समाजमाध्यमे आणि किशोरवयीन मन : परिणाम, आव्हाने आणि संधी

    20-Oct-2026
 
Social Media Impact on Teenagers
 
आज समाजमाध्यमांमुळे जग जवळ आले आहे. एका क्षणात जगातील कोणत्याही कोपर्‍यात आपला संपर्क होतो. तसेच, माहितीच्या आदानप्रदानाचा वेगही समाजमाध्यमांमुळे वाढला आहे. याचे जसे फायदे आहेत, तसेच दुष्परिणामही आहेत. हे दुष्परिणाम लहान मुलांवर आढळून येतात. त्यामुळे समाजमाध्यमांच्या वापराबाबत सजगता महत्वाची. या संदर्भात नुकतेच सर्वोच्च न्यायालयानेही लहान मुलांना इंटरनेटपासून वंचित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा समाजमाध्यम आणि किशोरवयीनांच्या आयुष्याच्या आढावा घेणारा हा लेख...
 
अलीकडे लहान मोठे सगळेच मित्रमंडळींबरोबरच्या सहली, समारंभ, भेटीगाठी आणि नातेवाईकांबरोबरचे आनंदाचे क्षण समाजमाध्यमांवर लगेचच पोस्ट करतात. ते पाहिल्यावर अनेकांना आपण या गोष्टींचा भाग नाही, याची खंत वाटते. इतरांना खेळीमेळीचे अनुभव मिळत आहेत, मौजमजा करता येत आहे आणि आपण मात्र याला मुकलो आहोत, आपले आयुष्य कंटाळवाणे झाले आहे, असेच अलीकडे मुलांना वाटते. त्यामुळे ते पालकांकडे सतत अशाच गोष्टींची मागणी करत राहतात. किशोरवयीन मुलांमध्ये ‘फोमो’ (Fear of Missing Out) ही भावना समाजमाध्यमांमुळे वाढू शकते. ‘फोमो’ म्हणजेच, इतरांच्या आयुष्यात काहीतरी आनंददायी किंवा महत्त्वाचे घडत आहे आणि आपण मात्र त्यापासून वंचित राहत आहोत, अशी सतत वाटणारी भीती.
 
चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, किशोरवयीन मुलांमध्ये सायबर छळाचा बळी ठरणे आणि आत्महत्येचा हेतू नसतानाही, स्वतःला इजा करून घेणे यांच्यात सकारात्मक संबंध आहे. या संबंधामध्ये नैराश्याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे दिसून आले.
 
‘फोमो’चे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम : इतरांमध्ये सामील होता आले नाही, आपल्याला एखाद्या आनंददायी समारंभाचे निमंत्रण मिळाले नाही किंवा आपण आनंद घेण्याचा महत्त्वाचा अनुभव गमावला, अशी भावना मुलांमध्ये एकटेपणा, दुःख आणि न्यूनगंड निर्माण करू शकते. इतरांचे आयुष्य अधिक आनंदी आणि यशस्वी असल्याचे सतत पाहिल्यामुळे, स्वतःच्या आयुष्याविषयी असमाधान वाढू शकते. यामुळे आत्मविश्वास कमी होणे आणि सामाजिकदृष्ट्या एकटे पडल्याची भावना निर्माण होऊ शकते. लंडन येथील डॉक्टर प्रझिबिल्स्की आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या संशोधनात, ‘फोमो’चा संबंध मुलांमध्ये जीवनाविषयी कमी समाधान आणि मनःस्थितीतील नकारात्मक बदलांशी असल्याचे आढळून आले.
 
‘फोमो’ कमी करण्यासाठी काय करता येईल?
 
‘फोमो’मुळे येणारे हे अनुभव खच्ची करणारेच असतात, त्यामुळे समाजमाध्यमच्या वापरासाठी मुलांना योग्य मर्यादा ठरवायला शिकवावे. ध्यान, सजगता, मैदानी खेळ, छंद आणि मित्रमैत्रिणींसोबत समारंभाव्यतिरिक्त प्रत्यक्ष वेळ घालवणे यांनाही प्रोत्साहन द्यावे. पालक आणि शिक्षकांनी मुलांशी समाजमाध्यमवर दिसणार्‍या आयुष्याच्या निवडक आणि रंगवलेल्या चित्रणाविषयी, मोकळेपणाने चर्चा करावी. आभासी जगातील अनुभवांपेक्षा प्रत्यक्ष जीवनातील नातेसंबंध आणि अनुभवांना अधिक महत्त्व देण्याची जाणीव निर्माण करावी. इतरांच्या आयुष्याकडे पाहण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा, स्वतःचे आयुष्य आनंदाने जगायला शिकणेच अधिक महत्त्वाचे आहे.
 
समाजमाध्यमांचे व्यसन आणि मानसिक आरोग्य
 
समाजमाध्यमांचा अतिवापर आणि त्यावरील अवलंबित्वांमुळे, किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणार्‍या परिणामांविषयी आज जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. समाजमाध्यमांचे आकर्षण वाढण्यामागे त्वरित मिळणारा प्रतिसाद हे एक महत्त्वाचे कारण आहे. एखाद्या पोस्टला मिळणारे लाईस, टिप्पण्या आणि सूचनाांमुळे, आनंद किंवा समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुन्हा पुन्हा मोबाईल तपासण्याची आणि अधिक प्रतिसाद मिळवण्याची इच्छा वाढू शकते. समाजमाध्यमांचा अतिवापर झाल्यास, प्रत्यक्ष जीवनातील नातेसंबंधांकडे दुर्लक्ष होऊन चिडचिड होऊ शकते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणेही कठीण होऊ शकते आणि एकटेपणाची भावना वाढू शकते.
 
दुसर्‍या एका अभ्यासात बंदुकीच्या हिंसाचारासह विविध प्रकारचे हिंसक वर्तन, छळ, सायबरबुलिंग आणि आत्महत्येशी संबंधित घटनांमध्ये, समाजमाध्यमांच्या संभाव्य भूमिकेचा विचार करण्यात आला. समाजमाध्यमांवर हिंसक घटनांचे वारंवार प्रसारण, हिंसक वर्तन करणार्‍या व्यक्तींचे उदात्तीकरण किंवा त्यांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करणार्‍या आशयांमुळे अशा वर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच प्रभावित होऊ शकतो.
 
लाईस किंवा टिप्पण्यांद्वारे सतत मान्यता मिळवण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही, तर निराशा किंवा मनात पोकळी निर्माण होऊ शकते. सतत मोबाईल वापरल्याने झोपेच्या वेळा बिघडू शकतात, एकाग्रता कमी होऊ शकते, तणाव वाढू शकतो आणि एकंदरीतच आरोग्य बिघडू शकते. संशोधक कुस आणि ग्रिफिथ्स यांच्या अभ्यासानुसार, व्यसनासारख्या स्वरूपाचा समाजमाध्यमांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये अधिक चिंता, उदासीनता आणि एकटेपणाच्या भावनांशी संबंधित असल्याचे आढळले.
 
समाजमाध्यमांचा वापर संतुलित कसा ठेवावा?
 
समाजमाध्यमांच्या वापराबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि योग्य मर्यादा ठरवणे महत्त्वाचे आहे. किशोरवयीन मुलांना मोबाईलच्या अतिवापराची त्रासदायक लक्षणे ओळखायला शिकवावे. ठरावीक काळासाठी मोबाईल आणि इतर स्क्रीनपासून दूर राहणे, म्हणजेच ‘डिजिटल डिटॉस’ही उपयुक्त ठरू शकते. प्रत्यक्ष संवाद, मैदानी खेळ, वाचन, संगीत आणि इतर छंद यांना प्रोत्साहन दिल्यास, मुलांचे लक्ष आभासी जगातून प्रत्यक्ष जीवनाकडे वळण्यास मदत होऊ शकते.
 
पालक आणि शिक्षकांनी केवळ मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याऐवजी, त्याच्या जबाबदार आणि संतुलित वापराबद्दल मुलांशी संवाद साधावा. समाजमाध्यमे आपल्या जीवनाचा एक भाग असावा; तोच आपल्या संपूर्ण जीवनाचा केंद्रबिंदू बनू नये. किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर समाजमाध्यमांचा होणारा प्रभाव, हा अनेक पैलू असलेला विषय आहे. समाजमाध्यमांचा अतिवापर यांमुळे मुलांना विविध मानसिक आणि भावनिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
 
त्याचवेळी, ऑनलाईन आधारगट, मानसिक आरोग्यविषयक माहिती आणि जागरूकता मोहिमाांमुळे, समाजमाध्यमे सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी साधनही ठरू शकते. यासाठी मुलांमध्ये जबाबदार डिजिटल वर्तन, माध्यमांमधील माहितीचे चिकित्सक आकलन आणि स्वतःच्या भावनांविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. जगभरात मुलांच्या समाजमाध्यम वापराबाबत नव्याने विचार केला जात असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध देश कठोर नियम लागू करत आहेत. चीनने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील मुलांच्या वापरावर निर्बंध घातले आहेत, इटली आणि फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांना पालकांच्या स्पष्ट संमतीशिवाय समाजमाध्यमांचा वापर करण्यास मनाई आहे, ऑस्ट्रेलियामध्येही मुलांच्या समाजमाध्यम वापरासाठी किमान वयोमर्यादा १६ वर्षे करण्याबाबत चर्चा आणि प्रयत्न सुरू आहेत.
 
शेवटी लक्षात ठेवूया, समाजमाध्यम हे एक उपयुक्त साधन आहे; त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आपण त्याचा वापर कसा करतो, यावर अवलंबून असतो. डिजिटल जगाशी जोडलेले राहताना प्रत्यक्ष नातेसंबंध, विधायकता, स्वतःचा स्वीकार आणि मानसिक स्वास्थ्य यांना प्राधान्य देणे, हीच आजच्या काळाची गरज आहे.
 
- डॉ. शुभांगी पारकर




संबंधित मजकूर