सुव्यवस्थेवरील टीकेचा फुसका बार!

    20-Oct-2026
 
Tiger Shroff Firing Case
 
एखाद्या अभिनेत्यावर गोळीबार होणे ही घटना गंभीरच; मात्र त्याचे भांडवल करून सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांनी आपल्या सत्ताकाळातील कारभाराचाही हिशेब द्यायला हवा. राजकारणात स्वतःच्या कारकिर्दीतील काळी पाने विसरून चालत नाहीत. कारण, राजकीय स्मृतिभ्रंशाला जनतेची स्मृती हाच उतारा असतो.
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत तरुण अभिनेता टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार निषेधार्हच. त्यातून तो सुखरूप बचावला, ही चांगलीच गोष्ट झाली. पण, या घटनेचे निमित्त करून काही विरोधी नेते हे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कशी बिघडली आहे, त्यावर प्रवचन देऊ लागले. त्यात अर्थातच, उद्धव ठाकरे यांचा समावेश आहेच. त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर बोलणे हा विनोदच! टायगर श्रॉफ यांच्यावरील हल्ला निषेधार्ह असला, तरी सरकारने संशयित हल्लेखोरांना २४ तासांतच अटक केली, हे लक्षात घेतले पाहिजे. तपासातून खरे गुन्हेगार पुढे येतीलच. पण, या हल्ल्याबद्दल तकार करणार्‍यांनी त्यांच्या राजवटीतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा विचार करणे आवश्यक आहे.
 
हिंदी चित्रपट आणि अंडरवर्ल्ड यांचा संबंध जुनाच. पूर्वी मुंबईतील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या पैशावरच, अर्ध्याहून अधिक हिंदी चित्रपट तयार होत. परिणामी, यामधून हिंदू संस्कृतीची निंदा आणि इस्लामचा ‘उदो उदो’ केला जाई. तसेच काही बड्या निर्मात्यांना दाऊदला ‘नजराणा’ही द्यावा लागे. या परंपरेला छेद देणार्‍या आणि आपल्या चित्रपटांतून आणि संगीतामधून हिंदू धर्म आणि संस्कृतीला मानाचे स्थान देणार्‍या, गुलशनकुमार या निर्मात्याची हत्या करण्यात आली. आताही अंडरवर्ल्डचे काही डॉन, हिंदी चित्रपट तार्‍यांना धमकावीत असतातच. त्यांनी दाऊदशी लागेबांधे असलेल्या आणि दाऊदचा पैसा वापरणार्‍या काही स्टार्सना व निर्मात्यांना धमकावले आहे. ‘लॉरेन्स’ हे ख्रिस्ती नाव धारण केलेल्या लॉरेन्स बिष्णोई या डॉनने, सुपरस्टार सलमान खानला उघडपणे धमया दिल्या आहेत. पूर्वी सलमान खानने राजस्थानमध्ये एका काळविटाची शिकार केली होती. बिष्णोई हा समाज काळविटांना पूज्य मानतो. त्या घटनेमुळे या लॉरेन्सचा सलमान खानवर राग आहे. त्याच्या काही गुंडांनी, सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता. तसेच निर्माता रोहित शेट्टीच्याही घरावर गोळीबार झाला होता. आता त्याचा ताजा बळी टायगर श्रॉफ ठरला.
 
चित्रपट कलाकार किंवा सामान्य माणसाला गुंडांकडून धमक्या मिळणे वा त्यांच्यावर हल्ले होणे चुकीचेच. पण, केवळ तेवढ्यानेच सारी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचे म्हणणे, हाही अतिरेकच. कारण, या निकषावर मोजमाप काढायचे झाल्यास, आज टीका करणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत तर राज्यात ‘जंगलराज’ असल्याचेच म्हणावे लागेल.
 
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द जेमतेम अडीच वर्षांची. तेव्हा सुरू झालेल्या ‘कोविड’च्या साथीनेच त्यांचे सरकार हतबल झाले होते. असे असूनही त्यांच्या सरकारकडून राज्यातील, विशेषत: मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची अक्षरश: विल्हेवाट लागली होती. त्यांची कारकीर्द ही कोणत्याही सकारात्मक कार्यामुळे वा ‘कोस्टल रोड’सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे उठून दिसत नाही, तर ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळेच नावाजली जाते. कायदा-सुव्यवस्थेबाबत तर त्यांनी बोलायलाच नको, इतकी भयंकर प्रकरणे त्यांच्या काळात घडली.
 
ठाकरे यांच्या राजवटीत सुशांतसिंह राजपूत या ‘बॉलीवूड’च्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू आत्महत्या असल्याचे दाखविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कशी राबली, हे जनतेला दिसत होते. तत्पूर्वी, सुशांतशीच संबंधित एका तरुण व्यावसायिक मुलीचा- दिशा सालियनच्या मृत्यूबद्दलही संशयाचे मोहोळ उठलेच होते. दिशाच्या मृत्यूलाही आत्महत्याच भासवले गेले असले, तरी गेल्या महिन्यातच तिच्या वडिलांनी दिशाची हत्या झाल्याचा आरोप करून, तिच्या मृत्यूचा नव्याने तपास करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही मृत्यू प्रकरणांशी, उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा निकटचा संबंध असल्याची चर्चा होत असते. आता दिशाच्या मृत्यूचा तपास नव्याने होत असून, त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच. याशिवाय, ठाकरे यांनी भाजपसमर्थक अभिनेत्री कंगना राणावत हिचे कार्यालय न्यायालयाची परवानगी नसतानाही, बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले होते. केतकी चितळे या तरुणीलाही शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमांत केलेल्या एका पोस्टसाठी, तब्बल ४० दिवस तुरुंगात राहावे लागले होते. ‘रिपब्लिक’ टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनाही घरातून फरफटत नेऊन, तुरुंगात टाकण्यात आलेच. आज हेच विरोधी नेते देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य नसल्याचा टाहो फोडत आहेत.
 
पण, ठाकरे यांची कारकीर्द गाजली, ती त्यांच्या सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या एका आदेशामुळे. मुंबईतील सर्व बारचालकांकडून, सुमारे १०० कोटी रुपयांची खंडणी आपल्या पक्षासाठी गोळा करण्याचे तोंडी आदेश त्यांनी पोलीस खात्याला दिल्याचे सांगितले जाते. त्यातूनच मुंबईतील बड्या उद्योगपतीकडून, कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळण्याचेही कारस्थान रचले गेले. त्यासाठी मुंबई पोलीस खात्यातून, निलंबित केलेल्या सचिन वाझे या भ्रष्ट अधिकार्‍याचीही पोलीस खात्यात पुन्हा नियुक्ती करण्यात आली. त्याने नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर ‘जिलेटिन’च्या कांड्यांनी भरलेली एक मोटारच उभी केली. पण, हा कट पूर्णत्वाला जाण्याआधीच उघडकीस आल्याने सरकारची नाचक्की झाली आणि अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. पण, आपल्या अल्प कारकिर्दीत या देशमुख साहेबांनी, राज्यातील सरकारविरोधी पत्रकार आणि कलाकारांना खोट्यानाट्या केसेसमध्ये अडकवून तुरुंगात टाकले होते. इतकेच नव्हे, तर सरकारवर कठोर टीका करणारे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही, खोट्या केसेस टाकून त्यांना अटक करण्याचे कारस्थान ठाकरे यांच्याच आशीर्वादाने रचले जात होते.
 
कोणत्याच सरकारला राज्यातील सर्व गुन्हे रोखता येत नाहीत. पण, गुन्हा घडल्यावर सरकारी यंत्रणा किती तत्परतेने काम करते आणि खर्‍या गुन्हेगारांना कायद्यापुढे उभे करते, त्यावरच सरकारचे यश मोजले पाहिजे. त्या निकषांवर उद्धव ठाकरे यांची कारकीर्द सपशेल नापास ठरते असे नव्हे, तर तिला ‘निगेटिव्ह मार्क’ द्यावेच लागतील.




संबंधित मजकूर