‘घरगुती चवीचा, वारसा परंपरेचा’ असे म्हणत ठाण्यामध्ये ‘चपाती भाकरी हाऊस’ मोठ्या दिमाखात उभे आहे. तेजश्री गोडबोले-परचुरे यांनी कष्टाने आणि विश्वासाने निर्माण केलेला हा व्यवसाय... त्यांच्याच कार्यकर्तृत्वाची ही गोड कहाणी...
चपातीसह तब्बल सात-आठ प्रकारच्या भाकर्या, पुरणपोळी, मोदक आणि चार प्रकारचे पराठे बनवून ठाणेकरांना घरगुती चवीचे आणि आपुलकीचे खाद्यपदार्थ पुरवणारे ठाण्याचे ‘चपाती भाकरी हाऊस.’ या हाऊसच्या मुख्य आहेत, तेजश्री अमित गोडबोले. ठाण्यातील जवळजवळ ८० टक्के हॉटेल्स, रेस्टॉरेंट वगैरेंमध्ये ‘चपाती भाकरी हाऊस’मध्ये बनवलेल्या चपाती-भाकरीसह अन्य खाद्यपदार्थ चवीने खाल्ले जातात. ‘चपाती भाकरी हाऊस’ म्हणजे ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीमधला ब्रॅण्ड आहे. हाताला चव आणि वेळेसह व्यवसायाचे व्यवस्थापन यात खर्या अर्थाने अनुभवाने ‘मास्टरकी’ असलेल्या तेजश्री गोडबोले यांनी व्यवसायाने अनेक गृहिणींचा स्वावलंबनाचा मार्ग प्रशस्त केला. घरोघरच्या गृहिणींचा पोळी आणि भाकरी बनवण्यामध्ये हातखंडा असतो. ती अन्नपूर्णाच असते. पण तिच्या या पारंपरिक कौशल्याचा उपयोग अर्थार्जनासाठी करता येईल, याचा विचार सहसा कुणी करत नाही. मात्र, तेजश्री यांनी हा विचार केला. त्यांनी गृहिणींना आवाहन केले की, "तुम्ही सहजतेने चांगल्या चपात्या-भाकर्या बनवता. आमच्या सोबत या. आपण तुमच्या कष्टाला अर्थार्जनाचे बळ देऊ.”
तेजश्री या मूळच्या ठाणेकरच. त्यांचे पिता जयवंत आणि आई अरूणा परचुरे. साऊंड इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या तेजश्री यांनी सुगम संगीताचा डिप्लोमाही पूर्ण केला आहे. संगीताचा वारसा त्यांना कुटुंबाकडूनच मिळालेला. या वारशासोबतच त्यांना आणखी एक वारसा मिळाला, तो म्हणजे खाद्यपदार्थ निर्मितीच्या कौशल्याचा आणि व्यवसायाचा. त्यांचे बाबा याच व्यवसायात आहेत. ठाण्यात ऋतू फूड म्हणून एक अत्यंत सुप्रसिद्ध स्नॅक्स कॉर्नर आहे, त्याचे ते सर्वेसर्वा. महाराष्ट्र खाद्य संस्कृतीतले जवळजवळ सर्वच चविष्ट खाद्यपदार्थ ‘ऋतू फूड’मध्ये असतात. लहानपणापासून तेजश्रींनी बाबांना हा व्यवसाय करताना पाहिले. त्या व्यवसायात त्या स्वतः जबाबदारी घेऊन कामही करत असत. त्यांना त्यात रूची होती. बाबाचांही त्यांच्यावर विश्वास होता. कधी कुठे बाहेर जायचे झाले, तर जयवंत हे तेजश्रीवर खाद्यपदार्थ उत्पादन विभाग सोपवून जाऊ लागले. त्यामुळे या व्यवसायामधले खाचखळगे तेजश्री यांनी जवळून पाहिले. या व्यवसायासाठी आवश्यक काय असते, काय समस्या येऊ शकतात, त्यातून मार्ग कसा काढायचा याचे जणू त्या प्रशिक्षणच घेत होत्या. दरम्यान, त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्या ‘रेकॉर्डिस्ट’ म्हणून नोकरी करू लागल्या. पण प्रवासातच वेळ जास्त जाऊ लागला. शेवटी जयवंत यांनी लेकीला सुचवले की, "तू आपल्या घरगुती व्यवसायात ये.” बाबांचे म्हणणे तेजश्री यांनी ऐकले.
काही वर्षांनी त्यांचा विवाह अमित गोडबोले यांच्याशी झाला. बॅडमिंटन कोच असलेले अमित हे हरहुन्नरी. दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. तेजश्री यांना मुलगी झाली. पुढे ‘कोरोना’ची महामारी आली. त्यावेळी अनेक राजकीय पक्ष गरजू आणि गोरगरिबांना पोळी-भाजीचे विनामूल्य वितरण करत असत. त्यांनी तेजश्री यांना सांगितले की, "गेली चार दशके तुमचे बाबा खाद्यपदार्थांच्या उत्पादनात काम करतात. तुम्हीही त्यात आहात. चव आणि गुणवत्ता कायम आहे. मोठ्या संख्येने पोळी-भाजी बनवून द्याल का?” ‘कोरोना’ काळात नवीन व्यवसाय उभा करणे, हे आव्हान होते. मात्र, तेजश्री यांनी या आव्हानात संधी निर्माण केली. त्यांनी पोळी-भाजी केंद्र सुरू केले. ‘कोरोना’ काळ संपला आणि पोळी-भाजीच्या मागणीत विक्रमी वाढ झाली. त्यावेळी तेजश्री यांनी स्वतःचा ब्रॅण्ड निर्माण करण्याचे ठरवले. त्यातूनच उभे राहिले ठाण्याचे ‘चपाती भाकरी हाऊस!’ तर, हा व्यवसाय करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? यावर तेजश्री म्हणतात की, "माझी आजी नलिनी त्यांच्या काळात खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असे. पुढे माझे बाबा जयवंत हे नोकरीला लागले. त्यांचा विवाह माझ्या आईशी अरूणाशी झाला. मात्र, लग्नानंतर एक दीड महिन्यातच बाबांची नोकरी सुटली. त्यावेळी त्यांनी आईचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्धार केला. आज त्याचा मोठा वटवृक्ष झाला. ही माझ्यासाठी प्रेरणा आहे. तसेच माझे पती अमित यांनी समर्थ साथ दिली. सासूबाईही ठामपणे माझ्या पाठी उभ्या आहेत. त्यामुळे व्यवसायात यश मिळवू शकले. त्या म्हणतात, "गृहिणी या अन्नपूर्णा आहेतच; पण त्या लक्ष्मीही आहेत.” या गृहलक्ष्मींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी नियोजन करत आहे. कारण आई जगदंबेने समस्त महिलांना कर्तृत्वाची शक्ती दिली आहे. फक्त ती आपली आपण ओळखली पाहिजे. ‘दार उघड बये दार उघड,’ म्हणत आपल्यातला आत्मविश्वास जागवला पाहिजे.