छत्तीसगडमध्ये गोहत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी नागपुरातून अटक

आतापर्यंत १४ जणांविरोधात गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे उघड

    21-Oct-2026   

Chhattisgarh Cow Slaughter Case
 
मुंबई (Chhattisgarh Cow Slaughter Case) : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील गौरीनागर येथे गोहत्या करून गायींची छाटलेली मुंडकी शीतला तलावाजवळ आणि बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे भुयारी पुलाजवळ टाकल्याच्या प्रकरणात चिखली पोलीस आणि सायबर सेलने फरार असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी एजाज अहमद ऊर्फ कसाई ऊर्फ वकील अन्सारी याला नागपूर येथून अटक करण्यात आली. तर खैरुन निशा आणि नसीमा बेगम ऊर्फ राणी या दोन महिलांना गौरीनागर येथून ताब्यात घेण्यात आले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींसह गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. घटना उघडकीस आल्यानंतर फरार झालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी चिखली पोलीस आणि सायबर सेलच्या संयुक्त पथकाने व्यापक शोधमोहीम राबवली होती. मुख्य आरोपी नागपुरात असल्याची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली. तर दोन्ही महिलांना चौकशीसाठी गौरीनागर येथून ताब्यात घेण्यात आले.(Chhattisgarh Cow Slaughter Case)
 
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी १० आरोपी आणि एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. आता फरार असलेल्या तिघांना अटक केल्याने या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या १४ झाली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, ३२५, २३८ आणि ३(५) तसेच पोलिसांनी नमूद केलेल्या प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यातील कलम ४, ६ आणि १० आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या सर्वांची भूमिका निश्चित करणे आणि या प्रकरणामागे आणखी काही व्यापक संबंध आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी उपेंद्र शाह, सोमनी पोलीस ठाण्याचे प्रभारी इमान साहू, बसंतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी कौशलेंद्र देवांगन, चौकी प्रभारी उपनिरीक्षक कैलाश चंद्र मराई आणि उपनिरीक्षक सत्तूलाल कंवर यांच्यासह चिखली पोलीस आणि सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संशयितांचा शोध घेण्यात सायबर सेलचे निरीक्षक विनय पम्मार आणि अन्य कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, या प्रकरणातील एका आरोपीशी संबंधित असल्याचा आरोप असलेले अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण महानगरपालिकेने रविवारी स्वतंत्र प्रशासकीय कारवाईअंतर्गत हटवल्याचे वृत्त आहे.(Chhattisgarh Cow Slaughter Case)
 
सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे उघड
 
दि. १२ ऑक्टोबर रोजी बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे भुयारी पुलाजवळ, तर १४ ऑक्टोबर रोजी गौरीनागरमधील शीतला तलावाजवळ गायींची छाटलेली मुंडकी आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. अनेक नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येऊन निषेध नोंदवला. यानंतर आंदोलकांनी मानव मंदिर चौकात गायीचे छाटलेले मुंडके ठेवून निदर्शने केली. तसेच कोतवाली पोलीस ठाण्याबाहेरील मुख्य रस्ता रोखून धरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. काही आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेर बसून हनुमान चालिसाचे पठण करत निषेध व्यक्त केला. नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. घटनास्थळांच्या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही चित्रणात रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला बसलेल्या गुरांना काही अज्ञात व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसून आले. या धाग्यांच्या आधारे तपास पथकाने गौरीनागर येथील अब्दुल अलीम ऊर्फ कनवा याला त्याची पत्नी आणि मुलीसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अब्दुल अलीम याने गोहत्या करणे, गायींच्या मांसाची विक्री करणे आणि गुन्हा लपवण्यासाठी शीतला तलावाजवळ तसेच भुयारी पुलाजवळ गायींची छाटलेली मुंडकी टाकणे यामध्ये सहभागी असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी सलमान खान, मोहम्मद साकीर खान, मोईन गौरी, आरिफ कुरेशी, सलीम अख्तर, सय्यद नदीम, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद तौहीद रझा खान यांच्यासह अन्य संशयितांना अटक केली.(Chhattisgarh Cow Slaughter Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर