अयोध्येतील श्रीराम मंदिरात विजयादशमीचा उत्साह ; शास्त्रोक्त पद्धतीने शस्त्रपूजन, रामललांचा महाभिषेक, कन्यापूजनही संपन्न

    21-Oct-2026   
 
 Vijayadashami Celebrations at Ram Temple
 
मुंबई ( Vijayadashami Celebrations at Ram Temple) : शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता आणि विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त मंगळवारी श्रीरामजन्मभूमी मंदिरात विशेष धार्मिक विधी पार पडले. यावेळी श्रीरामललांचा महाभिषेक, शस्त्रपूजन, विशेष छप्पन भोग अर्पण आणि नव्याने सुरू करण्यात आलेला कन्यापूजनाचा उपक्रम अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळी गर्भगृहात विराजमान श्रीरामललांचा महाभिषेक करून उत्सवाची सुरुवात झाली.
 
पारंपरिक धार्मिक विधींनुसार श्रीरामललांना दूध, दही, तूप, साखर आणि नारळाच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. शास्त्रोक्त पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आले, तर मंदिर परिसरातील दुर्गा मंदिरात माँ दुर्गेच्या पवित्र शस्त्रांचे स्वतंत्रपणे पूजन करण्यात आले. दुपारच्या राजभोगाच्या वेळी श्रीरामललांना ५६ प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेला विशेष छप्पन भोग अर्पण करण्यात आला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने यंदा एक महत्त्वपूर्ण नवा उपक्रम म्हणून मंदिर परिसरातील यज्ञशाळेत पारंपरिक कन्यापूजनाचे आयोजन केले. यावेळी कन्यांचे चरण विधिवत प्रक्षाळून त्यांचे पूजन करण्यात आले. श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून त्यांना पारंपरिक चुनरी अर्पण करण्यात आली.( Vijayadashami Celebrations at Ram Temple)
 
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे विश्वस्त आणि निर्मोही आखाड्याचे स्वामी दिनेंद्र दास हे या धार्मिक अनुष्ठानाचे मुख्य यजमान होते. आचार्य केशव आणि भवानी सिंह यांनी पूजाविधी पार पाडले. पूजनानंतर कन्यांना पारंपरिक कन्याभोजन देण्यात आले. तसेच त्यांना फळे, चॉकलेट, टॉफी, लेखनसाहित्य आणि दक्षिणा देऊन सन्मानित करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (निवृत्त), सचिव जगदीश आफळे आणि विश्वस्त कृष्ण मोहन उपस्थित होते.
 
विजयादशमीचा हा उत्सव शारदीय नवरात्रोत्सवातील धार्मिक अनुष्ठानांच्या सांगतेनंतर पार पडला. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी विधिवत घटस्थापना करून पवित्र कलशाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर मंदिरातील पाच अर्चकांनी शतचंडी पाठाचे पारायण केले. नवमीच्या दिवशी दशांश हवन आणि पूर्णाहुती पार पडली. त्यानंतर विजयादशमीला श्रीरामललांचा विशेष महाभिषेक करण्यात आला. या उत्सवातून श्रीरामजन्मभूमी मंदिराचा समृद्ध आध्यात्मिक वारसा आणि मंदिरात आजही श्रद्धेने जपल्या जाणाऱ्या सनातन परंपरांचे दर्शन घडले.( Vijayadashami Celebrations at Ram Temple)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर