चालवता येत नाही, मिस्टर सिंह,” असा संदेश लिहिण्यात आला होता. तसेच, अमेरिकी शिक्षण विभागाच्या एका पोस्टचाही त्यांनी संदर्भ दिला. या पोस्टमध्ये “मेक कॉलेज फुटबॉल ग्रेट अगेन” असा संदेश होता. टेक्सासमधील एका रिपब्लिकन नेत्याने विद्यापीठाच्या फुटबॉल सामन्यात दक्षिण आशियाई नागरिक सहभागी होत असल्याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर ही पोस्ट करण्यात आली होती.(Hindu Temple Attack Attempt in Illinois)
 
दि. २० ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात खासदारांनी म्हटले आहे की, “प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या संदेशांमुळे या समुदायांविषयीचा द्वेष कमी होण्याऐवजी तो अधिक वाढत असल्याची आम्हाला गंभीर चिंता आहे.” वांशिक द्वेष, धार्मिक पूर्वग्रह आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याच्या तयारीचे एकत्रित स्वरूप लक्षात घेता, या प्रकरणात व्यापक संघीय प्रतिसादाची आवश्यकता असल्याचे खासदारांनी नमूद केले आहे. ऑरोरा प्रकरणात संभाव्य वांशिक, वंशीय आणि धार्मिक पूर्वग्रहांच्या दृष्टिकोनातून एफबीआय तपास करत आहे का, कथित कटाला ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा अन्य व्यक्तींनी प्रोत्साहन दिले होते का आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जात आहेत, असे प्रश्नही खासदारांनी उपस्थित केले आहेत.(Hindu Temple Attack Attempt in Illinois)
  
पत्रात सप्टेंबर २०२६ च्या अहवालाचा संदर्भ
 
खासदारांनी सप्टेंबर २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. या अहवालानुसार, जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दक्षिण आशियाई नागरिकांविरोधातील द्वेषपूर्ण आशय असलेल्या ५ लाख ४२ हजारांहून अधिक पोस्ट आढळून आल्या. जानेवारी २०२४ ते जून २०२६ या कालावधीत अशा पोस्टच्या मासिक संख्येत सुमारे २४० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्नेगी एंडोमेंटच्या सर्वेक्षणानुसार, २०२५ च्या सुरुवातीपासून भारतीय-अमेरिकी उत्तरदात्यांपैकी ४८ टक्के जणांना त्यांच्या समुदायाला लक्ष्य करणाऱ्या वर्णद्वेषी पोस्टचा वारंवार किंवा काही प्रमाणात सामना करावा लागला. तर प्रत्येक चार जणांपैकी एका व्यक्तीने आपल्याला अपमानास्पद शब्दांनी संबोधण्यात आल्याचे सांगितले.(Hindu Temple Attack Attempt in Illinois)
 
 




संबंधित मजकूर